मुंबादेवी परिसराला पर्यटनाचा दर्जा मिळवून देऊ - ना. गडाख

मुंबादेवी परिसराला पर्यटनाचा दर्जा मिळवून देऊ - ना. गडाख

नेवासा |शहर प्रतिनिधी| Newasa

नेवासा शहर येथील कहार समाज बांधवांसह हजारो भाविकांचे श्रद्धास्थान मुंबादेवी मंदिर परिसर विकास कामासाठी एक कोटी सात लाखांची तरतूद करण्यात आली असून परिसर विकास कामांचा शुभारंभ मंगळवारी ना.शंकरराव गडाख यांच्या हस्ते करण्यात आला. सर्वांची साथ असेल तर मुंबादेवी परिसराला पर्यटनाचा दर्जा मिळवून देऊ अशी ग्वाही त्यांनी यावेळी दिली.

मुंबादेवी मंदिर परिसर सुशोभित करणे, कहार समाज बांधवांसाठी समाज मंदिर बांधणे, मंदिर रोडवर कमान उभारणे, मुंबादेवी परिसर विकसित करणे आदी कामांसाठी एक कोटी सात लाख रुपयांची तरतूद नामदार गडाख यांनी केली.

कार्यक्रम प्रसंगी नामदार शंकरराव गडाख यांचा मुंबादेवी प्रतिष्ठान, कहार समाज बांधवांसह युवक मित्र मंडळाच्या वतीने भरीव निधी उपलब्ध करून दिल्याबद्दल सत्कार करण्यात आला. मुख्याधिकारी अंबादास गर्कळ यांनी शहरात होणार्‍या विकास कामाची माहिती दिली.

नामदार गडाख म्हणाले, शहराच्या विकासासाठी 40 कोटीचा निधी मंजूर करून आणला आहे. ज्या रस्त्यावरून कोणाला चालताही येत नव्हते असे रस्ते आता दर्जेदार झालेले आहेत.

शहराचा चेहरामोहरा बदलण्यासाठी माझा प्रयत्न सुरू आहे. शहर विकास कामांसाठी आणखी 40 कोटी रुपये कामांचे प्रस्ताव पाठविण्यात आले असून तो निधीही लवकरच मंजूर होऊन शहर विकास कामांना त्यातून अधिक गती मिळेल. मार्केट कमिटी परिसरात असलेल्या दोन एकर जागेत लवकरच भव्य दोन कोटी खर्चाचे उद्यान उभारण्याचा मानस आहे. मुंबादेवी परिसर नदीकाठी निसर्गरम्य आहे या पवित्र स्थानाला पर्यटन क्षेत्राचा दर्जा देण्यासाठी माझा प्रयत्न राहील त्यासाठी मला सर्व बांधवांच्या खंबीर साथीची गरज आहे.

यावेळी महंत बृहस्पतीनाथ महाराज, राजेंद्र वाघमारे, अ‍ॅड.काका गायके, संतोष पडूंरे, रामभाऊ जगताप, सतीश पिंपळे, नंदकुमार पाटील, उपनगराध्यक्ष लक्ष्मण जगताप, नगरसेवक फारूक आतार, संदीप बेहळे, अंबादास ईरले, राजेंद्र मापारी, पोपटराव जिरे, रमेश पडूंरे, शिवसेनेचे शहर प्रमुख नितीन जगताप, माजी शहर प्रमुख अंबादास लष्करे, राजेंद्र काळे, नारायण लोखंडे, नितीन मिरपगार, प्रकाश सोनटक्के, बाळासाहेब कोकणे, जालिंधर गवळी, नितीन ढवळे, महेश गरुटे, बालू जिरे, मोहिनीराज सरगय्ये, आदी उपस्थित होते. भाऊसाहेब वाघ यांनी सूत्रसंचालन केले तर संतोष पंडुरे यांनी आभार मानले.

आणखी 10 कोटी मंजूर झाल्याची घोषणा

आतापर्यंत 40 कोटींचा निधी दिला अजून चाळीस कोटी मिळण्यासाठी प्रस्ताव पाठवला आहे त्यास ही लवकरच मंजुरी मिळणार असल्याचे सांगून नामदार एकनाथराव शिंदे यांच्याकडे केलेल्या पाठपुराव्यामुळे आजच दहा कोटी रुपये मंजूर झाले असल्याचे ना. गडाख यांनी स्पष्ट केले. यातून राहिलेल्या कामांना गती देण्यात येईल असे जाहीर केले. या निर्णयाचे उपस्थितांनी टाळ्यांच्या गजरात स्वागत केले.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com