जलसंधारण मंत्री गडाखांवर कारवाईची भाजपची मागणी

केशव उपाध्ये : निष्पक्ष चौकशीसाठी पदावरून हटवावे
जलसंधारण मंत्री गडाखांवर कारवाईची भाजपची मागणी

मुंबई/अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

प्रतीक काळे या युवकाने जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख यांच्यावर आरोप करणारा व्हिडिओ जाहीर करून आत्महत्या केल्याने या प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करण्यासाठी त्यांना मंत्रिपदावरून दूर करावे, अशी मागणी प्रदेश भाजपचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत केली.

गडाख यांच्यासह अनेकांची नावे घेऊन प्रतीक काळे याने मृत्यूपूर्वी तयार केलेला व्हिडिओ मृत्यूपूर्व जबानी असल्याने त्या दिशेने तपास होणे गरजेचे असून गडाख सत्तेवर असल्याने तपासावर दबाव येऊ शकतो, हे लक्षात घेऊन मुख्यमंत्री ठाकरे यांनी त्यांना पदावरून दूर करावे, असे उपाध्ये म्हणाले.

प्रतीक काळे याने ऑडिओ-व्हिडिओ क्लीपमध्ये आपल्याला होणारा त्रास असह्य होत असल्याचे नमूद करून त्याने आत्महत्या केल्याने गडाख कुटुंबियांची चौकशी होणे गरजेचे आहे, असेही ते म्हणाले. चौकशी दरम्यान गडाख मंत्रिपदावर राहिल्यास तपासावर दबाव येण्याची शक्यता आहे. त्यामुळे गडाख यांना पदावरून दूर केले नाही तर असंतोष उफाळेल आणि त्याची जबाबदारी ठाकरे सरकारवर राहील, असा इशारा उपाध्ये यांनी दिला.

राजकीय हेतूने आरोप - ना.गडाख

प्रतीक काळे आत्महत्येप्रकरणी भाजपकडून होणारे आरोप राजकीय हेतूने प्रेरित असल्याचे मंत्री शंकरराव गडाख यांनी म्हटले आहे. या आरोपांचे खंडन करून ते म्हणाले, काळे याची आत्महत्या ही दुर्दैवी घटना आहे. मात्र प्रतीक माझा पीए होता किंवा मी दबाव आणला, हे आरोप निखालस खोटे आहेत. आमचे फोनवरही बोलणे झालेले नाही. एफआयआरमध्ये सर्व गोष्टी नमूद आहेत. पोलिसांकडून तपास सुरू आहे. उलट कोणत्याही दबावाला बळी न पडता या घटनेचा सखोल तपास व्हावा, अशी माझी मागणी आहे. कोणत्याही तपास यंत्रणेकडून तपास करावा, त्यात माझा या घटनेशी काडीमात्र संबंध नाही हेच समोर येईल. चौकशीत दोषी आढळल्यास पदावरून तत्काळ दूर होईल. मतदारसंघासह राज्याचे राजकारण किती खालच्या पातळीवर घसरले आहे हेच या खोट्या आरोपांमुळे सिद्ध होते, असेही ना.गडाख म्हणाले.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com