जनतेच्या अडचणी सोडविण्यासाठी शासन आपल्या दारी - ना. विखे

जनतेच्या अडचणी सोडविण्यासाठी शासन आपल्या दारी - ना. विखे

कोल्हार |वार्ताहर| Kolhar

विविध शासकीय योजनांची कागदपत्रे, दाखले मिळत नाहीत, अडचणी येतात. लाभार्थ्यांना हेलपाटे मारावे लागतात, हे थांबले पाहिजे. जनतेला योजनांचा लाभ देण्याचे दायित्व आहे म्हणून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या संकल्पनेतून शासन आपल्या दारी हा उपक्रम सुरू झाला असल्याचे प्रतिपादन महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी केले. कोल्हार भगवतीपूर येथे भगवतीदेवी मंदिरात शासन आपल्या दारी, मोदी 9 महा जनसंपर्क अभियान कार्यक्रमप्रसंगी ना. विखे पाटील बोलत होते.

ना. विखे पाटील म्हणाले, या उपक्रमातून गडचिरोलीत साडेसहा लाख लोकांना लाभ मिळाला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कारकिर्दीला 9 वर्षे पूर्ण झाली. त्यानिमित्ताने विविध योजना सुरू करण्यात आल्या आहेत. सबका साथ-सबका विकास हे ब्रीदवाक्य प्रत्यक्षात उतरले आहे. गोरगरिबांच्या योजना कार्यान्वित झाल्याने लोकांना लाभ मिळत आहे. देश प्रभावीपणे एकात्मतेच्या भावनेने जोडला जात आहे. घरकूल योजना, एक रुपयात पीक विमा यासारख्या योजनांचा लाभ होत आहे. जलजीवन मिशन अंतर्गत नगर जिल्ह्याला 4 हजार कोटी रुपये मिळाले. पंतप्रधान मोदींच्या भरीव कामामुळे देशात कितीही आघाड्या झाल्या तरीही 2024 मध्ये होणार्‍या निवडणुकांमध्ये तेच देशाचे नेतृत्व करणार असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

प्रांताधिकारी माणिक आहेर यांनी प्रास्ताविक केले. भाजपाचे उत्तर नगर जिल्हाध्यक्ष राजेंद्र गोंदकर यांनी मनोगत व्यक्त केले. सूत्रसंचालन यमन पुलाटे यांनी केले. अध्यक्षस्थानी प्रवरा बँकेचे अध्यक्ष डॉ. भास्करराव खर्डे होते. याप्रसंगी तहसीलदार अमोल मोरे, कोल्हार बुद्रुकचे माजी सरपंच अ‍ॅड. सुरेंद्र खर्डे, देवालय ट्रस्टचे अध्यक्ष सयाजी खर्डे, उपाध्यक्ष साहेबराव दळे, सचिव संपत कापसे, कोल्हार बुद्रुकच्या सरपंच निवेदिता बोरुडे, उपसरपंच सविता खर्डे, भगवतीपूरचे सरपंच दत्तात्रय राजभोज, उपसरपंच प्रकाश खर्डे, बाजार समितीचे उपसभापती अण्णासाहेब कडू, विखे कारखान्याचे संचालक स्वप्निल निबे, धनंजय दळे, अशोकलाल आसावा, रवींद्र धनवटे, अमोल थेटे, ऋषिकेश खांदे, पंढरीनाथ खर्डे, श्रीकांत बेद्रे, भास्करराव घुले आदी उपस्थित होते.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com