
आश्वी |वार्ताहर| Ashwi
धमक्या देऊन सरकारच्या विकास कामांचे श्रेय लाटण्याचे प्रयत्न तालुक्यात सुरू आहेत. पण आता धमक्या देण्याचे दिवस संपले आहेत. विकास कामे कोणामुळे होत आहेत हे जनतेला समजत आहे. राज्यात जनतेच्या मनातील सरकार असल्याने जनतेच्या हिताची कामे होत आहेत. विकास हा धमक्या देऊन नव्हे तर लोकांना विश्वासात घेऊन करावा लागतो,असे प्रतिपादन महसूल, पशुसंवर्धन व दूग्ध व्यवसाय विकास मंत्री ना.राधाकृष्ण विखे पाटील यांनी केले.
तालुक्यातील चिंचपूर येथे केंद्र सरकारला 9 वर्षे पूर्ण झाल्याबद्दल भारतीय जनता पक्षाच्यावतीने महाजनसंपर्क अभियान सुरु करण्यात आले आहे. चिंचपूर येथील कार्यक्रमात मंत्री विखे पाटील यांच्या उपस्थितीत केंद्र आणि राज्य सरकारच्या योजनांचे पत्रक नागरिकांना देण्यात आले. भाजपाचे तालुका अध्यक्ष सतीश कानवडे, डॉ. विखे पाटील कारखान्याचे संचालक कैलासराव तांबे, प्रवरा बँकेचे संचालक बबनराव काळे, गिताराम तांबे, सादतपूरचे सरपंच नारायण गुंजाळ, औरंगपूरच्या सरपंच लक्ष्मीबाई वाकचौरे, प्रांताधिकारी शैलेश हिंगे, तहसीलदार धीरज मांढरे, गटविकास आधिकारी अनिल नागणे यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी याप्रसंगी उपस्थित होते.
मंत्री विखे पाटील म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दूरदृष्टीमुळे संपूर्ण देशात जलजीवन मिशन योजनेचे काम वेगाने सुरू आहे. 2024 सालापर्यंत प्रत्येक घरात नळाव्दारे पाणी देण्याचे सरकारचे धोरण आहे. चिंचपूर आणि पंचक्रोशितील पाणी योजनेकरिता निधीची उपलब्धता झाली आहे. या योजनेकरिता डॉ. विखे पाटील सहकारी साखर कारखान्याने जागेची उपलब्धताही करुन दिली. परंतु आता या योजनेचे श्रेय लाटण्यासाठी काहींची केवीलवाणी धडपड सुरू झाली आहे. धमक्या देण्यापर्यंत यांची मजल गेली आहे. परंतु आता धमक्या देण्याचे दिवस संपले आहेत हे त्यांनी लक्षात ठेवावे, धमक्या देणार्यांवर तातडीने कारवाई करावी अशा सूचना आपण आधिकार्यांना दिल्या असल्याचे त्यांनी सांगितले.
व्यक्तिगत आणि सार्वजनिक प्रश्नांची सोडवणूक शासन आपल्या दारी उपक्रमातून होत आहे. या उपक्रमाची मुदतही आता सरकारने वाढविली असून, लाखो लोकांचे प्रश्न या माध्यमातून सुटत असल्याचे समाधान आहे. केंद्र सरकारच्या योजनांचा लाभही राज्य सरकारच्या माध्यमातून जनतेला देण्याचा प्रयत्न सुरू असून राज्य सरकारने शेतकर्यांकरिता एक रुपयात पीक विमा देण्याची योजना सुरू केली आहे. केंद्राच्या धर्तीवर 6 हजार रुपयांच्या योजनेचीही अंमलबजावणी लवकरच सुरू होणार असल्याची ग्वाही त्यांनी दिली.
भाजपाचे तालुका अध्यक्ष सतीश कानवडे यांनी महाजनसंपर्क अभियानाची माहीती देऊन केंद्र सरकारच्या योजनांचा लाभ घेण्याचे आवाहन केले. संचालक कैलास तांबे यांनी चिंचपूर गावासाठी उपलब्ध झालेल्या निधीची माहीती आपल्या भाषणात दिली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक तहसीलदार धीरज मांढरे यांनी केले. या कार्यक्रमासाठी चिंचपूर आणि पंचक्रोशितील ग्रामस्थ, शेतकरी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.