प्रत्येक जिल्ह्यात योगासन अकॅडमी सुरू करण्यासाठी प्रयत्न करणार - ना. सुनील केदार

प्रत्येक जिल्ह्यात योगासन अकॅडमी सुरू करण्यासाठी प्रयत्न करणार - ना. सुनील केदार

संगमनेर |प्रतिनिधी| Sangamner

ओडिशातील योगासनांच्या पहिल्या राष्ट्रीय स्पर्धेत महाराष्ट्र संघाने मिळविलेल्या देदीप्यमान यशाने महाराष्ट्राचे भूषण वाढले आहे. राज्याचे प्रतिनिधीत्व करतांना महाराष्ट्राकडून खेळणार्‍या 54 खेळाडूंनी 69 पदकांची लयलुट करुन राज्याच्या क्रीडा क्षेत्रात नवा विक्रमही प्रस्थापित केला आहे. या खेळात महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांचा वाढता कल लक्षात घेवून महाराष्ट्र योगासन स्पोर्ट असोसिएशनच्या मागणीनुसार राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात योगासन अकॅडमी सुरू करण्याबाबत शासनस्तरावरून आवश्यक ती मदत करण्याचे आश्वासन राज्याचे पशुसंवर्धन, दुग्धविकास, क्रीडा व युवक कल्याण मंत्री सुनील केदार यांनी दिले.

राष्ट्रीय योगासन स्पोर्ट्स फेडरेशनने गेल्या आठवड्यात भुवनेश्वर (ओडिशा) येथे आयोजित केलेल्या योगासनांच्या पहिल्या राष्ट्रीय चॅम्पियनशीप स्पर्धेचा किताब महाराष्ट्राच्या संघाने पटकावला होता. या राष्ट्रीय स्पर्धेत उत्तुंग कामगिरी करणार्‍या या सर्व खेळाडूंचा महाराष्ट्र योगासन स्पोर्ट्स असोसिएशनच्यावतीने संगमनेरच्या ध्रुव ग्लोबल स्कूल येथे सन्मान करण्यात आला. याप्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून दूरदृष्य प्रणालीद्वारा उपस्थित असलेल्या मंत्री केदार यांनी वरील प्रतिपादन केले. यावेळी राष्ट्रीय योगासन स्पोर्टस् फेडरेशनचे महासचिव डॉ.जयदीप आर्य, महाराष्ट्र स्पोर्ट योगासन असोसिएशनचे अध्यक्ष बापू पाडळकर, सचिव डॉ. संजय मालपाणी, रामकुमार राठी आदींसह विजेते स्पर्धक, त्यांचे पालक, प्रशिक्षक व योगप्रेमी नागरिक ऑनलाईन पद्धतीने उपस्थित होते.

मंत्री केदार म्हणाले, एखाद्या राष्ट्रीय पातळीवरील स्पर्धेत खेळताना त्या स्पर्धेसाठी असलेली सर्वच्या सर्व सुवर्ण पदके पटकाविण्याचा महाराष्ट्राच्या क्रीडा क्षेत्रातील हा बहुधा पहिलाच प्रसंग असेल. या स्पर्धेत राज्यातील योगासनांच्या विद्यार्थ्यांनी जे उज्ज्वल यश प्राप्त केले आहे त्याचा संपूर्ण महाराष्ट्राला अभिमान आहे.

राष्ट्रीय योगासन फेडरेशनचे महासचिव डॉ. जयदीप आर्य यांनी महाराष्ट्र संघाचे सादरीकरण पाहता हा संघ विश्व विजेता बनण्याची क्षमता असलेल्या योगास्टार खेळाडूंचा आहे. खेळाडूंचे पालक होवून जबाबदारी पार पाडणार्‍या डॉ. संजय मालपाणी यांना सह्याद्रीसारखा पाठीराखा अशी उपाधी देत त्यांनी कौतुक केले.

ठाणे येथील योगपटू व संगीत विशारद् राजेश पवार यांनी सादर केलेल्या प्रार्थनेने या सन्मान सोहळ्याला सुरुवात झाली. महाराष्ट्र योगासन स्पोर्ट असोसिएशनचे अध्यक्ष बापू पाडळकर यांनी सर्वांचे स्वागत केले. डॉ. सुनंदा राठी यांनी या स्पर्धेत महाराष्ट्र संघाची कामगिरी सांगितली. सतीश मोहगावकर यांनी आभार मानले.

भुवनेश्वर येथे झालेल्या या स्पर्धेचे वर्णन करताना महाराष्ट्र योगासन स्पोर्ट असोसिएशनचे सचिव डॉ. संजय मालपाणी यांनी आंतरराष्ट्रीय पातळीवर होणार्‍या योगासन क्रीडा स्पर्धा महाराष्ट्रात व्हाव्यात, अशी अपेक्षा व्यक्त केली. त्यावर तात्काळ प्रतिसाद देत राज्याचे पशुसंवर्धन, दुग्धविकास, क्रीडा व युवक कल्याण मंत्री सुनील केदार यांनी होकार देत योगासनांच्या प्रचार व प्रसारासाठी शासनस्तरावर आवश्यक ती मदत करण्याचा प्रयत्न करण्याचे आश्वासन दिले.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com