लोकसभेत 350 जागा जिंकून भाजप सरकार पुन्हा सत्तेत येईल

प्रकाश आंबेडकर यांनी आमच्यासोबत यावे - ना. रामदास आठवले
रामदास आठवले
रामदास आठवले

शिर्डी |प्रतिनिधी| Shirdi

महाविकास आघाडी सरकार वज्रमुठ असल्याचे भासवत सर्वांची लुट करत असून या वज्रमुठीला आरपीआय तसेच भाजप पक्ष घाबरत नसून येणार्‍या 2024 लोकसभा निवडणुकीत लोकसभेत 350 जागा जिंकून भाजप सरकार पुन्हा सत्तेत येईल यासाठी आपण सर्वांनी आम्हाला साथ द्यावी असे आवाहन आरपीआय पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष व केंद्रीयमंत्री रामदास आठवले यांनी शिर्डी येथे आयोजित केलेल्या आरपीआयच्या राष्ट्रीय अधिवेशनात केली.

शिर्डी येथे आरपीआय पक्षाच्या वतीने दोन दिवस राष्ट्रीय अधिवेशन सुरू असून या अधिवेशनासाठी केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री रामदास आठवले, महाराष्ट्राचे महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष राजाभाऊ सरोदे अविनाश मातेकर, बाबुराव कदम, गौतम सोनवणे, पप्पू बनसोडे, चंद्रकला सोनकांबळे, माजी मंत्री संदीप कुमार विजयराव वाकचौरे, बाळासाहेब गायकवाड, नागालँडचे आमदार उपस्थिती होते. सीमाताई आठवले, जित आठवले, दीपकराव गायकवाड, अजय साळवे, सुरेंद्र थोरात, भीमा बागुल, पप्पू बनसोडे, धनंजय निकाळे यांच्या देशातील 20 राज्यातून आरपीआय पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

ना .आठवले म्हणाले, महाविकास आघाडी सरकार वज्रमुठ बांधण्याच भासवत आहे. परंतु त्यांनी सर्वांची लूट करण्याचे काम केले आहे ्. असे असले तरी भाजप सरकार त्यांच्या वज्रमुठीला घाबरत नसून येणार्‍या 2024 निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली लोकसभेत350 जागा जिंकून भाजप सरकार पुन्हा सत्तेत येईल यात कुठली प्रकारची शंका नाही. आरपीआय पक्षाचे काम 32 राज्यात असून महाराष्ट्रात या पक्षाची मोठी ताकद आहे. आर.पी.आय पक्ष ज्या पक्षासोबत राहतो त्या पक्षाची सत्ता देशात येते.

प्रकाश आंबेडकरांनी इकडे तिकडे फिरू नये यांनी आमच्या सोबत यावे त्यांचे आम्ही स्वागत करू वंचित आघाडीच्या पाठिंब्यामुळे कोणाची सत्ता आली नाही. प्रकाश आंबेडकर आमच्या सोबत आले तर आम्ही दोघे मिळून भाजप सोबत काम करू उद्धव ठाकरे यांनी देखील भाजप बरोबर यावे. ज्या पद्धतीने शिर्डीतील अधिवेशनात कार्यकर्त्यांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली त्याच पद्धतीने कार्यकर्त्यांनी निवडणुकीत आरपीआयची ताकद दाखवून भाजप सरकारला बहुमताने निवडून द्यावे.

शिर्डी लोकसभा निवडणूक मी एकदा पडलो असलो तरी पुन्हा निवडणुकीसाठी सज्ज आहे आता यावेळी मी पडणार नसून असे सांगत कार्यकर्त्यांनी एकजुटीने आरपीआय पक्ष वाढवण्यासाठी कामाला लागा असे आवाहन यावेळी ना. आठवले यांनी केले. यावेळी महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले देशाच्या राजकारणात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा वारसा म्हणून ना. रामदास आठवले यांचा राज्याच्या राजकारणात प्रभाव राहिला आहे. नरेंद्र मोदी यांच्या पाठीमागे ते खंबीरपणे उभे आहे. त्यांच राजकीय कार्यकाळ संघर्षमय राहिला आहे. अनेक पक्ष एनडीए मधून बाहेर पडले.

सत्तेच्या स्पर्धेत किती आले किती गेले परंतु भाजप सोबत राहिले फक्त रामदास आठवले असे सांगत विखे पाटील म्हणाले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अभ्यासू व्यक्तिमत्त्वामुळे अनेक देशाचे नेतृत्व भारत देशाकडे आहे. समाजातील प्रत्येक घटकाला न्याय मिळावा यासाठी ना. आठवले हे काम करत आहे. ते नऊ वर्षांपासून मंत्रिमंडळात उत्कृष्ट कामकाज करीत आहे. त्यांच्यावर एकही भ्रष्टाचाराचा आरोप झाला नाही. ही त्यांच्या कामाची पावती आहे. जिल्ह्यात 42 हजार नागरिकांना वयोश्री योजनेच्या माध्यमातून आरोग्य साहित्याचा लाभ मिळून दिला. घोषणा देऊन पक्ष वाढत नाही त्यासाठी सामाजिक काम करणे गरजेचे आहे.

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे विचार कार्यकर्त्यांनी अमलात आणून त्यातून समाज परिवर्तन करणे गरजेचे आहे हे खरे या अधिवेशनाचे फलित होईल. महाविकास आघाडी राज्यात वज्रमुठ बांधते याचा तुम्ही विचार करू नका वज्रमुठीचे काय करायचे हे आम्ही बघू तुम्ही ना.आठवले यांचे विचार आत्मसात करा. गायरान जमिनीत घरे असणार्‍या नागरिकांना विस्थापित होऊ देणार नाही. शिवशक्ती व भीमशक्तीची ताकद येणार्‍या निवडणुकीत दाखवून देऊ असे यावेळी ना. विखे पाटील यांनी सांगितलं.

यावेळी प्रथमच आर पी आय पक्षाकडून निवडून आलेल्या नागालँडच्या आमदारांनी अधिवेशनात भाषण करून उपस्थितांची मन जिंकली. विविध राज्यातून दोन दिवसीय सुरू असलेल्या अधिवेशनासाठी कार्यकर्त्यांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती.

32 ठराव मंजूर

शिर्डी येथे आयोजित केलेल्या रिपब्लिकन पक्षाच्या अधिवेशनात एकूण 32 ठराव करण्यात आले. त्यात प्रामुख्याने इंदूमिल जमिनीवर डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे स्मारक 2024 पूर्वी करावे, सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार राज्य सरकारने अनुसूचित जाती जमातीच्या अधिकारी- कर्मचार्‍यांना पदोन्नती मध्ये आरक्षण देण्याचा निर्णय घ्यावा, मराठा समाजाला आरक्षण देण्यात यावे, खाजगी क्षेत्रामध्ये मागासवर्गीय यांना आरक्षण देण्यात यावे, लोकसभा विधानसभा निवडणुकीच्या मतदार यादीत प्रमाणे झोपड्यांना अधिकृत मान्यता द्यावी. व राज्यातील सर्व महापालिकेमध्ये झोपडपट्टी पुनर्वसन योजना एस आर ए लागू करावी, अशा विविध मागण्यांचा ठराव यावेळी करण्यात आले.

   
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com