संगमनेर |प्रतिनिधी| Sangmner

युवकांच्या क्रीडागुणांना वाव देण्यासाठी राजवर्धन युथ फाऊंडेशनच्या वतीने सातव्या वर्षी होतकरू ग्रामीण खेळाडूंना चांगले व्यासपीठ मिळाले असून

क्रिकेटमुळे चांगले आरोग्य, सांघीक भावना व एकात्मता वाढीस लागत असल्याचे प्रतिपादन महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी केले.

कोल्हेवाडी फाटा समनापूर येथे सुरु असलेल्या ‘नामदार चषक 2021’ भेटप्रसंगी ते बोलत होते. यावेळी अहमदनगरचे शहराध्यक्ष किरण काळे, अजय फटांगरे, भास्कर शेरमाळे, सुहास आहेर, सोमेश्वर दिवटे, निखील पापडेजा, सिध्दार्थ थोरात, तहसीलदार अमोल निकम आदी मान्यवर उपस्थित होते.

ना. थोरात म्हणाले, संगमनेरसारख्या ग्रामीण भागात मागील सलग 7 वर्षे ही स्पर्धा सुरु असल्याने अनेकांना संधी मिळाली आहे. संगमनेर तालुका हा विकासातून अग्रेसर असलेला तालुका आहे. येथे युवकांसाठी विविध उपक्रम सुरु करुन त्यांना मोठे व्यासपीठ निर्माण करुन दिले आहे.

संगमनेरच्या अजिंक्य राहणे यांनी देशपातळीवर नेतृत्व करताना क्रिकेटमध्ये ऑस्ट्रेलियाला त्यांच्या देशात जाऊन हरविले, हा संगमनेर करांसाठी व अहमदनगर जिल्ह्यासाठी मोठा ऐतिहासिक क्षण होता. खेळामधून मन एकत्र होत असून एकात्मता वाढीस लागते. चांगल्या आयोजनाने ही नामदार चषक स्पर्धा राज्यात लौकीकास आली असल्याचेही ते म्हणाले.

या लीग मॅचमुळे संगमनेरकरांना आयपीएलचा थरार अनुभवता येत असून प्रत्येक मॅचमध्ये होणारी नेत्रदीपक षटकार, चौकार यांची फटकेबाजी हे यावर्षी स्पर्धेचे वैशिष्ट्य राहिले आहे. या प्रिमिअर लीगच्या यशस्वीतेसाठी राजवर्धन युथ फाऊंडेशनचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते विशेष प्रयत्न करीत आहेत.