ना. थोरातांनी घेतला संगमनेर तालुक्यातील गावनिहाय करोना आढावा
सार्वमत

ना. थोरातांनी घेतला संगमनेर तालुक्यातील गावनिहाय करोना आढावा

Arvind Arkhade

संगमनेर|प्रतिनिधी|Sangmner

संगमनेर शहर व तालुक्यात वाढणारी रुग्ण संख्या थांबविण्यासाठी प्रशासनाने अधिक खबरदारी घ्यावी त्याचबरोबर करोनाची साखळी तोडण्यासाठी प्रत्येक नागरिकाने शासनाच्या सर्व नियमांचे काटेकोर पालन करताना अधिक सतर्कता बाळगावी असे आवाहन महसूल मंत्री नामदार बाळासाहेब थोरात यांनी केले आहे. यावेळी ना. थोरात यांनी तालुक्यातील गावनिहाय करोना उपाययोजनेबाबत आढावा घेतला.

कारखाना कार्यस्थळावर कोरोना परिस्थिती व उपाययोजना बाबत प्रशासकीय अधिकार्‍यांची आढावा बैठक झाली. यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी नाशिक पदवीधर मतदारसंघाचे आमदार डॉ. सुधीर तांबे, प्रांताधिकारी डॉ. शशिकांत मंगरुळे, तहसीलदार अमोल निकम, डॉ. हर्षल तांबे, उपविभागीय पोलिस अधिकारी रोशन पंडित, गटविकास अधिकारी सुरेश शिंदे, नगरपालिकेचे मुख्याधिकारी डॉ. सचिन बांगर, ग्रामीण रुग्णालयाचे डॉ. संदीप कचोरीया, पोलीस निरीक्षक अभय परमार, सुनील पाटील आदी उपस्थित होते.

तसेच गुंजाळवाडी येथील कृष्णा लॉन्स मध्ये महसूल मंत्री नामदार बाळासाहेब थोरात यांनी शहरालगत असलेल्या करोना बाधित गावांमधील प्रमुख नागरिकांची बैठक घेऊन त्यांना अधिक सतर्कतेच्या सूचना दिल्या.

नामदार थोरात म्हणाले, करोना हे आपल्या सर्वांवरील मोठे संकट आहे ते रोखण्यासाठी प्रत्येक नागरिकाने अधिक सतर्कता बाळगली पाहिजे. लॉकडाऊनच्या शिथीलतेनंतर काही नागरिकांमध्ये हलगर्जीपणा वाढला आहे. त्याचे रूपांतर रुग्ण वाढी मध्ये होत आहे. हे अत्यंत दुर्दैवी आहे म्हणून प्रत्येकाने काटेकोरपणे शासनाचे नियम पाळावे. प्रशासन करोना रोखण्यासाठी काम करत आहे, त्यांना मदत करणे हे नागरिकांचे कर्तव्य आहे.

आपल्या परिसरात बाहेरून आलेल्या व्यक्तींची कल्पना लगेचच प्रशासनाला द्या. प्रत्येकाने सोशल डिस्टंसिंग पालन करा. विनाकारण घराबाहेर पडणे टाळा, मास्कचा वापर करा, हॅण्ड सॅनिटायझरचा वारंवार वापर करा या सर्व बाबी केल्यास आपण करोना वाढ रोखू शकतो. करोनाची साखळी पुर्णपणे तोडण्यासाठी नागरिकांनी खबरदारी घेणे हाच सर्वोत्तम पर्याय आहे. याचबरोबर ग्रामीण भागामध्ये करोनाबाबत अधिक जगजागृती होण्याकरता प्रशासनाने सोशल माध्यमांसह गावोगावी सूचना द्याव्यात असेही ते म्हणाले.

आमदार डॉ. तांबे म्हणाले की, लॉकडाऊन शिथीलता ही पूर्णपणे मोकळीक नाही. करोना कुणालाही होऊ शकतो. त्यामुळे कोणीही अविर्भावात राहू नये. प्रत्येकाने खबरदारी घेणे हेच महत्त्वाचे आहे. भावनेपेक्षा सत्याला महत्व द्या. करोना हे संपुर्ण जगावरील संकट आहे. महसूल मंत्री नामदार बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली प्रशासन करोना नियंत्रणासाठी राज्यात व तालुक्यात चांगले काम करत आहे.

तालुक्यातील विविध डॉक्टर्स सामाजिक बांधिलकी ठेवून या लढ्यात सहभागी झाले आहे. प्रशासनाला आपण साथ देणे गरजेचे आहे म्हणून प्रत्येकाने सोशल डिस्टन्स चा वापर करणे गरजेचे आहे. हवामान बदलामध्ये विविध साथींचे आजार होऊ शकतात म्हणून काळजी घ्या, घाबरून जाऊ नका असे आवाहनही त्यांनी केले.

यावेळी प्रांताधिकारी शशिकांत मंगरुळे यांनी तालुक्यातील सद्य परिस्थिती व केलेल्या उपाययोजना बाबतची माहिती महसूल मंत्री नामदार थोरात यांनी दिली. यावेळी महसूलमंत्री थोरात यांनी प्रशासनाला काही सूचना केल्या. तसेच प्रत्येक गावाचा आढावा घेवून कार्यकर्त्यांना नागरिकांची खबरदारी घेण्याच्या सूचनाही नामदार थोरात यांनी दिल्या.

Deshdoot
www.deshdoot.com