लेटलतिफ तहसीलदारांची नामदार तनपुरेंनी घेतली झाडाझडती

वांबोरीच्या बैठकीत वैद्यकीय विभागाचा गलथानपणा चव्हाट्यावर
लेटलतिफ तहसीलदारांची नामदार तनपुरेंनी घेतली झाडाझडती

उंबरे |वार्ताहर| Umbare

वांबोरीत वशीलेबाजी करून लसीकरण केले जात असल्याचा आरोप नागरिकांमधून झाल्यानंतर वैद्यकीय विभागाचा गलथान कारभार मंत्र्यांसमोर उघड झाला. त्यामुळे यासाठी सर्वस्वी वैद्यकीय अधिकारी जबाबदार असतील, असे म्हणत वैद्यकीय अधिकार्‍यांना मंत्री प्राजक्त तनपुरे यांनी खडेबोल सुनावले.

दरम्यान, लेटलतिफ झालेल्या तहसीलदार फसियोद्दीन शेख यांचीही ना. तनपुरे यांनी चांगलीच झाडाझडती घेतली. काल सकाळी दहाच्या सुमारास मंत्री तनपुरे यांचा ताफा ग्रामपंचायतीत पोहोचला. बैठक सुरू होऊन अर्धा तास झाला तरी बैठकीसाठी तहसीलदार पोहोचले नव्हते. त्यावर मंत्री तनपुरे म्हणाले, तहसीलदारांना वेळेच भान आहे की नाही? लोकप्रतिनिधींनी वाट पहात बसायचे का? असा संताप व्यक्त केला. त्यानंतर पावणे अकराच्या सुमारास तहसीलदार बैठकीला पोहोचले. त्यानंतर त्यांची चांगलीच खरडपट्टी केली.

वांबोरी ग्रामीण रुग्णालयामध्ये करोना लसीकरणाचा सुरू असलेला गोंधळ जाणून घेण्यासाठी वांबोरी ग्रामपंचायत कार्यालयामध्ये राज्यमंत्री तनपुरे यांनी आढावा बैठकीचे आयोजन केले होते.

यावेळी माजी जि.प. अध्यक्ष बाबासाहेब भिटे, सरपंच किरण ससाणे, उपसरपंच मंदा भिटे, तहसीलदार एफ. आर. शेख, गटविकास अधिकारी खामकर, माजी सरपंच नितीन बाफना, सारंगधर पटारे, बंटी मोरे, रवीकिरण पटारे, विलास गुंजाळ, बंडू पटारे, अशोक पटारे, मंडलाधिकारी गोसावी, ग्रामविकास अधिकारी बी. के. गागरे, तलाठी सतीश पाडळकर, डॉ. श्रीकांत पाठक, डॉ. भारती पेचे आदी उपस्थित होते.

मंत्री तनपुरे म्हणाले, जिल्ह्यात सर्वत्र लसीकरणाचे योग्य नियोजन होते, मग वांबोरीत का होत नाही? असा सवालही त्यांनी तहसीलदारांना केला. त्यानंतर ग्रामीण रूग्णालय प्रशासनाला फैलावर घेत, लसीकरण हा माणसं जगविण्याचा कार्यक्रम आहे, हा विषय तुम्ही सहज घेऊ नका.

दरम्यान, ग्रामीण रूग्णालयाकडे कोव्हॅक्सिन उपलब्ध असताना आरोग्य विभागाने दिलेल्या यादीवरून लसीकरणासाठी नागरिकांना फोन करण्यात आले. परंतु हे फोन कोविशील्डच्या दुसर्‍या डोससाठी पात्र असलेल्या नागरिकांना केले. त्यामुळे केंद्रावर पुन्हा गोंधळ झाला. हा संपूर्ण प्रकार मंत्री तनपुरे यांच्या समोरच उघड झाला. त्यानंतर मंत्री तनपुरे यांनी जिल्हा शल्यचिकित्सकांना फोन करून आरोग्य व्यवस्थेबाबत नाराजी व्यक्त केली. आम्हाला सतरा वेळा बैठका घेण्याची हौस नाही.

त्यामुळे काम करत असताना कामामध्ये सुसूत्रता असणे गरजेचे आहे. या आरोग्य केंद्रामध्ये लसीकरण पूर्ण झाल्यानंतर उरलेले डोस हे ग्राम विकास अधिकारी व कामगार तलाठी यांनी किती डोस उरले आहे? याची नोंद ठेवायची आहे. वांबोरी ग्रामीण रुग्णालयामध्ये पत्र्याचे शेड उभारून 70 ऑक्सिजन बेडचे कोव्हिड सेंटर सुरू करण्यासाठी आराखडा तयार करण्यात आला आहे. त्याला लवकरच मंजुरी मिळून ते सेंटर सुरु करण्यात येईल, अशी माहिती त्यांनी दिली.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com