बेजबाबदार अधिकारी व कर्मचार्‍यांची चौकशी करून कारवाई करू

ना. विखे : व्यापारी संकुलातील गाळेधारकांच्या नुकसानीची पाहणी
बेजबाबदार अधिकारी व कर्मचार्‍यांची चौकशी करून कारवाई करू

राहाता |वार्ताहर| Rahata

नगरपरिषदेच्या हलगर्जीपणामुळे व्यापारी संकुलातील गाळेधारकांचे अतिवृष्टीमुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून बेजबाबदार असलेले अधिकारी व कर्मचारी यांची चौकशी करून त्यांच्यावर कडक कारवाई केली जाईल, अशी प्रतिक्रिया महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी राहाता येथील छत्रपती शिवाजी महाराज व्यापारी संकुलातील गाळेधारकांच्या अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या परिस्थितीची पाहणी करताना व्यक्त केली.

गाळेधारकांच्या नुकसानीची पाहणी केल्यानंतर ना. विखे पाटील म्हणाले, नगरपरिषदेने पावसाळा सुरू होण्याआधी व्यापारी संकुलात पाणी जाणार नाही याची दक्षता घेणे गरजेचे होते. गेल्या काही वर्षापासून नगरपरिषदेने या कॉम्प्लेक्सकडे दुर्लक्ष केले आहे. वेळीच लक्ष दिले असते तर ही वेळ आली नसती. 28 कोटी भूमिगत गटार योजनेच्या रक्कमेचा वापर कसा झाला हे बघावे लागेल. तज्ञ इंजिनिअर नेमून पुन्हा या संकुलात पावसाचे पाणी येणार नाही यासाठी कायमस्वरूपी उपाययोजना करावी लागेल.

गाळेधारकांनी पाच वर्षांचे भाडे माफ व्हावे तसेच पंचनामे झालेल्या गाळेधारकांना नुकसान भरपाई मिळावी व जोपर्यंत नुकसान भरपाई मिळत नाही तोपर्यंत भाडे आकारू नये, अशी मागणी यावेळी निवेदनाद्वारे केली.

याला उत्तर देताना ना. विखे पाटील म्हणाले, गाळेधारकांना मदत मिळण्यासाठी शासनाकडून काय उपाययोजना करता येईल तसेच भाडे रकमेत कशी सवलत देता येईल याकरिता शासनाकडे प्रस्ताव पाठवावा लागेल. कॉम्प्लेक्ससमोर आधुनिक स्वच्छतागृह बसवण्याची गरज नव्हती. ते तात्काळ त्या जागेवरून काढून दुसर्‍या ठिकाणी बसवण्याच्या त्यांनी सूचना करून संकुलातील राहिलेले अपूर्ण काम तात्काळ होण्याकरिता प्रांताधिकारी यांना जबाबदारी दिली.

शनिवारी दुपारी महसूल मंत्री विखे पाटील यांनी गाळेधारकांच्या झालेल्या नुकसानीची पाहणी करून त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. यावेळी गाळेधारकांच्यावतीने विजय मोगले यांनी व्यापारी संकुलातील व्यावसायिकांना नगरपरिषदेकडून कुठलेही सहकार्य मिळत नाही. अनेकदा निवेदन देऊनही गाळेधारकांच्या कुठल्याही मागण्या मान्य केल्या जात नाहीत. व्यापारी संकुलात स्वच्छता केली जात नाही. चार ते पाच वेळा पावसाचे पाणी जाण्याच्या घटना घडल्या त्यामुळे व्यवसायिकांचे लाखोंचे नुकसान झाले. अशा विविध समस्या त्यांनी ना. विखे पाटील यांच्यासमोर मांडल्या.

गाळेधारकांच्यावतीने नंदकुमार गाडेकर, वाल्मीक सदाफळ, सतीश वाघ, गजानन सावंत, गणेश जाधव, सुनील निचिते, अनिल पवार, बबलू बनकर, प्रगती खडांगळे, अरुणा भगत, नीलम पवार आदी गाळेधारक तसेच प्रांताधिकारी गोविंद शिंदे, तहसीलदार कुंदन हिरे, गणेश कारखान्याचे चेअरमन मुकुंदराव सदाफळ, सभापती भाऊसाहेब जेजुरकर, अ‍ॅड. रघुनाथ बोठे, कैलास सदाफळ, राजेंद्र वाबळे, साहेबराव निधाने, राहुल सदाफळ, सागर सदाफळ, प्रवीण सदाफळ, मुन्ना सदाफळ, गणेश बोरकर, भाऊसाहेब चौधरी, प्रल्हाद चौधरी, मुन्ना शहा, पप्पू शेळके, गोटू बोरकर, अनिल बोठे, सुनील बोठे, विजय शिंदे, सलीम शहा, कल्याण माळवदे यांच्यासह शहरातील नागरिक व गाळेधारक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com