संगमनेर |प्रतिनिधी| Sangmner

निरोगी शरीर व चांगले आरोग्य ही माणसाची मोठी संपत्ती आहे. यासाठी व्यायाम व चांगला आहार अत्यावश्यक आहे.

याचबरोबर मन प्रसन्न राहणे हे अत्यंत गरजेचे आहे. आताच्या युगामध्ये प्रत्येकाने खिलाडू वृत्ती जोपासली पाहिजे. कारण त्यामधून हार - जीत पचवण्याची शक्ती निर्माण होते. खिलाडूवृत्तीमुळे जीवनात सहजता येत असल्याचे प्रतिपादन काँग्रेसचे विधिमंडळ गटनेते व महसूलमंत्री नामदार बाळासाहेब थोरात यांनी केले आहे.

अमृतवाहिनी शेती व शिक्षण विकास संस्थेत नामदार बाळासाहेब थोरात यांच्या वाढदिवसानिमित्त अमृतवाहिनी प्रीमियर लीगच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. यावेळी संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल शिंदे, व्यवस्थापक प्रा. व्ही. बी. धुमाळ, प्रा. अशोक मिश्रा, प्रा. बाळासाहेब शिंदे, प्रा. सुनील सांगळे, नामदेव गायकवाड, प्राध्यापक जी. बी. काळे यांच्यासह संस्थेतील विविध अधिकारी उपस्थित होते.

यावेळी अमृतवाहिनी शेती व शिक्षण विकास संस्थेतील अमृतवाहिनी इंजिनिअरिंग कॉलेज, पॉलीटेक्निक, डी.फार्मसी, बी. फार्मसी, आय.टी.आय,मॉडेल स्कूल, इंटरनॅशनल स्कूल, ज्युनियर कॉलेज या विविध संस्थांमधील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचार्यांच्या आय.पी.एल प्रमाणे आठ टीम करण्यात आल्या असून आय.पी.एल प्रमाणे मॅचेस होणार आहेत. यामुळे शिक्षक व शिक्षकेतर कर्मचार्यांमध्ये ही सांघिक भावना वाढणार असून महाविद्यालयीन कामकाजाच्या वेळे व्यतिरिक्त सायंकाळी या मॅचेस ठेवल्या जाणार आहेत.

नामदार थोरात म्हणाले, करोना संकटाने मानवाला पुन्हा एकदा स्वत:च्या आरोग्याची काळजी अत्यंत महत्त्वाची आहे हे अधोरेखित केले आहे. जीवनामध्ये प्रत्येकजण स्वत:च्या आरोग्याकडे दुर्लक्ष करतो आणि तीच मोठी चूक होऊन जाते. मन प्रसन्न राहण्यासाठी व्यायाम अत्यंत गरजेचे आहे. व्यायामाबरोबर हलका आहार अत्यंत गरजेचा आहे.

याचबरोबर प्रत्येकाने ताण तणावातून मुक्त राहण्यासाठी खेळाडू वृत्ती जोपासली पाहिजे. छंद हे माणसाला नेहमी उर्जा देतात. खेळाडू वृत्तीमुळे हार - जीत पचवण्याची ताकद निर्माण होत असून जीवनात जीवन जगताना ही सहजता येते. अन्यथा चिड चिडा स्वभाव किंवा एकांगीपणा हे कधी कधी माणसाला येत असते. त्यावर मात करण्यासाठी प्रत्येकाने खेळाशी निगडित असले पाहिजे.

याचबरोबर तरुणांना ही खेळांमधून करिअरच्या मोठ्या संधी असून आपल्या तालुक्यातील अजिंक्य राहणे हे त्याचे उदाहरण आहे. खेळामधूनही यशस्वी होता येते हे अनेकांनी दाखवून दिले आहे. याचबरोबर विविध शासकीय सेवांमध्ये ही खेळाडूंच्या जागा राखीव असतात. त्यामुळे ही तरुणांसाठी मोठी संधी आहे.

अनिल शिंदे म्हणाले, नामदार बाळासाहेब थोरात यांच्या वाढदिवसानिमित्त अमृतवाहिनी शेती व शिक्षण विकास संस्थेत मागील दहा वर्षापासून क्रिकेट मॅचचे आयोजन होत आहे. त्यामुळे सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचार्यांमध्ये सांघिक भावना राहते. ओळख निर्माण होते. स्वभावाच्या आवडी-निवडी कळतात.

आणि यातून कामामध्ये उत्साह निर्माण होतो. प्रास्ताविक सुनील सांगळे यांनी केले तर बाळासाहेब शिंदे यांनी आभार मानले. सूत्रसंचालन पराग थोरात यांनी केले. अमृतवाहिनी इंडियन्स, सुपर किंग्स अमृतवाहिनी, अमृतवाहिनी रॉयल, अमृतवाहिनी नाईट रायडर, अमृतवाहिनी सन रायझर या विविध खेळाडूंनी महसूल मंत्री नामदार बाळासाहेब थोरात यांना मानवंदना दिली.