कारखाना बंद पाडणारांनी गणेशला पुन्हा वैभव प्राप्त करून देण्याची भाषा करू नये

8 वर्षे ऊस नेणारांनी येथे येऊन आम्हाला तत्वज्ञान शिकवू नये
कारखाना बंद पाडणारांनी गणेशला पुन्हा वैभव प्राप्त करून देण्याची भाषा करू नये

राहाता |वार्ताहर| Rahata

गणेश कारखाना बंद पाडून ज्यांनी वैभव घालविले ते आता पुन्हा गणेशला वैभव प्राप्त करुन देण्याची भाषा करीत आहेत. ही भाषा त्यांना शोभत नाही. 8 वर्षे ऊस घेवून जात होते. त्यांनी आम्हाला येथे येऊन तत्वज्ञान सांगण्याची आवश्यकता नाही. ऊस कोणाला द्यायचा याचा सर्वस्वी निर्णय शेतकरी सभासद करतील. मलाही कार्यकर्त्यांच्या पाठीशी उभेच राहावे लागेल, असे प्रतिपादन महसूल, पशुसंवर्धन व दुग्ध व्यवसाय विकास मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी केले.

शासन आपल्या दारी उपक्रमात डॉ.धनंजय धनवटे, सदाशिव धनवटे, बाबुराव लोंढे, डॉ.संपत शेळके, बाळासाहेब गाडेकर आदींनी गणेश कारखान्याच्या संदर्भात उपस्थित केलेल्या प्रश्नावर मंत्री विखे पाटील यांनी भाष्य करुन ऊस उत्पादक शेतकर्‍यांना आश्वासित केले. ऊसाच्या नोंदी करुन घेण्याची विनंती करीत याबाबतचा ठरावही कार्यकर्त्यांनी उत्स्फूर्तपणे मांडला. त्याला अनुसरून मंत्री विखे पाटील यांनी आपल्या भाषणात गणेश कारखान्याच्या संदर्भात भाष्य केले. याप्रसंगी मुकुंदराव सदाफळ, अ‍ॅड.रघुनाथ बोठे, बाजार समितीचे सभापती ज्ञानेश्वर गोंदकर, कैलास कोते, अभय शेळके, नितीन कापसे, प्रकाश चित्ते, डॉ.धनजंय धनवटे, सतिष बावके, अतिरिक्त जिल्हाधिकारी श्री. कोळेकर, प्रांताधिकारी माणिकराव आहेर, तहसीलदार अमोल मोरे यांच्यासह तालुक्यातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यावेळी ना. विखे पाटील म्हणाले, मागील काही दिवसांपासून आपण अनेकांचे वक्तव्य ऐकत आहोत. गणेश कारखान्याला वैभव प्राप्त करुन देणार असे भाष्य करणार्‍यांनीच गणेशची काय अवस्था करुन ठेवली होती हे सभासदांनी पाहिले आहे. 27 महिने कामगारांचे पगार नव्हते, शेतकर्‍यांचे पैसे थकले होते, पद्मश्री डॉ.विठ्ठलराव विखे पाटील सहकारी साखर कारखान्याने आर्थिक भार सोसून हा कारखाना चालू केला. शेतकरी आणि कामगारांचे हित जोपासले. गणेश कारखाना आज कर्जमुक्त करून तुमच्या ताब्यात दिला आहे. डॉ.विखे पाटील कारखान्याचे 30 ते 35 कोटी रुपये घेणे आहे. 8 वर्षे जे ऊस घेऊन जात होते त्यांनी आता ऊस नेवू नये असे केलेले वक्तव्य आश्चर्यकारक वाटते असा टोलाही त्यांनी लगावला.

गणेश कारखान्याला तुम्ही आता कोणते वैभव प्राप्त करुन देणार, हे वैभव तुम्हीच घालविले होते. तुम्हाला तुमचे कार्यकर्ते सांभाळायचे होते म्हणून ऊस नेला. आता मी सुध्दा बघ्याची भूमिका घेणार नाही, कार्यकर्त्यांच्या पाठीशी मलाही खंबीरपणे उभे राहावेच लागेल असे स्पष्ट करत ना. विखे पाटील म्हणाले, ऊस कोणाला द्यायचा याचा निर्णय शेतकरी सभासद करतील. याबाबत बाहेरच्यांनी येवून आम्हाला सल्ले देवू नयेत. कार्यकर्त्यांनी आता गावपातळीवर संघटना एकीसाठी प्रयत्न करावेत. आपआपसातील मतभेद दूर करुन आगामी निवडणुकांच्यादृष्टीने काम करावे.

यंदाचे पावसाचे प्रमाण खुप कमी असल्याने पाण्याची टंचाई भेडसावणार आहे. यापुर्वी आपण नोव्हेंबरपासून आवर्तनाचे नियोजन करीत होतो. आता तर ऑगस्टमध्येच आपल्याला धरणातून पाणी सोडण्याची वेळ आली आहे. त्याचेही नियोजन काटेकोरपणे करावे लागणार असल्याचे त्यांनी सांगितले.

माजी नगराध्यक्ष अभय शेळके यांनी आपल्या भाषणात मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी शिर्डी शहरासाठी केलेल्या कामाचा आढावा घेतला. 9 ऑगस्ट 2022 रोजी मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी महसूल मंत्री पदाची शपथ घेतली होती. मंत्री पदास एक वर्षे पूर्ण झाल्याबद्दल ग्रामस्थांच्यावतीने त्यांचा सत्कार करण्यात आला.

यावेळी मुख्याधिकारी तुषार आहेर, डॉ. संतोष मैड, डॉ. के.वाय गाडेकर, राजेंद्र वाबळे, नानासाहेब बोठे, सुखदेव गाडेकर, डॉ. स्वाधीन गाडेकर, ज्ञानेश्वर सदाफळ, मुन्ना शहा, सलीम शाहा, विलास कोते, सचिन मुरादे, गफ्फर पठाण, प्रवीण सदाफळ, ज्ञानेश्वर गाडेकर, दिलीप गाडेकर, डॉ. महेश गव्हाणे, विजय सदाफळ, सागर सदाफळ, अण्णा लांडबिले, प्रकाश पुंड, भारत लोखंडे आदींसह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

   
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com