राहुरी |तालुका प्रतिनिधी|Rahuri

करोना महामारीमध्ये पहिले चार महिने जशी नागरिकांनी काळजी घेतली, त्याचप्रमाणे शासकीय निर्देशांचे पालन करून

गर्दी न करणे, मास्क वापरणे, सॅनिटायझर वापरणे व अनावश्यक बाहेर न पडणे इत्यादी काळजी घेऊन रुग्णांसाठी सुरू केलेले कोव्हिड सेंटर कायम रिकामे राहावे,, असा आशावाद राज्याचे राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी व्यक्त केला.

राहुरी तालुका डॉक्टर्स असोशिएशन व प्राजक्तदादा मित्र मंडळाच्यावतीने बालाजी मंगल कार्यालयात सुरू करण्यात आलेल्या कोव्हिड केअर सेंटरच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी डॉ. शरद धावडे होते.

व्यासपीठावर प्रेरणा उद्योग समूहाचे सुरेश वाबळे, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष मच्छिंद्र सोनवणे, नगराध्यक्षा अनिता पोपळघट, जि. प. सदस्य धनंजय गाडे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सुनील पोखरणा, तहसीलदार फसियोद्दीन शेख, वैद्यकीय अधिकारी डॉ. नलिनी विखे, निर्मला मालपाणी आदी उपस्थित होते.

ना. तनपुरे म्हणाले, तालुक्यात चार महिने रुग्ण सापडले नाहीत, परंतु जिल्ह्याच्या सीमा खुल्या झाल्यानंतर आपल्याकडे प्रादुर्भाव वाढत गेला. रुग्णांनी थोडीसुद्धा लक्षणे दिसल्यास आजार अंगावर न काढता त्वरित तपासण्या करून उपचार घेतल्यास निश्चित रुग्ण बरा होतो, अशी खात्री ना. तनपुरे यांनी दिली. तरुणांनीही आपल्या घरातल्या वयोवृद्धांची काळजी घेण्यासाठी नियमांचे पालन करावे.

या कोव्हिड केअर सेंटरमध्ये आपले रुग्ण लवकर बरे होतील, अशी आशा त्यांनी व्यक्त केली. होम आयसोलेशन ही काळाची गरज असून यासाठीच स्वतःच्या घराचे स्वप्न साकार होण्यासाठी नगरपरिषदेने मंजूर केलेल्या पहिल्या टप्प्यातील 230 तर दुसर्या टप्प्यातील 430 घरांच्या घरकुल अनुदान वर्ग केले असल्याची माहिती त्यांनी दिली.

शहर व तालुक्यातील गरीबांसाठी घरकुल योजना राबविताना ग्रीनझोनचा अडसर निकाली काढण्याचा प्रयत्न करताना तालुक्यातील रस्त्यांची झालेली दयनीय अवस्था व इतर विकास कामांसाठी अर्थव्यवस्थेची गाडी रुळावर येताच निधी उपलब्ध करण्याची ग्वाही त्यांनी दिली.

या कोव्हिड सेंटरला सर्वतोपरी मदत करणार्या वैद्यकीय व्यावसायिक, प्राजक्तदादा मित्रमंडळाचे कार्यकर्ते, बालाजी मंदिर ट्रस्ट आदींचे ना. तनपुरे यांनी आभार मानले. प्रास्ताविकात डॉ. जयंत कुलकर्णी यांनी या सेंटरमध्ये मिळणार्या सुविधा व उपचारांबाबत माहिती दिली.

यावेळी डॉ. साळवे, डॉ. विक्रम, महेश उदावंत, डॉ. प्रकाश पवार, अण्णासाहेब सोडनार, नंदकुमार तनपुरे, प्रवीण दरक, नवनीत दरक, चंद्रकांत पानसंबळ, राष्ट्रवादी युवकचे तालुकाध्यक्ष धीरज पानसंबळ, रवींद्र आढाव, किशोर सोनवणे, स्वाभिमानी शेतकरी आघाडीचे जिल्हाध्यक्ष रवींद्र मोरे, रवींद्र तनपुरे, अनिल कासार, दशरथ पोपळघट, प्रकाश भुजाडी उपस्थित होते. सूत्रसंचालन अॅड. राहुल शेटे यांनी केले तर आभार ज्ञानेश्वर बाचकर यांनी मानले.

राजकीय व्यासपीठावर राजकीय बोलू. परंतु ज्यांना व्यासपीठ उपलब्ध नाही, ते अशावेळी वैफल्यग्रस्त होऊन टीकाटिप्पणी करीत आहेत. राहुरी कॉलेजमधील सुरू करण्यात आलेल्या कोव्हिड सेंटरला रुग्णसेवेसाठी आपल्या शुभेच्छा असल्याचे ना.तनपुरे यांनी सांगितले.