15 ऑक्टोबरला काँग्रेसची संगमनेरात शेतकरी बचाव रॅली - ना. थोरात

प्रभारी एच. के. पाटील, अशोकराव चव्हाण, ना. थोरात, खा. सावत यांची उपस्थिती
15 ऑक्टोबरला काँग्रेसची संगमनेरात शेतकरी बचाव रॅली - ना. थोरात

संगमनेर |प्रतिनिधी| Sangmner

केंद्र सरकारने घाईघाईने 3 शेतकरी विरोधी कायदे मंजूर केले आहेत त्याचा आम्ही काळे कायदे म्हणून उल्लेख करतो.

या काळ्या कायद्यांविरोधात काँग्रेसने महाराष्ट्रातही आंदोलन सुरु केले आहे. याचाच पुढचा टप्पा म्हणून आता 15 ऑक्टोबरला दुपारी 4.00 वा. महाराष्ट्रात शेतकरी बचाओ व्हर्च्युअल रॅली आयोजित केली आहे. या रॅलीचे 10 हजार गावात एकाचवेळी आयोजन केले जाणार आहे. सोशल मीडियावरही ही रॅली पाहता येईल अशी व्यवस्था करण्यात आली असून 50 लाख शेतकर्‍यांपर्यंत पोहचण्याचा प्रयत्न आहे.

संगमनेरमधील कार्यक्रमासाठी काँग्रेसचे प्रभारी एच. के. पाटील, अशोकराव चव्हाण, खा. राजीव सातव उपस्थित राहणार असल्याची माहिती महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष तथा महसूल मंत्री ना. बाळासाहेब थोरात यांनी दिली.

या रॅलीबाबत बोलतांना ना. थोरात म्हणाले, केंद्र सरकारने लादलेल्या या काळ्या कायद्यांना राष्ट्रवादी काँग्रेसनेही विरोध दर्शवला आहे तसेच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासोबतही या विषयावर बैठक झाली आहे. भाजप सरकारने बहुमताच्या जोरावर लोकशाही व संसदेचे सर्व नियम पायदळी तुडवून शेतकर्‍यांवर हे कायदे लादले आहेत. उद्योगपतींच्या फायद्यासाठी आणलेल्या या काळ्या कायद्यांमुळे देशातील शेतकरी उद्धवस्त होणार असून शेतकर्‍यांना उद्योगपतींचे गुलाम बनवण्याचा हा डाव आहे.

केंद्र सरकारच्या या काळ्या कायद्यांविरोधात काँग्रेस पक्षाचे आंदोलन सुरु असून 15 ऑक्टोबरला संध्याकाळी 4 वाजता शेतकरी बचाओ रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे. शेतकरी बचाव रॅलीचा प्रमुख कार्यक्रम राज्यात पाच ठिकाणी असणार आहे. संगमनेर येथील मुख्य कार्यक्रमाला महाराष्ट्र काँग्रेसचे प्रभारी एच. के. पाटील, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष व महसूलमंत्री बाळासाहेब थोरात,

सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोकराव चव्हाण, आदिवासी विकास मंत्री के. सी. पाडवी, अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सचिव व गुजरातचे प्रभारी खा. राजीव सातव आणि अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सचिव व महाराष्ट्राचे सहप्रभारी बी. एम. संदीप यांच्यासह काँग्रेस पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत. हे सर्व कार्यक्रम एकमेकाशी इंटर कनेक्ट असून पाच वेगवेगळ्या ठिकाणांहून काँग्रेस नेते राज्यातील शेतकर्‍यांशी संवाद साधणार आहेत.

दुसरा कार्यक्रम औरंगाबाद येथे होणार असून या रॅलीला वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे कार्याध्यक्ष, माजी मंत्री बसवराज पाटील हे उपस्थित राहणार आहेत. तर अमरावती येथील शेतकरी बचाव रॅली महिला व बाल विकास मंत्री यशोमती ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली होणार आहे.

नागपूरमध्ये ऊर्जा मंत्री नितीन राऊत, पशुसंवर्धन व दुग्धविकास मंत्री सुनिल केदार, मदत व पुनवर्सन व बहुजन कल्याण मंत्री विजय वडेट्टीवार यांच्या उपस्थितीत ही रॅली संपन्न होणार आहे तर कोकण विभागातील रॅली महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे कार्याध्यक्ष मुझ्झफर हुसेन यांच्या उपस्थितीत होणार आहे.

राज्यात 10 हजारांपेक्षा जास्त गावांमध्ये स्क्रीन, टीव्ही, लॅपटॉप, संगणकाच्या माध्यमातून व्हर्चुअल सभांचे प्रक्षेपण केले जाणार आहे.

तसेच महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या facebook.com/incmaharashtra Twitter: twitter.com/incmaharashtra, YouTube: youtube.com/incmaharashtra शेतकरी बचाओ मेळाव्याचे थेट प्रक्षेपण करण्यात येणार आहे.

थोरात कारखान्याचा स. 10.30 वा. गळीत हंगाम शुभारंभ

सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात सह. साखर कारखान्याचा सन 2020-2021 चा गळीत हंगाम शुभारंभ गुरुवार दि. 15 ऑक्टोबर 2020 रोजी सकाळी 10.30 वा महाराष्ट्र काँग्रेसचे प्रभारी एच. के.पाटील, महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री व सार्वजनिक बांधकाम मंत्री नामदार अशोकराव चव्हाण यांच्या हस्ते आणि काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष व महसूलमंत्री नामदार बाळासाहेब थोरात यांच्या अध्यक्षतेखाली व खासदार राजीव सातव, काँग्रेसचे सचीव वामसी चांद रेड्डी, आमदार डॉ. सुधीर तांबे व मान्यवरांच्या उपस्थित आयोजित करण्यात आला असल्याची माहिती कारखान्याचे चेअरमन बाबा उर्फ प्रतापराव ओहोळ यांनी दिली आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com