अस्तित्व गमावून बसलेल्यांच्या टीकेकडे लक्ष देण्याची गरज काय?

मंत्री विखे यांचा थोरातांवर पलटवार
आ. विखे
आ. विखे

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

सरकार कोठे आहे, असे विचारणार्‍यांच्या टीकेला फार महत्त्व देण्याची गरज मला वाटत नाही. जे जनतेतील स्वतःचे अस्तित्व गमावून बसल्याच्या शल्यातून ते सरकारवर टीका करतात. त्यामुळे माझ्या दृष्टीने त्यांच्याकडे फार लक्ष देण्याची गरज नाही, असा पलटवार मंत्री राधाकृष्ण विखे यांनी आ. बाळासाहेब थोरातांवर शनिवारी केला. दरम्यान, महाराष्ट्रातून नाणार रिफायनरी प्रकल्प का गेला, याचे उत्तर ठाकरेंनी द्यावे. राज्यातील गुंतवणूक बाहेर गेली असे त्यांचे म्हणणे म्हणजे चोराच्या उलट्या बोंबा सुरू आहेत, असे भाष्यही त्यांनी केले.

पंतप्रधान मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित कार्यक्रमानंतर मंत्री विखे पत्रकारांशी बोलत होते. यावेळी माजी आमदार शिवाजी कर्डिले उपस्थित होते. दोन दिवसांपूर्वी आ. थोरात यांनी राज्यात सरकार कोठे आहे, असा सवाल केला होता. त्याला प्रत्युत्तर मंत्री विखे यांनी दिले. त्यांच्या टीकेला फार महत्त्व देण्याची गरज नाही व सत्ता गेल्याचे वैफल्य व शल्यातून ते टीका करीत आहेत, असे ते म्हणाले.

नाणार रिफायनरी प्रकल्प महाराष्ट्रातून का गेला, याचे उत्तर ठाकरेंनी दिले पाहिजे. आदित्य ठाकरे नासमज आहेत व त्यांनी अगोदर माहिती करून घेतली पाहिजे, असे सांगून विखे म्हणाले, नाणार रिफायनरी घालवण्याचे पाप कोणी केले? त्यांनी राज्यातील गुंतवणूक बाहेर जाते असे म्हणणे, म्हणजे चोराच्या उलट्या बोंबा आहेत. प्रत्येक प्रकल्पात टक्केवारी मागितली गेली, त्याचा पुरावा व वस्तुस्थिती पुढे येईलच. पण ज्यांनी प्रकल्प घालवले, त्या सेना नेत्यांच्या तोंडी राज्य सरकारवर आरोप शोभत नाहीत. तो पोरकटपणा आहे, अशी टीकाही विखे यांनी केली.

वेदांता प्रकल्पाबाबत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट खुलासा केला आहे. हा प्रकल्प गुजरातला गेला तो महाविकास आघाडी सरकारच्या निष्क्रीयतेमुळे गेला आहे. मागच्या अडीच वर्षात त्यांनी राज्यात किती गुंतवणूक आणली, असे विचारले तर त्याचे उत्तर त्यांना द्यावे लागेल, असे स्पष्ट करून विखे म्हणाले, नवे सरकार स्थापन होऊन एक महिना झाला आहे. वेदांताचा विषय मागील 7-8 महिन्यांपासून सुरू आहे. त्यामुळे तो राज्यातून बाहेर जाणे, हे मागच्या सरकारचे पाप आहे.

आता उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी पुन्हा प्रयत्न सुरू केले आहेत. पण आता हा प्रकल्प परत येण्याची शक्यता नाही. मात्र, वेदांताने आश्वासन दिले आहे की, त्यांचा जो पुढचा प्रकल्प ते सुरू करणार आहेत, तो व अन्य प्रकल्प ते महाराष्ट्रात सुरू करणार आहेत. त्यामुळे आताच्या प्रकल्पापेक्षा जास्त गुंतवणूक व रोजगार निर्मिती महाराष्ट्रात होणार आहे व याचे यश नव्या सरकारला मिळणार आहे. गेलेला प्रकल्प मागच्या सरकारच्या निष्क्रीयतेमुळे गेला व त्यांचेच ते पाप आहे, असा दावाही मंत्री विखेंनी केला.

पवारांनी आत्मपरीक्षण करावे

यावेळी बोलताना मंत्री विखे यांनी राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्यावरही टीका केली. मागील अडीच वर्षात आघाडी सरकारच्या माध्यमातून समाजाला आधार देण्याचे काय काम केले, याचे आत्मपरीक्षण त्यांनी करावे, असे सांगून विखे म्हणाले, राष्ट्रवादी व काँग्रेसचे नेते वैफल्यग्रस्त होऊन बोलत आहेत. सत्ता गेल्याचे त्यांच्या पचनी पडत नाही. कोविड काळात ते रुग्णांना उपचार देऊ शकले नाही, लसीकरण करू शकले नाही, गरीबांना धान्य ही देऊ शकले नाही. पण प्रत्येक गोष्टीला विरोध व टीका आता सुरू आहे. विरोधकांचे अस्तित्व दिसत नाही व प्रसिद्धीसाठी ते सरकारवर टीका करीत आहेत, असा दावाही विखे यांनी केला.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com