मुंबई-पुण्यातील पाहुण्यांनो गावाकडे येऊ नका
महसूल मंत्री थोरात

मुंबई-पुण्यातील पाहुण्यांनो गावाकडे येऊ नका

महसूल मंत्री थोरात : आलेच तर क्वारंटाईन व्हा

पारनेर |प्रतिनिधी|Parner

मुंबई-पुणे या शहरांशी पारनेर तालुक्यातील जनतेचा मोठा संपर्क आहे. या दोन शहरात करोनाचा प्रादुर्भाव वाढल्यामुळे या शहरातील जनता गावाकडे परतू लागले आहेत.

यामुळे करोनाचा धोका वाढला असून मुंबई-पुण्याच्या पाहुण्यांनो गावाकडे येवू नका आणि आले तर क्वारंटाईन व्हा, अशा सूचना महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी दिल्या.

तालुक्यातील करोना परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी शहरातील गणेश मंगल कार्यालय येथे महसूलमंत्री थोरात यांच्या उपस्थितीत बैठक आयोजित केली होती. यावेळी आ. निलेश लंके, आ.डॉ. सुधीर तांबे, पंचायत समिती सभापती गणेश शेळके जिल्हा परिषद सभापती काशिनाथ दाते, बाजार समिती सभापती प्रशांत गायकवाड, प्रांताधिकारी सुधाकर भोसले, तहसीलदार ज्योती देवरे, नगरपंचायत मुख्याधिकारी सुनिता कुमावत, पदाधिकारी, अधिकारी उपस्थित होते.

यावेळी मंत्री थोरात म्हणाले, पारनेर तालुक्यातील जनतेचा मुंबईची मोठा संपर्क असल्याने मुंबईतील पारनेरकर यांनी गावाकडे आल्यानंतर स्वतःहून चौदा दिवस क्वारंटाईन व्हावे. तालुक्यातील रुग्ण संख्येचा आकडा वाढू नये, यासाठी प्रशासनाबरोबरच नागरिकांनीही काळजी घेणे गरजेचे आहे. करोनाच्या या लाटेमध्ये इतर भागातील लोक गांभीर्याने घेत नाहीत. पारनेर तालुक्यात मात्र कोठेही लोक फिरताना दिसत नाहीत.

नागरिकांनी येत्या 30 तारखेपर्यंत अशी खबरदारी घेतल्यास करोना बाधित रुग्णांचा आकडा निश्चितच खाली येण्यास मदत होईल असेही महसूलमंत्री थोरात यांनी सांगितले. पारनेर शहरासह भाळवणी, टाकळी ढोकेश्वर, जवळा येथील रुग्णांचा आकडा का मोठा आहे, अशी ना. थोरात यांनी विचारणा केल्यावर भाळवणी हे बाजारपेठेचे गाव आहे. या ठिकाणी रस्त्यालाच बाजार भरत असल्याने ये-जा करणार्‍यांची पूर्वी गर्दी व्हायची. त्यामुळे रुग्ण संख्येत वाढ झाली असून आता हा रस्त्यावरील बाजार प्रशासनाने बंद केला असल्याचे प्रांताधिकारी सुधाकर भोसले यांनी सांगितले.

रेमडीसीवर इंजेक्शन उत्पादनानंतर 15 दिवसानंतर या इंजेक्शनचा वापर करता येतो. येत्या दोन-तीन दिवसात रेमडेसीवरचा पुरवठा मुबलक प्रमाणात होईल, ऑक्सिजनाचा तुटवडा ही जाणवणार नाही. सुरुवातीस एकूण रुग्ण संख्येच्या 60 टक्के राज्यात रुग्ण होते आज 30 टक्क्यांपर्यंत खाली आहोत असे ना. थोरात म्हणाले.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com