करोनापासून स्वतः व कुटुंबाला वाचविण्यासाठी नियमांचे पालन करा - ना. बाळासाहेब थोरात

करोनापासून स्वतः व कुटुंबाला वाचविण्यासाठी 
नियमांचे पालन करा - ना. बाळासाहेब थोरात

संगमनेर |प्रतिनिधी| Sangmner

करोनाच्या दुसर्‍या लाटेत वाढणारी रुग्ण संख्या ही अत्यंत चिंताजनक असून या संकटातून स्वत: व स्वत:च्या कुटुंबियांना वाचविण्यासाठी

प्रत्येकाने विनाकारण घराबाहेर पडणे टाळा तसेच भावनेपेक्षा वस्तुस्थितीला महत्त्व देत मास्क वापरण्यासह शासनाच्या सर्व नियमांचे कडक पालन करा, असे आवाहन महसूलमंत्री नामदार बाळासाहेब थोरात यांनी जनतेला केले आहे. तसेच गावोगावची रुग्ण वाढ रोखण्यासाठी प्रशासनाने कडक अंमलबजावणी करावी अशा सूचनाही दिल्या आहेत.

नवीन नगर रोड येथील यशवंतराव चव्हाण मध्यवर्ती प्रशासकीय इमारतीमध्ये करोना आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी आमदार डॉ. सुधीर तांबे, नगराध्यक्षा सौ. दुर्गाताई तांबे, सभापती सौ. सुनंदाताई जोर्वेकर, उपसभापती नवनाथ अरगडे, उपनगराध्यक्ष शैलेश कलंत्री, प्रांताधिकारी डॉ. शशिकांत मंगरुळे, तहसीलदार अमोल निकम, उपविभागीय पोलीस अधिकारी राहुल मदने, मुख्याधिकारी डॉ. सचिन बांगर, गट विकास अधिकारी सुरेश शिंदे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. सुरेश घोलप, डॉ. संदीप कचोरिया, डॉ. राजकुमार जर्‍हाड, कृषी विभागाचे सुधाकर बोराळे, पोलीस निरीक्षक मुकुंद देशमुख, तालुका पोलीस निरीक्षक पांडुरंग पवार, सार्वजनिक बांधकामचे आर. आर. पाटील, महेश वाव्हळ आदी उपस्थित होते.

यावेळी नामदार बाळासाहेब थोरात यांनी संगमनेर शहरासह तालुक्यातील प्रत्येक गावातील करोना स्थितीचा आढावा घेतला. तसेच उपलब्ध बेड संख्या, अत्यावश्यक व्हेंटिलेटरची गरज, लसीकरणाची व्यवस्था कोव्हिड केअर सेंटर बाबत करावयाच्या उपाययोजना आदींचा आढावा घेतला.

याप्रसंगी नामदार थोरात म्हणाले की, करोना हे मानव जातीवरील संकट आहे. शासनाने करोना रोखण्यासाठी अत्यंत प्रभावी उपाययोजना आखल्या आहेत. त्याला नागरिकांची साथ मिळणे अत्यंत गरजेचे आहे. या संकटातून स्वत:ला व स्वत:च्या कुटुंबियांना वाचवण्यासाठी प्रत्येकाने विनाकारण घराबाहेर पडणे टाळले पाहिजे. तसेच मास्कचा वापर करणे अत्यंत गरजेचे आहे. तसेच खेडोपाडी व घरगुती होणारे समारंभ अगदी कटाक्षाने टाळले पाहिजेत. सध्याच्या या संकटात भावनेपेक्षा वस्तुस्थितीला महत्त्व द्या.

काही ठिकाणी वाढणारी मृत्यू संख्या ही अत्यंत चिंताजनक आहे. याबाबत प्रशासनाने जास्तीत जास्त काळजी घेणे गरजेचे आहे. करोनाला घाबरून जाऊ नका. मात्र निष्काळजीपणा सुद्धा करू नका. प्रशासन आपल्या पाठीशी आहे. गावोगावी करोना दक्षता समिती स्थापन करून प्रत्येकाने आपल्या गावाची व विभागाची काळजी घ्या. आपल्या परिसरात करोना वाढणार नाही. याची दक्षता घ्यावी.

एका रुग्णापाठोपाठ वीस जणांची तपासणी करताना टेसिंग, टेस्टिंग व ट्रिटमेंट या त्रिसूत्रीचा वापर करा. लसीकरणाचा वेग वाढवा. तसेच रुग्णांना लवकरात लवकर चांगली सेवा देण्यासाठी आरोग्य विभागाने काम करावे, अशा सूचनाही दिल्या.

आमदार डॉ. तांबे म्हणाले, काही लक्षणे आढळल्यास नागरिकांनी तातडीने जवळच्या वैद्यकीय अधिकार्‍यांचा सल्ला घ्यावा. अजूनही ग्रामीण भागांमध्ये बरेच नागरिक काही लक्षणे आढळली तरी चार-पाच दिवस अंगावर काढतात आणि त्यामुळे करोनाचा प्रादुर्भाव वाढतो आहे. थोडे जरी काही लक्षण आढळले तरी तातडीने वैद्यकीय अधिकार्‍यांचा सल्ला घ्या. प्रशासनाला सूचना देताना स्कॅन रिपोर्ट व करोना टेस्टिंगचे रिपोर्ट तातडीने मिळविण्यासाठी प्रयत्न करा असे ते म्हणाले.

यावेळी प्रांताधिकारी डॉ. शशिकांत मंगरुळे म्हणाले, संगमनेरमध्ये वैद्यकीय सेवा चांगली असल्याने आसपासच्या सर्व तालुक्यांतील नागरिक मोठ्या संख्येने येथे येत आहेत. त्यामुळे रुग्ण संख्या वाढताना दिसत आहे. तालुक्यातील व आलेल्या रुग्णांना चांगली सेवा देण्यासाठी प्रशासन पूर्ण क्षमतेने काम करत आहे. मात्र यामध्ये नागरिकांचाही सहभाग अत्यंत महत्त्वाचा आहे. प्रत्येकाने संयम, शिस्त पाळावी, असे आवाहन त्यांनी केले. यावेळी तालुक्यातील करोना परिस्थितीची माहिती तहसीलदार अमोल निकम यांनी दिली.

थ्री टी योजनेचा प्रभावी वापर करा, दक्षता समित्या स्थापन करा

शहराच्या आसपास व काही मोठ्या गावांमध्ये रुग्ण वाढले असून याबाबत जास्तीत जास्त जागृती करताना एखाद्या गावात किंवा कुटुंबात करोनाचा रुग्ण आढळला तर त्याच्या आजूबाजूच्या सर्व नातेवाईकांची तातडीने तपासणी करून ट्रेसिंग, टेस्टिंग व ट्रीटमेंट या त्रिसूत्रीचा वापर करा अशा सूचना नामदार बाळासाहेब थोरात यांनी दिल्या आहेत. तसेच गावोगावी करोना दक्षता समिती स्थापन करून करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी एकत्रितपणे काम करा असे ते म्हणाले.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com