तळेगाव दिघे |वार्ताहर| Talegav Dighe

जीवनात पाणी हे अत्यंत महत्त्वाचे आहे. पाणी असेल तर ग्रामीण भागासह शहरी भागात समृद्धी निर्माण होते.

पाणी बचत, हीच पाणी निर्मिती असून जलसंवर्धन व संधारण होणे अत्यंत गरजेचे आहे. लोकसहभागातून जलसंवर्धन झाल्यास गावे समृद्ध होतील, असे असे प्रतिपादन राज्याचे महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी केले.

संगमनेर तालुक्यातील पारेगाव खुर्द येथे क्रॉम्प्टन ग्रीव्हज सीएसआर फंड, वनराई संस्था आणि जयहिंद लोक चळवळीच्या माध्यमातून पाणलोट क्षेत्र विकासाच्या कार्यक्रमाचे भूमिपूजन महसूलमंत्री थोरात यांच्या हस्ते करण्यात आले. प्रसंगी ते बोलत होते.

यावेळी वनराई संस्थेचे अध्यक्ष रविंद्र धारिया, जयहिंद लोकचळवळीचे संस्थापक आमदार डॉ. सुधीर तांबे, वनराई संस्थेचे सचिव अमित वाडेकर, प्रकल्प संचालक जयवंत देशमुख, आकाश शिंदे, अॅड. अजित वाडेकर, चंद्रकांत चव्हाण, थोरात साखर कारखान्याचे अध्यक्ष बाबा ओहोळ, जिल्हा परिषद सदस्य महेंद्र गोडगे पाटील, अजय फटांगरे, इंजि. बी. आर. चकोर, इंजि. सुभाषराव सांगळे, बाबासाहेब कांदळकर, सचिन दिघे, अॅड. सुहास आहेर उपस्थित होते.

मंत्री थोरात म्हणाले, पारेगाव खुर्दमध्ये सर्व गावकर्यांनी एकत्र येऊन केलेली विविध कामे उल्लेखनीय आहेत. जलसंवर्धनाचे व जलसंधारणाचे काम वनराई व संस्थेच्या माध्यमातून या ठिकाणी होते आहे. सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात आणि फादर बाखर यांच्या माध्यमातून संगमनेर तालुक्यामध्ये पाणलोटाचा मोठा कार्यक्रम राबविला गेला. विविध गावांमध्ये या अंतर्गत आजही कामे चालू आहे. प्रत्येक पाण्याचा थेंब न थेंब जमिनीत जिरला पाहिजे, जिरवला पाहिजे. पाणी बचत हीच पाणी निर्मिती आहे. यापुढील काळात पाण्यासाठी अडचण होऊ नये म्हणून पाणी स्वावलंबनासाठी जलसंधारण अत्यंत महत्त्वाचे आहे. गावातले पाणी गावात जिरवा, गट तट विसरून गावच्या विकासासाठी एकत्र या. जल, जंगल आणि जमीन या त्रिसूत्रीचा वापर शेतकर्यांच्या जीवनात आनंद निर्माण करीत असल्याचे ते म्हणाले.

आमदार डॉ. तांबे म्हणाले, सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात यांच्या दूरदृष्टीतून भविष्यकाळाचा वेध घेत दंडकारण्याच्या माध्यमातून पर्यावरण संतुलनाचे काम केले. फादर बाखर यांच्यासमवेत त्यांनी दुष्काळी भागात पाणलोटाचे मोठे काम उभे केले.

मिशनरी वृत्तीने या समाजाचे नेतृत्व आणि शिक्षण, आरोग्य, सहकार, जोडधंदे, पर्यावरण, पाणलोट, जंगल निर्मिती यामध्ये दिलेले योगदान मोठे आहे. पारेगाव खुर्द मध्ये क्रॉम्टन सीएसआर फंड वनराईच्या माध्यमातून निश्चित चांगले काम होईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

वनराईचे रविंद्र धारिया म्हणाले, महात्मा गांधी म्हणाले होते, खेड्याकडे चला खेडी स्वयंपूर्ण झाली तर देश स्वयंपूर्ण होईल. संगमनेर तालुक्यातील खेडे ही ग्रामीण अर्थव्यवस्थेत मजबूत आहे. येथील सहकार महसूलमंत्री नामदार बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखाली सुरु असून पारेगाव खुर्दमध्ये आपण अधिकाधिक चांगले काम करा व पारेगाव हे मॉडेल बनवा असेही ते म्हणाले.

प्रास्ताविक संस्थेचे सचिव अमित वाडेकर यांनी केले. सूत्रसंचालन प्रा. बाबा खरात यांनी केले. सखाराम शरमाळे यांनी आभार मानले.