...तर त्या नगरसेवकांची नावे पालिका निवडणूक प्रचारात जाहीर करणार - ना. प्राजक्त तनपुरे

...तर त्या नगरसेवकांची नावे पालिका निवडणूक प्रचारात जाहीर करणार - ना. प्राजक्त तनपुरे

देवळाली प्रवरा |वार्ताहर| Deolali Pravara

राहुरी नगरपालिकेचा नगराध्यक्ष असताना भाजपाने आम्हाला सवतीची वागणूक दिली. महाविकास आघाडी राज्यात सत्तेत आहे. परंतु भाजपाच्या ताब्यात असलेली देवळाली प्रवरा नगरपालिकेस भूमिगत गटार व स्मशानभूमीसाठी मोठा निधी दिला आहे. आम्ही मात्र, निधी देण्यास कोणतीही आडकाठी आणली नाही. मुख्याधिकारी अजित निकत यांना उद्देशून भूमिगत गटार पूर्ण झाल्यावर तरी बोलवा. देवळाली प्रवरास सर्वाधिक निधी द्यावा, यासाठी कोणते नगरसेवक माझ्याकडे प्रयत्न करीत होते? त्यांची नावे निवडणुकीच्या प्रचारात जाहीर करील, असे खुले आवाहन उर्जा राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी देवळाली प्रवरा येथे पालिकेच्या भाजपाच्या सत्ताधार्‍यांना दिले.

देवळाली प्रवरा येथील माजी सैनिकांचा राज्यमंत्री तनपुरे यांनी स्वतः प्रजासत्ताक दिनानिमित्त सन्मान केला. त्यावेळी ना.तनपुरे बोलत होते. अध्यक्षस्थानी माजी नगराध्यक्ष बाळासाहेब चव्हाण होते. यावेळी आदर्श पतसंस्थेचे चेअरमन अण्णासाहेब चोथे, शिवबा प्रतिष्ठानचे अध्यक्ष आदिनाथ कराळे, माजी नगरसेवक बाळासाहेब खुरुद, सतीश वाळुंज, केदारनाथ चव्हाण, माजी नगरसेवक सचिन ढुस, मुख्याधिकारी अजित निकत आदी उपस्थित होते.

ना.तनपुरे म्हणाले, दोन अडीच वर्षाच्या काळात भाजपाच्या सत्ताधार्‍यांकडून कामे का झाली नाही? परंतु देवळाली प्रवरा नगर पालिकेतील काही नगरसेवकांनी मला गळ घालून भूमिगत गटार व स्मशानभूमीचा प्रश्न सोडविण्याची विनंती केली.त्यानुसार जिल्हाधिकारी यांना संपर्क करुन प्रश्न मार्गी लावण्यास सांगितले. असे ना.तनपुरे यांनी स्पष्ट केले.

ना.तनपुरे पुढे म्हणाले, मी राहुरी नगरपालिकेचा नगराध्यक्ष असताना राज्यात भाजपाची सत्ता होती. त्यावेळी मला सवतीची वागणूक मिळत होती. महाविकास आघाडी सरकारच्या काळात नगरपालिकेची सत्ता कोणाच्या ताब्यात आहे? हे न पाहाता नागरिकांच्या सोयीसाठी जलदगतीने कामास मंजुरी देऊन निधी वर्ग केला आहे. आमच्या सरकारने तुम्हाला निधी दिला. भूमिगत गटारीचे काम पूर्ण झाल्यावर तरी आम्हाला बोलवा, असे मुख्याधिकारी अजित निकत यांच्याकडे पाहत इशारा करताच एकच हशा पिकला.नगरपालिकेस चांगला निधी मिळावा, यासाठी अडचणी येऊ नये म्हणून देवळाली प्रवराचे काही नगरसेवक माझ्या कायम संपर्कात होते. त्यांनी कामाची अडवणूक होऊ नये, याची दक्षता घेतली. त्यांची नावे नगर पालिका निवडणुकीच्या प्रचारात जाहीर करणार आहे. असेही ना.तनपुरे यांनी सांगितले.

ना.तनपुरे यांनी माजी सैनिक प्रभाकर महांकाळ, ज्ञानदेव चव्हाण, दत्तात्रय कडू, ज्ञानदेव पठारे, दिलीप गुलदगड, सुधीर नाकाडे, प्रविण पठारे, विलास उंडे, चेतन गिरमे, चंद्रकांत देशमुख आदींचा सन्मान केला.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com