ना. थोरात यांनी कारखान्याने उभारलेल्या कोविड केअर सेंटरमधील रुग्णांशी साधला संवाद

ना. थोरात यांनी कारखान्याने उभारलेल्या कोविड केअर सेंटरमधील रुग्णांशी साधला संवाद

संगमनेर |प्रतिनिधी| Sangmner

करोनाच्या संकटात राज्य, जिल्हा आणि तालुक्यात जनसामान्यांना मदत करण्यासाठी सातत्याने प्रयत्नशील असलेले महाराष्ट्राचे महसूल मंत्री नामदार बाळासाहेब थोरात यांनी सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखान्याने उभारलेल्या कोवीड केअर सेंटरमध्ये जाऊन करोना रुग्णांशी आस्थेवाईकपणे विचारपूस करत संवाद साधला.

नगर रोड येथील विघ्नहर्ता लॉन्स मधील सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखान्याच्या वतीने सुरू करण्यात आलेल्या पाचशे बेडच्या कोवीड केअर सेंटर मध्ये नामदार थोरात यांनी जाऊन पाहणी करत रुग्णांशी संवाद साधला. यावेळी समवेत आमदार डॉ. सुधीर तांबे, विघ्नहर्ता लॉन्स चे संचालक राजेंद्र कुटे, युवक शहराध्यक्ष निखील पापडेजा, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. सुरेश घोलप आदी उपस्थित होते.

तालुक्यात करोनाची वाढती रुग्ण संख्या लक्षात घेऊन या रुग्णांच्या सोयीसाठी नामदार बाळासाहेब थोरात यांनी सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखान्याला कोवीड केअर सेंटर सुरू करण्याच्या सूचना दिल्या होता. त्यानुसार विघ्नहर्ता लॉन्स येथे अद्ययावत व चांगल्या दर्जाच्या सुविधा असलेल्या 500 बेडचे कोवीड केअर सेंटर सुरू करण्यात आले. यामध्ये महिलांकरता 200 तर पुरुषां करीता 300 बेड राखीव आहेत.

याभेटी प्रसंगी नामदार थोरात म्हणाले की करोनाची सध्या मोठी लाट आहे. यामध्ये कोणीही निष्काळजीपणा करू नये. प्रशासनाला आपण सूचना केल्या असून घरोघरी जाऊन तपासणी करण्यात येणार आहे. यामुळे करोनाची लागण झालेले रुग्ण लवकर लक्षात येऊन त्यांच्यावर संस्थात्मक विलीनीकरणातून तातडीने उपाय करणे सोयीचे होणार आहे. यामुळे इतरांना त्याची बाधा होणार नाही.

सध्या सर्वत्र ऑक्सिजन व रेमडिसीवर औषधाचा मोठा तुटवडा निर्माण झाला आहे. ऑक्सिजनची समस्या ही राज्यापुढे समाजाचे आहे. आपण ऑक्सिजन मिळवण्यासाठी सातत्याने काम करत आहोत. मात्र करोना रुग्ण वाढ रोखणे हाच त्यावर सर्वोत्तम पर्याय आहे. संगमनेर शहरांमध्ये घरोघर केलेल्या तपासणीला मोठे यश आले असून त्यामुळे रुग्ण संख्या कमी झाली आहे. हाच फॉर्मुला ग्रामीण भागामध्ये ही सुरू करण्यात आला असून प्रशासन व पदाधिकार्‍यांना तशा सूचना करण्यात आल्या आहेत.

सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात साखर कारखाना हा कायम तालुक्यातील नागरिकांच्या संकटाच्या वेळी मदतीला उभा राहिला असून या संकटातही त्यांनी करोना रुग्णांसाठी अद्यावत असे कोवीड केअर सेंटर सुरू करून नागरिकांना दिलासा दिला असल्याचे ते म्हणाले

आमदार डॉ. तांबे म्हणाले, महसूल मंत्री नामदार बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली संगमनेर मधील सर्व सहकारी संस्था या सातत्याने सामाजिक बांधिलकीतून नागरिकांच्या मदतीसाठी उभे असतात. कारखान्याचे अध्यक्ष बाबासाहेब ओहोळ, उपाध्यक्ष संतोष हासे, सर्व संचालक मंडळ व कार्यकारी संचालक जगन्नाथ घुगरकर आदींनी अगदी तातडीने अद्यावत असे कोवीड केअर सेंटर सुरू केले आहे. यामध्ये अत्यंत चांगल्या सुविधा असून ज्यांना काही लक्षणे आढळून आले असतील त्यांनी तातडीने येथे यावे असे आवाहन त्यांनी केले.

रुग्णांकडून कारखान्याचे आभार

यावेळी अनेक रुग्णांशी नामदार थोरात व आमदार डॉ. तांबे यांनी संवाद साधत आस्थेवाईकपणे सर्व रुग्णांची चौकशी केली. कारखान्याने पुरवलेल्या चांगल्या सुविधांबद्दल सर्व रुग्णांनी नामदार थोरात व कारखाना प्रशासनास धन्यवाद दिले आहेत.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com