ना.थोरातांवर डॉ.नवलेंचा हल्लाबोल... आम्ही लाळघोटे आंडू-पांडू वाटलो का ?

वागणुकीवर लावले प्रश्नचिन्ह : दुजाभावाचा आरोप
ना.थोरातांवर डॉ.नवलेंचा हल्लाबोल... आम्ही लाळघोटे आंडू-पांडू वाटलो का ?

अकोले |प्रतिनिधी| Akole

महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांच्याविरोधातील सूर अकोले तालुक्यात वाढीस लागला आहे.

रविवारी करोना आढावा बैठकीत राष्ट्रवादीचे रवी मालुंजकर यांनी गोंधळ घातल्यानंतर सोमवारी मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे नेते डॉ.अजित नवले यांनी ना.थोरातांवर हल्लाबोल चढवला. त्यांच्या वर्तणुकीवर प्रश्नचिन्ह लावतानाच रेमडेसिवीर व ऑक्सीजन पुरवठ्यात दुजाभाव केला जात असल्याचा गंभीर आरोप त्यांनी केला.

रेमडेसीवीर व ऑक्सिजन न मिळाल्यामुळे ज्यांचे आई बाप करोनामुळे तडफडून मरतील, त्या तरुणांचा संताप अनावर झाल्याशिवाय राहणार नाही. भविष्यात त्याचा उद्रेक होण्याची शक्यता नाकारता येत नाही, असा इशारा देतानाच संगमनेर तालुक्यात आमच्या विविध संघटनांचेे कामगार आहेत, अशी आठवणही त्यांनी ना. थोरातांना करून दिली आहे.

रविवारी अकोले येथे महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या उपस्थितीत झालेल्या करोना आढावा बैठकीत गोंधळ झाला होता. या बैठकीबाबत डॉ.नवले यांनी सोशल मिडियावरून भुमिका मांडली. संगमनेरच्या तुलनेत अकोलेला रेमडेसिवीर व ऑक्सिजनचा पुरवठा कमी होत असल्याबद्दल डॉ.नवले यांच्या नेतृत्वाखाली शनिवारी अकोले येथे आंदोलन केले होते.

अकोले व संगमनेर असा वाद नाही, पण धाकट्या भावाच्या ताटात अधिक वाढणे ही मोठ्या भावाची जबाबदारी असते, याची आठवण त्यांनी ना.थोरातांना करून दिली. संगमनेर मध्ये सर्वच काही अलबेल आहे असेही काही नाही. मात्र वेळ राजकारण करण्याची नाही. माणूस म्हणून उभे राहण्याची आहे, असेही त्यांनी सांगितले.

दरम्यान, बैठकीसाठी तासभर नामदारांची वाट पाहत बसलेल्या स्थानिक आमदारांना न सांगताच बैठक सुरू करण्यात आली, हे कोणाच्या सांगण्यावरून केले? ज्यांनी करोना उपचाराबाबत आवाज उठवला, त्या आमच्यासारख्या कार्यकर्त्यांना बैठकीत टाळण्यात आले, असा आक्षेपही त्यांनी घेतला.

या बैठकीला तुम्हाला अधिकृतरित्या बोलावता येणार नाही. कोविड सेंटरचे संचालक म्हणून तुम्ही आले तर चालेल, असा निरोप आम्हाला अधिकारी देतात. मंत्री-संत्री आले म्हणून धावत सुटणारे लाळघोटे कार्यकर्ते आम्ही नाही. तुम्हाला आम्ही आंडू-पांडू वाटलो का, असा सवालही त्यांनी केला. दरम्यान, त्यांचा हा सोशल व्हिडिओ तालुक्यात व्हायरल झाला आहे.

Title Name
ना.थोरात राष्ट्रवादीच्या नेत्याला म्हणाले, ‘तुझं जितकं वय आहे, तितकं माझं राजकारण आहे... ऐकून घेतो म्हणजे...’
ना.थोरातांवर डॉ.नवलेंचा हल्लाबोल... आम्ही लाळघोटे आंडू-पांडू वाटलो का ?

त्यांची भावना समजून घ्या

राष्ट्रवादी युवक अध्यक्ष रवी मालुंजकर आढावा बैठकीत आक्रमक झाले. त्याचे समर्थन करणार नाही. शिस्त पाळलीच पाहिजे. हे खरे असले तरी मालुंजकर यांच्या बोलण्यातील भावना घेणे गरजेचे आहे, असे ते म्हणाले. - अकोले येथील आंदोलनात सहभागी झालेले ज्येष्ठ नेते दशरथ सावंत, विनय सावंत यांच्यासह आंदोलक कार्यकर्त्यांना बैठकीसाठी टाळण्यात आले, यावरून डॉ.नवले यांनी तीव्र नापसंती व्यक्त केली.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com