ताळेबंद तपासूनच साखर कारखान्यांना कर्जपुरवठा करावा

ना.थोरात : संचालकांनी विश्वस्त म्हणून काम करावे
ताळेबंद तपासूनच साखर कारखान्यांना कर्जपुरवठा करावा

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

जिल्ह्यातील सामान्य व्यक्तींनी मोठ्या विश्वासाने जिल्हा बँकेत ठेवी ठेवल्या आहेत. यामुळे बँकेत आठ हजार कोटींहून अधिकच्या ठेवी जमा झाल्या आहेत.

बँकेच्या संचालकांनी याठिकाणी विश्वस्त म्हणून काम करावे. जिल्ह्यातील साखर कारखानदारांच्या मागे बँक उभी आहे. मात्र, साखर कारखान्यांना कर्ज देताना ते कर्ज कशा पध्दतीने परतफेड होणार, याचा अभ्यास करण्यासोबतच साखर कारखान्यांचे ताळेबंद तपासूनच त्यांना कर्ज द्यावे, अशा सूचना राज्याचे महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी केल्या.

जिल्हा बँकेच्या 63 व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत मंत्री थोरात बोलत होते. कोव्हिडच्या पार्श्वभूमीवर ही सभा ऑनलाईन झाली. बँकेच्या सभागृहात संचालक आणि मान्यवर तर सभासद हे ऑनलाईन सभेत सहभागी झाले.

यावेळी राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे, उपाध्यक्ष माधवराव कानवडे, ज्येष्ठ संचालक अ‍ॅड. भानुदास मुरकुटे, आ. मोनिका राजळे, शिवाजी कर्डिले, गणपतराव सांगळे, करण ससाणे, अमोल राळेभात, आशा तापकिर, अमोल भांगरे, मुख्य कार्यकारी अधिकारी रावसाहेब वर्पे, जिल्हा परिषद उपाध्यक्ष प्रताप शेळके, नागवडे साखर कारखान्यांचे चेअरमन राजेंद्र नागवडे, बाळासाहेब सांळुके आदी व्यासपिठावर उपस्थित होते.

यावेळी मार्गदर्शन करतांना मंत्री थोरात म्हणाले, बँकेच्या संचालकांनी बैठकांना उपस्थित राहणे अनिर्वाय असून आपले विचार मांडले पाहिजेत. जिल्हा बँंक जिल्ह्यातील कारखाने, दुध संघ यांच्या विकासाची मातृसंस्था आहे. यामुळे या संस्थेला जपले पाहिजे. बँकेच्या माध्यमातून सोसायट्या सक्षम करण्याचा प्रयत्न करा. बँकेच्या कामकाजासाठी पुरसे मनुष्यबळ उभे करा. कर्मचारी आणि मुख्य कार्यकारी अधिकारी यांना गुणवत्तापूर्ण कामकाजासाठी प्रशिक्षण देण्याच्या सुचना ना.थोरात यांनी दिल्या.

राज्यमंत्री तनपुरे यांनी जिल्ह्यातील शेतकर्‍यांच्या थकीत विजबिल भरण्यासाठी जिल्हा बँकेने शेतकर्‍यांना पिक कर्जाच्या रुपाने कर्ज उपलब्ध करून दिल्यास त्याचा फायदा शेतकर्‍यांना होणार आहे. राज्य सरकारची कर्जमाफी सुरू असतांना कोविड आला. त्याचा सरकारच्या तिजोरीवर ताण पडलेला असतांनाही राज्य सरकारने कर्जमाफी पूर्ण केली. तसेच राज्याच्या अर्थमंत्र्यांनी नियमित कर्जदारांना दिलासा देण्याचा शब्द दिलेला असून त्यावर कार्यवाही होईल, असा विश्वास व्यक्त केला.

वेळेवर कर्जफेड करणार्‍या संस्थांना वाढीव एक टक्के रिबिट देण्याचा बँकेचा प्रयत्न राहणार आहे. बँकेचे ग्रॉस एनपीए 366 कोटी असून यातील 100 कोटी साखर कारखान्यांचे असून उर्वरित कर्ज हे मध्यम आणि शेतकर्‍यांच्या शेतीच्या पाईपलाईनचे आहे. हे कर्ज फेडण्यासाठी राज्य सरकारने एक रक्कम कर्ज फेड योजना राबविल्यास एनपीए असणारे आणि अडकून पडलेले 250 कोटी रुपये बँकेला मिळणार आहेत. बँक लवकरच सेवा सोसायट्यांचे काम संगणिकृत करणार आहे. ही सभा 31 मार्च 2020 च्या ताळेबंदावर आधारित असून त्यानूसार अहवाल सादर करण्यात आल्याचे यावेळी बँक पदाधिकार्‍यांनी सांगीतले.

यावेळी श्रध्दांजलीचा ठराव उपाध्यक्ष कानवडे यांनी मांडला. विषय पत्रिकेवरील विषयांचे करण ससाणे यांनी वाचन केले तर त्यास राळेभात यांनी अनुमोदन दिले. यावेळी वर्पे यांनी सभेच्या नोटीसीचे वाचन केले. शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याचे उपाध्यक्ष सुधाकर रोहम, राजहंस दूध संघाचे गायकर यांनी सभेत भाग घेतला तर जिल्हा सहकारी बँकेचे माजी संचालक सबाजी गायकवाड व श्रीरामपूर मार्केट कमिटीचे माजी सभापती सचिन गुजर यांनी सभेमध्ये प्रत्यक्ष मुद्दे मांडून भाग घेतला.

बँकेची आर्थिक स्थिती

भाग भांडवल 270 कोटी

ठेवी 8 हजार 257 कोटी

निधी 719.19 कोटी

बाहेरील कर्ज 337.27 कोटी

गुंतवणूक 4 हजार 18 कोटी

कर्ज येणेबाकी 4 हजार 670 कोटी

नफा 39 कोटी 32 लाख

खेळते भांडवल 9 हजार 375. 45 कोटी

थकीत वीज बिल भरण्याचे बँकेचे संकेत

ऊर्जा राज्यमंत्री तनपुरे यांच्या भाषणातील महावितरणचे कृषी पंपाचे वीज बिल जिल्हा बँकेने भरावे, या मागणीचा आधार घेत महसूल मंत्री थोरात यांनी देखील हा मुद्दा संचालक मंडळासमोर मांडला. यात जिल्ह्यातील शेतकर्‍यांकडील वीज बिलाची रक्कम पाच हजार कोटी आहे. यातील सवलतीनुसार शेतकर्‍यांना 1 हजार 700 कोटी रुपये भरता येणार आहेत. यासाठी बँकेने सभासद शेतकर्‍यांसाठी पुढाकार घेऊन काय करता येईल, याचा विचार करावा, पीक कर्जाच्या माध्यमातून शेतकर्‍यांना कर्ज देवून त्यातून थकीत भरता येणे शक्य असल्याचे सांगितले. याबाबत मार्चअखेरनंतर ताळेबंद पाहून काय करता येणे शक्य आहे, यावर विचार करणार असल्याचे बँक पदाधिकार्‍यांनी सांगितले.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com