अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणार्‍यास 10 वर्षे सक्तमजुरी

पाथर्डी तालुक्यातील घटना
अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणार्‍यास 10 वर्षे सक्तमजुरी

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याप्रकरणी अमोल बाबासाहेब गिते (वय 23 रा. वाळुंज, ता. पाथर्डी) याला 10 वर्षे सक्तमजुरीची शिक्षा आणि 10 हजार रूपये दंडाची शिक्षा जिल्हा व सत्र न्यायाधीश एस. व्ही. सहारे यांनी ठोठावली. अतिरिक्त सरकारी वकील मंगेश दिवाणे यांनी या खटल्यामध्ये सरकारतर्फे काम पाहिले.

पाथर्डी तालुक्यातील एक अल्पवयीन मुलगी 1 ऑगस्ट 2020 रोजी रात्री शेतात नैसर्गिक विधीसाठी गेली होती. त्यावेळेस आरोपी अमोल बाबासाहेब गिते याने पीडित अल्पवयीन मुलीच्या तोंडात रूमाल घालून अत्याचार केला होता. त्यानंतर पीडिताने वडील व चुलते यांना सदर घटनेची माहिती दिली. त्यांनी 5 ऑगस्ट 2020 रोजी पाथर्डी पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून आरोपी अमोल गिते विरोधात अत्याचार तसेच बालकांचे लैंगिक अत्याचारापासून संरक्षण कलमान्वये गुन्हा दाखल केला होता.

सहाय्यक पोलीस निरीक्षक डी. एम. राठोड यांनी गुन्ह्याचा तपास करून आरोपीविरूध्द न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. या खटल्यात सात साक्षीदारांच्या साक्षी नोंदविल्या. त्यामध्ये पीडिता, पीडिताची आई, वैद्यकीय अधिकारी व इतर साक्षीदारांच्या साक्षी महत्वपूर्ण ठरल्या. साक्षीदारांच्या साक्षी सरकारी पक्षाच्यावतीने केलेला युक्तीवाद ग्राह्य धरून आरोपी अमोल बाबासाहेब गिते यास न्यायालयाने दोषी धरले. त्याला 10 वर्षे सक्तमजुरी व 10 हजार रुपये दंड, दंड न भरल्यास एक वर्षे साधी कैदेची शिक्षा ठोठावली. सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक विलास साठे यांनी पैरवी अधिकारी म्हणून सहाय्य केले.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com