मुख्यमंत्री जलसंवर्धन योजना पथदर्शक ठरेल- मंत्री गडाख

जिल्ह्यातील अकराशे प्रकल्पांना शंभर कोटी
मुख्यमंत्री जलसंवर्धन योजना पथदर्शक ठरेल- मंत्री गडाख

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली सरकारने जलसंधारण विभागामार्फत मुख्यमंत्री जलसंवर्धन योजना हाती घेतली आहे. यामध्ये जिल्ह्यातील 1100 प्रकल्प असून, त्यासाठी तब्बल शंभर कोटींचा निधी अपेक्षित आहे. अशी माहिती मृद व जलसंधारणमंत्री शंकरराव गडाख यांनी दिली.

मंत्री गडाख यांनी जिल्हाधिकारी कार्यालयाला भेट दिली. त्यावेळी ते पत्रकार परिषदेत बोलत होते. ते म्हणाले, राज्यातील जुन्या 98 हजार प्रकल्पांची दुरुस्ती होणार आहे. पहिल्या टप्प्यात राज्यातील सोळा हजार प्रकल्पांची दुरुस्ती केली केली जाणार आहे. नगर जिल्ह्यातील सुमारे 1100 प्रकल्प असून, त्यासाठी 100 कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. ही सर्व कामे सुरू झालेली आहेत. आता दुसरा टप्पा सुरू होणार आहे.

या कामांमुळे पाण्याच्या पातळीत वाढ होणार असून, त्याचा फायदा शेतकर्‍यांसह सर्वांना होणार आहे. ही सर्व कामे श्रीगोंदे, पारनेर, पाथर्डी आदी तालुक्यांतील आहेत. पावसाचे पाणी शिवारातच अडवले जावे शेतकर्‍यांच्या शेती सिंचनासाठी व पिण्याच्या पाण्यासाठी त्याचा उपयोग व्हावा, यादृष्टीने मुख्यमंत्री जलसंवर्धन योजना ही पथदर्शक ठरेल, अशी ग्वाही मंत्री गडाख यांनी दिली.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली राज्यात अनेक विकासकामे होत आहेत. करोनामुळे अनेक अडचणी आलेल्या आहेत. त्यातून मार्ग काढत विकासकामे केली जात असून, आगामी काळातही कामे होणार आहेत. मुख्यमंत्री ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र राज्य नक्कीच प्रगती करेल, असा विश्वास मंत्री गडाख यांनी यावेळी व्यक्त केला.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com