ना. गडाख यांनी कोविड केंद्रांना भेट देऊन रुग्ण सुविधांचा घेतला आढावा

ना. गडाख यांनी कोविड केंद्रांना भेट देऊन रुग्ण सुविधांचा घेतला आढावा

नेवासा |तालुका वार्ताहर| Newasa

राज्याचे मृद व जलसंधारण मंत्री नामदार शंकरराव गडाख यांनी नेवासा तालुक्यातील कोविड केंद्रांना भेटी देऊन तिथल्या व्यवस्थेचा व रुग्ण सुविधांचा आढावा घेतला. त्यांच्यासमवेत प्रांताधिकारी गणेश पवार, तालुक्याचे तहसीलदार रुपेशकुमार सुराणा, तालुक्याचे आरोग्य अधिकारी अभिजीत सूर्यवंशी, गटविकास अधिकारी शेखर शेलार, नगर पंचायतीचे मुख्याधिकारी समीर शेख, पोलिस निरीक्षक विजय करे, तालुका पंचायत समितीचे सभापती रावसाहेब कांगुणे, उपसभापती किशोर जोजार, बाजार समितीचे सभापती डॉ. शिवाजी शिंदे व शनैश्वर देवस्थानचे अध्यक्ष भागवत बानकर व देवस्थानचे विश्वस्त उपस्थित होते.

या आढावा दौर्‍यात त्यांनी नेवासा येथील शासकीय ग्रामीण रुग्णालय तसेच भेंडा व शिंगणापूर येथील कोवीड केंद्रांना आणि शनैश्वर देवस्थान ट्रस्ट संचलित शनैश्वर ग्रामीण रुग्णालयातील कोवीड उपचार केंद्रांला भेटी देऊन आढावा घेतला व तेथील रुग्णांचीही विचारपूस केली.

कोवीड केंद्रांना भेटी दिल्यावर नामदार गडाख यांनी माहिती देताना सांगितले की, ऑक्सिजन सिलेंडर आणि रेमडेसिवीर इंजेक्शनचे वितरण जिल्हाधिकार्‍यांच्या नियंत्रणाखाली होत असल्याने त्याबाबत आपण जिल्हाधिकारी आणि जिल्हा शल्यचिकीत्सक यांच्याशी आज दुरध्वनीवर चर्चा करुन जिल्ह्यातील सर्वच कोविड सेंटरमध्ये असणार्‍या रुग्णांच्या प्रमाणात या सुविधा पुरेशा व वेळेवर उपलब्ध करण्याबाबत सुचना दिल्या आहेत.

जिल्ह्याला ऑक्सीजन सिलेंडरचा पुरवठा करणारे चिलेखनवाडी येथील प्लांटला मी यापूर्वी भेट दिली होती. तिथे अखंडित वीजपुरवठा होण्याच्या बाबतीत काही अडचणी होत्या. महावितरणाच्या नगर येथील अधिकार्‍यांशी चर्चा करून त्या सोडवल्या होत्या. त्यामुळे आता या प्रकल्पाला मिळणार्‍या वीज पुरवठ्यात सुधारणा झाली असून रोज 60 ते 70 सिलेंडरची निर्मितीत भर पडली असल्याचे त्यांनी सांगितले.

शनैश्वर ग्रामीण रुग्णालयातील सर्व स्टाफ कोविड केंद्रात राबत असून, तालुक्यातील कोविड सेंटरच्या मदतीसाठी कमी पडणार्‍या स्टाफची मागणी केली होती. त्यापैकी डॉक्टर्स मिळाले असून 14 नर्सेस आणि वॉर्डबॉय लवकरच उपलब्ध होणार आहेत. तशा सूचना आजच्या आढावा बैठकीत संबंधित अधिकार्‍यांना दिल्या असल्याचे नामदार गडाख यांनी सांगितले.

नेवासा तालुक्यातील ही चारही कोविड सेंटर्स शासनाच्या निगराणीखाली सुरू असून या केंद्रामुळे तालुक्यातील अनेक कोविड रुग्णांच्या उपचाराची सोय झाल्यामुळे तालुक्यातील रुग्णांच्या नातेवाईकांना दिलासा मिळत असल्याचे दिसून येत आहे.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com