मंत्री थोरात यांनी घेतला करोना व गणेश विसर्जनाचा आढावा

मंत्री थोरात यांनी घेतला करोना व गणेश विसर्जनाचा आढावा

संगमनेर |प्रतिनिधी| Sangmner

संगमनेर शहर व तालुक्यातील करोना साखळी संपुष्टात आणण्यासाठी करावयाच्या उपाययोजना आणि शहरातील गणेश विसर्जन

शांततेत पार पाडण्यासाठी प्रशासन व शांतता कमिटीने केलेल्या उपाययोजना बाबतची आढावा बैठक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष व महसूलमंत्री नामदार बाळासाहेब थोरात यांनी घेतली.

अमृतवाहिनी अभियांत्रिकी महाविद्यालयात अमृत कला मंच येथे सोशल डिस्टन्सचे पालन करून झालेल्या या प्रशासनाच्या आढावा बैठकीप्रसंगी महसूलमंत्री नामदार बाळासाहेब थोरात, आ. डॉ. सुधीर तांबे नगराध्यक्ष दुर्गाताई तांबे, अ‍ॅड. आर. बी. सोनवणे, प्रांताधिकारी शशिकांत मंगरुळे, तहसीलदार अमोल निकम, डीवायएसपी रोशन पंडीत, नगरपालिकेचे मुख्याधिकारी डॉ. सचिन बांगर, पंचायत समिती बीडीओ सुरेश शिंदे, पोलीस निरीक्षक अभय परमार, तालुका पोलीस निरीक्षक सुनील पाटील, तालुका आरोग्य अधिकारी सुरेश घोलप आदींसह प्रशासकीय अधिकारी उपस्थित होते.

या बैठकीत तालुका व शहरातील करोनाची साखळी पूर्ण तोडण्यासाठी प्रशासनाकडून केल्या जात असलेल्या उपाययोजना तसेच गणेश विसर्जनाच्या पार्श्वभूमीवर केलेल्या विविध उपाययोजनांची माहिती नामदार बाळासाहेब थोरात यांनी घेऊन प्रशासकीय अधिकार्‍यांना काही सूचना केल्या.

याप्रसंगी नामदार थोरात म्हणाले की, राज्यात व तालुक्यात करोनाची साखळी संपुष्टात आणण्यासाठी प्रशासन चांगले काम करत आहे मात्र त्याला नागरिकांनी साथ देणे गरजेचे आहे. ग्रामीण भागामध्ये होणारे घरगुती समारंभ नागरिकांनी जाणीवपूर्वक टाळले पाहिजे. हा संकटाचा काळ आहे या काळात भावनेपेक्षा वस्तुस्थितीला प्रत्येकाने महत्त्व द्यावे.

गणेशोत्सव हा महाराष्ट्रातील धामधुमीचा उत्सव असतो मात्र करोनाच्या संकटामुळे त्यावर विरजण पडले आहे. आज होणार्‍या गणेशोत्सवात नागरिकांनी नगरपालिकेने निर्माण केलेल्या संकलन केंद्रावर आपल्या घरातील गणेश मूर्ती व सामूहिक गणेश मूर्ती जमा कराव्यात.

नदीकाठी कोणीही गर्दी करू नये पाण्याचा वाढता प्रवाह धोकेदायक असून कोणीही त्याठिकाणी जाऊ नये. दिलेल्या ठिकाणीच गणेश मूर्ती व निर्माल्य यांचे संकलन करावे. तसेच गर्दी टाळणे हे आपले प्राथमिक उद्दिष्ट असून त्यामुळे करोनाची साखळी वाढण्यापासून आपण रोखू शकतो या कामी प्रत्येक नागरिकांनी सहकार्य करावे तसेच प्रशासनानेही या काळात सतर्क राहावे अशा सूचना नामदार थोरात यांनी दिल्या.

आ. डॉ. तांबे म्हणाले, गणेशोत्सव हा प्रत्येकाचा आनंदाचा उत्सव असतो. मोहरम हा सण शांततेत झाला. हिंदू बांधवांनी व सर्व धर्मियांनीही गणेश उत्सव साध्या पद्धतीने घरात केला आहे. गेली दहा दिवस शांततेचे वातावरण आहे.

गणेश विसर्जनाच्या दिवशीही सर्वांनी प्रशासनाला सहकार्य करत नगरपालिकेने निर्माण केलेल्या तलावात व संकलन केंद्रात आपले गणपती जमा करावेत असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.

नगराध्यक्ष दुर्गाताई तांबे म्हणाल्या, गणेश विसर्जनाच्या दिवशी सर्व नगरपालिकेचे कर्मचारी नागरिकांच्या मदतीसाठी तत्पर राहणार असून प्रत्येकावर जबाबदारी देण्यात आली आहे. प्रत्येक नागरिकाला आवाहन आहे की नदीकाठी कुणी जाऊ नये, गर्दी करू नये, आपल्या गणेश मूर्ती जवळच्या संकलन केंद्रावर जमा कराव्या व प्रशासनाला सहकार्य करावे असेही त्या म्हणाल्या.

यावेळी तालुक्यातील विविध गावांच्या परिस्थितीचा आढावा प्रांताधिकारी यांनी महसूलमंत्री नामदार थोरात यांना दिला तर कोव्हिड केअर सेंटरमधील नागरिकांची स्थिती, त्यांना पुरवल्या जाणार्‍या सुविधांची माहिती तहसीलदार अमोल निकम यांनी दिली.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com