मंत्रालयात दोन-तीन वेळा गेलेल्यांनी मुख्यमंत्र्यांच्या दिल्ली वारीवर बोलू नये

ना. देसाई यांनी ठाकरे यांना सुनावले
मंत्रालयात दोन-तीन वेळा गेलेल्यांनी मुख्यमंत्र्यांच्या दिल्ली वारीवर बोलू नये

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे वारंवार दिल्ली वारी करतात. मात्र, काहींना त्यावर आक्षेप आहे. परंतु, मागील अडीच वर्षात मुख्यमंत्रिपदी असताना जे फक्त दोन-तीन वेळा मंत्रालयात गेले, अशांनी मुख्यमंत्र्यांच्या दिल्ली वारीवर बोलू नये, असा सल्ला उत्पादन शुल्क मंत्री शंभूराजे देसाई यांनी शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांना दिला.

नगरमध्ये मुख्यमंत्री शिंदे समर्थकांचा हिंदू गर्व गर्जना मेळावा पार पडला. त्याआधी पत्रकारांशी बोलताना मंत्री देसाई म्हणाले, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे वारंवार दिल्लीला जात असले, तरी तेथे केंद्र सरकारकडून राज्याच्या विकासासाठी जास्त निधी आणण्याच्या प्रयत्नात आहेत. मध्यंतरी निती आयोगाच्या बैठकीत महाराष्ट्रासाठी 19 हजार कोटी रुपयांची मागणी मुख्यमंत्री शिंदे यांनी पंतप्रधान मोदी यांच्याकडे केली आहे. मागील अडीच वर्षात मागचे मुख्यमंत्री दिल्ली तर सोडाच, पण मुंबईत असलेल्या मंत्रालयात जात नव्हते, अशी टीका मंत्री देसाई यांनी केली.

देसाई म्हणाले, शिवसेनेच्या दसरा मेळाव्यासाठी पक्षप्रमुखांना तयारीचे मेळावे घ्यावे लागतात. यातच सारे काही आले. आता यांना लोकांपर्यंत जावे लागत आहे. आधी पक्षातील मोठ-मोठ्या लोकांना यांची भेट मिळत नव्हती. आता मातोश्रीचे दरवाजे 24 तास उघडे असल्याचे सांगतात.

आरक्षणाबाबत मुख्यमंत्री शिंदे यांनी दोन दिवसांपूर्वीच मंत्रिमंडळाच्या बैठकीत उपसमिती नेमण्याचा धोरणात्मक निर्णय घेतला. या समितीच्या बैठका दर आठवड्याला होतील. जे प्रश्न आहेत, ते तातडीने सोडवून मराठा आरक्षण आश्वासनाच्या पूर्तीसाठी मुख्यमंत्री शिंदे व उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली ही समिती काम करेल, असे मंत्री देसाई यांनी सांगितले.

नगर जिल्ह्यासह महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यात उत्पादन शुल्क विभागाकडे मनुष्यबळ कमी आहे. या विभागातील 30 ते 40 टक्के जागा रिक्त आहेत, याचा अहवाल आपण मुख्यमंत्री शिंदे आणि उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्यासमोर पुढील आठवड्यात लेखी स्वरुपात मांडणार आहोत. त्यानंतर रिक्त पदांची भरती प्रक्रिया लवकरच सुरू केली जाईल, असेही त्यांनी यावेळी सांगितले.

आम्हीच ‘त्यांना’ सुरतला नेले

महाविकास आघाडीच्या अडीच वर्षांच्या काळात सत्तेत असताना शिवसेनेच्या आमदारांसह राज्यमंत्र्यांना निधी मिळत नव्हता. मुख्यमंत्री शिवसेनेचा असताना सुध्दा उपमुख्यमंत्री अजित पवार त्यांच्या आमदारांसह पराभूत उमेदवारांना निधी देत होते. आमची कामे होेत नसल्याने मतदारसंघातील जनतेला काय उत्तर द्यायचे, यामुळे वैतागून आम्ही 40 आमदारांनी एकनाथ शिंदे यांना सुरतला नेले. त्यांनी आम्हाला नेले नसून, आम्हीच त्यांना नेल्याने त्यांना दोष देऊ नका, असा खुलासा उत्पादन शुल्क मंत्री देसाई यांनी केला.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com