तळेगाव दिघे |वार्ताहर| Talegav Dighe

अहमदनगर जिल्ह्यात महसूल विभागाने राबविलेल्या महसूल विजय सप्तपदी अभियानातून पोटखराब क्षेत्र लागवड लायक क्षेत्रात रुपांतरीत करून उतारे देणे,

पाणंद रस्ते बारामही करणे, खंडकर्यांचा प्रश्न सोडविणे, स्मशानभूमी जागा हस्तांतरणांसह अनेक प्रलंबित प्रश्न सोडविण्यास नक्कीच मदत होईल. महसूल विजय सप्तपदी अभियानातून प्रलंबित प्रश्न मार्गी लागणार असून हे अभियान शेतकर्यांना लाभदायी ठरेल, असे प्रतिपादन महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी केले.

संगमनेर तालुक्यातील निमोण येथे महसूल विजय सप्तपदी अभियानांतर्गत महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्याहस्ते शेतकर्यांना पोटखराबा क्षेत्र उतारे प्रदान करण्यात आले. याप्रसंगी ते बोलत होते. यावेळी प्रांताधिकारी डॉ. शशिकांत मंगरुळे, तहसीलदार अमोल निकम, संगमनेर पंचायत समितीचे उपसभापती नवनाथ अरगडे, स्व. वसंतराव नाईक नागरी सहकारी पतसंस्थेचे अध्यक्ष इंजि. बी. आर. चकोर, उत्तर नगर जिल्हा युवक काँग्रेसचे कार्याध्यक्ष इंजि. सुभाषराव सांगळे, राजहंस दुध संघाचे उपाध्यक्ष साहेबराव गडाख, भारत मुंगसे आदी मान्यवर उपस्थित होते.

महसूलमंत्री थोरात म्हणाले, महसूल विभाग हा प्रशासनाचा कणा आहे. या विभागात आधुनिकता आणण्यासाठी आपण सातत्याने काम केले आहे. मागील काळात सुवर्ण जयंती राजस्व अभियान राबविले. ऑनलाईन सातबारा, ई-फेरफार, दाखल्यांचे शाळेत वाटप यासह खंडकरी शेतकयांचे प्रश्न मार्गी मार्गी लावले. या महिन्यात अहमदनगर जिल्हा महसूल विभागाचे विजय सप्तपदी अभियान घेतले असून त्यामध्ये अनेक प्रश्न मार्गी लागण्यास मदत होणार आहे. पोटखराबाचे क्षेत्र लागवडी योग्य करण्यासाठी उतारे आता शेतकर्यांचे दिले आहे. त्यामुळे शासकीय योजनांचा लाभ मिळणार आहे असेही, ते म्हणाले.

प्रांताधिकारी डॉ. शशिकांत मंगरुळे म्हणाले, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली व जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले यांच्या नेतृत्वाखाली संपूर्ण जिल्ह्यात महसूल विजय सप्तपदी अभियान राबविले जात आहे. नामदार थोरात यांनी महसूल विभागाला गती दिली. महसूल विभागामार्फत जास्तीत जास्त चांगले काम करून हा संगमनेर तालुका इतरांना मार्गदर्शक राहील यासाठी काम करू, असेही ते म्हणाले.

यावेळी भाऊसाहेब मंडलिक, सुदाम गायकवाड, सुदाम घुगे, रामचंद्र मंडलिक, साहेबराव गाडेकर, बाळासाहेब घुगे, तुकाराम घुगे, तुकाराम सांगळे, देवराम घुगे सहित शेतकरी उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक तहसीलदार अमोल निकम यांनी केले. अनिल घुगे यांनी सूत्रसंचालन केले.