आर्थिक हितसंबंधाला बाधा आल्यानेच ‘त्यांचा’ आंदोलनाचा इशारा

राष्ट्रवादीच्या आमदारांच्या इशार्‍यावर महसूल मंत्री विखे यांची खोचक टीका
आ. विखे
आ. विखे

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

गौणखनिज परवानगीप्रकरणी राष्ट्रवादीच्या जिल्ह्यातील तीन आमदारांनी दिलेला आंदोलनाचा इशारा म्हणजे त्यांच्या आर्थिक हित संबंधाला बाधा आल्यानेच दिल्याचा दावा करत त्यांचे आंदोलन हे नौटंकी असून जनतेच्या हितासाठी नव्हे, तर बगलबच्चे यांच्यासाठी आंदोलन करण्याचा इशारा असल्याची खोचक टीका महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी केली.

रविवारी नगरमध्ये ते माध्यमांशी बोलत होते. यावेळी महसूल मंत्री विखे पाटील यांना आ. रोहित पवार यांच्या विकास कामांना स्थगिती देण्यात येत असलेल्या आरोपाबाबत विचारण्यात आले. त्यावर मंत्री विखे म्हणाले, आ. पवार यांचा आरोप कोणत्या मुद्द्याला धरून आहे हे माहीत नाही. मात्र, सातत्याने वर्तमानपत्रात आपले नाव छापून यावे, यासाठी काही लोकांचा प्रयत्न आहे. ती आता फॅशनच सुरू झाली, या पलिकडे आ. पवार यांच्या आरोपाबाबत काही वाटत नाही.

दुसरीकडे गौणखनिज परवानगीप्रकरणी राष्ट्रवादीचे आ. रोहित पवार, आ. संग्राम जगताप आणि आ. नीलेश लंके यांनी उपोषणाचा इशारा देत विकास कामे ठप्प पाडल्याचा आरोप केला होता. या आरोपाचा विखे पाटील यांनी चांगलाच समाचार घेतला. जिल्ह्यात अशी कोणतीच कामे ठप्प झालेली नाहीत. ज्यांनी आंदोलनाचा इशारा दिला आहे, त्यांचा स्वत:चा बेकायदा उत्खनन करणार्‍या माफियांशी आर्थिक हितसंबंध आहे. ते आर्थिक हितसंबंध आता उघड होऊ लागल्याने ते आंदोलनाचा इशारा देत आहेत. स्वत:च्या अवैध उत्पन्नाचे साधन बंद होत असल्याने त्यांचा आंदोलनाचा इशारा जनतेसाठी नव्हे, तर बगलबच्च्यांसाठी असल्याचे विखे पाटील म्हणाले.

निळवंडे धरणाचे काम मार्गी लागले आहे. आता महामार्गाच्या कामासाठी अधीक्षक अभियंत्यांना सूचना दिलेल्या आहेत. जिल्ह्यातून जाणार्‍या महामार्गासाठी ज्याठिकाणी खानपट्ट्यांची गरज आहे, त्याठिकाणी संबंधित विभागाच्या प्रांताधिकारी यांच्याकडून रितसर परवाना घेऊन किती मालाची गरज आहे, हे निश्चित करून क्षेत्रिय पातळीवर परवानगी घेण्यास सांगण्यात आले आहे. आंदोलनाची स्टंटबाजी करण्यात काही लोकांचा हातखंडा असून जिल्ह्यात अथवा राज्यात एकही महामार्गाचे काम खडी, वाळूअभावी बंद नसल्याचा दावा विखे पाटील यांनी केला. राज्य सरकारचा प्राधान्यक्रम ठरलेला असून आता सर्व नियमाने होणार आहे. हे सरकार सर्वसामान्यांच्या हिताचा विचार करणारे सरकार असून त्याचे दु:ख काही लोकांना होत आहे. स्वत:च्या अवैध उत्पन्नाचे साधन बंद होत असल्याचे शैल्य असल्याची टीका मंत्री विखे यांनी यावेळी केली.

Related Stories

No stories found.
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com