तुटपुंजी मदत देवून शेतकर्‍यांची फसवणूक का करता?

नेवासा तालुक्यातील दौर्‍याप्रसंगी महसूलमंत्री विखे पाटील यांचा विमा कंपनी अधिकार्‍यांना सवाल
तुटपुंजी मदत देवून शेतकर्‍यांची फसवणूक का करता?

नेवासा |तालुका प्रतिनिधी| Newasa

हजारो रुपयांचे हप्ते भरून घेता आणि तुटपुंजी मदत देवून शेतकर्‍यांची फसवणूक का करता? असा सवाल महसूलमंत्री राधाकृष्ण विखेपाटील यांनी पीक विमा कंपन्यांना केला. नेवासा तालुक्यातील वरखेड, शिरसगाव आदी ठिकाणी त्यांनी भेटी देवून नुकसानीची पाहणी केली. त्यावेळी ते बोलत होते. महसूल मंत्री विखे पाटील यांनी बांधावरून थेट विमा कंपन्याच्या अधिकार्‍यांना भ्रमणध्वनी लावून शेतकर्‍यांना विमा मिळवून देण्यात हलगर्जीपणा केल्याच्या कारणावरून जाब विचारला.

मंत्री विखे पाटील यांनी नेवासा तालुक्यातील वरखेड, शिरसगाव, लोहगाव,याठिकाणी भेटी देवून नूकसानीची पाहाणी केली.बांधावर जावून त्यांनी शेतकर्‍यांना पंचनामे झाले का? विमा कंपन्याचे प्रतिनिधी आले होते का? असे प्रश्न विचारले. यामध्ये विमा कंपनीचे प्रतिनिधी फोन उचलत नसल्याची तक्रार एका शेतकर्‍याने करताच विमा कंपनीच्या तालुका प्रतिनिधी कडून नंबर घेत जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले यांनी कंपनीच्या राज्यपातळीवरील अधिकार्‍यास फोन लावला. मंत्री विखे पाटील यांनी विमा कंपनीकडून होत असलेल्या हलगर्जीपणा बोलून दाखवत कंपनीच्या कारभारावर नाराजी व्यक्त केली.

हजारो रुपयांचे हप्ते भरून घेता आणि तुटपुंजी मदत करता असा प्रश्न करून शेतकर्‍यांच्या झालेल्या फसवणुकीस तुम्हीच जबाबदार असल्याचे खडेबोल सुनावले.

अनेक ठिकाणी पंचनामे होत नसल्याच्या तक्रारी आल्यानंतर त्यांनी तहसिलदार आणि तालुका कृषी अधिकारी यांनाही कडक शब्दात तंबी दिली. पंचनामे करण्यात हलगर्जीपणा करू नका मी कोणाचीही गय करणार नाही आशा स्पष्ट सूचना विखे पाटील यांनी दिल्या.

शिरसगाव येथे मंत्री विखे पाटील यांनी शेतकरी ग्रामस्थांशी संवाद साधला.झालेले नुकसान खूप मोठे असून सरसकट पंचनामे करण्याचे आदेश आपण दिले असल्याचे सांगून कोणीही मदतीपासून वंचित राहाणार नाही याची सरकार काळजी घेईल असे त्यांनी आश्वासित केले. यापूर्वी आपण कृषी मंत्री असताना भारत सरकारने एकच विमा कंपनी स्थापन करून शेतकर्‍यांना मदत केली होती.सध्या या विमा कंपन्या शेतकर्‍यांच्या मुळावर उठल्या असून याबाबत लवकरच निर्णय करावा लागेल. पुढील आठवड्यात कृषी मंत्र्यासह दोन्ही विभागांचे सचिव अधिकारी आणि विमा कंपन्याच्या प्रतिनिधीची बैठक घेवून शेतकर्‍यांना न्याय देणार असल्याचे सांगितले.

या तालुक्यात वाळू व्यावसायिकांचा उच्छाद वाढला असून त्यांचा बंदोबस्त करण्याची सुरूवात आज बोटी जप्त करून झाली आहे. यापुढे वाळू माफीयांना थारा नाही असा इशारा मंत्री विखे पाटील यांनी दिला.

राज्यात जनतेच्या मनातील सरकार आले असून लोकांच्या हिताचे निर्णय होत आहेत. नैसर्गिक संकट असताना नागरीकांची दिवाळी गोड व्हावी म्हणून ‘आनंदाचा शिधा’ या उपक्रमातून किराणा किट उपलब्ध करून दिले असल्याचे त्यांनी सांगितले.

जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष विठ्ठलराव लंघे, माजी आमदार बाळासाहेब मुरकुटे, भाजपाचे संघटन सरचिटणीस नितीन दिनकर, तालुका अध्यक्ष भाऊसाहेब फुलारी, शरद जाधव, अंकुश काळे, प्रताप चिंधे, प्रांताधिकारी श्रीनिवास अर्जून, तहसिलदार रुपेश सुराणा, पोलीस निरीक्षक विजय करे यांच्यासह सर्व वरीष्ठ अधिकारी उपस्थित होते.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com