अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

भाजपची राज्यामध्ये सध्या कुटील कारस्थाने चालू आहेत. महाविकास आघाडीचे सरकार या आरोपांतून सहीसलामत बाहेर पडेल, असा विश्वास महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी व्यक्त केला.

मंत्री थोरात यांच्या उपस्थितीत शनिवारी शहरातील काँग्रेस पदाधिकार्यांचा मेळावा आयोजित करण्यात आला होता. त्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी बांगलादेशच्या दौर्यावर आहेत. गरीब असलेला बांगलादेश आता प्रगतीत भारताच्या पुढे गेला आहे.

बांगलादेशाची अर्थव्यवस्था भारतापेक्षा गतिमान झाली आहे. नोटबंदी, जीएसटी यामुळे भारत रसातळाला गेला आहे. बांगलादेशच्या निर्मितीत इंदिरा गांधींचा मोठा वाटा होता. मोदी भारतात नाही तर परदेशात गेल्यावर हे मान्य करत आहेत, असा टोलाही थोरात यांनी लगावला. यूपीए सत्तेवर असताना गॅसदरात वाढ होताच रस्त्यावर उतरणारी भाजप आता कुठे गायब झाली आहे, असा प्रश्न थोरात यांनी उपस्थित केला.

केंद्रातील भाजप सरकार राज्यघटनेप्रमाणे काम करण्याऐवजी भेदभाव निर्माण करत, समाजात दरी वाढवत आपली मतांची पोळी भाजून घेत आहे. विकासासाठी त्यांनी आतापर्यंत काय केले? असा प्रश्नही थोरात यांनी केला.

राज्याचे मुख्य सचिव यांच्यावर सरकारचा दबाव नाही. रश्मी शुल्का यांनी चुकीचा अहवाल दिला. या प्रकरणात भाजपकडून जनतेची दिशाभूल करण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप मंत्री थोरात यांनी केला.