जनता दरबाराच्या माध्यमातून नागरिकांबरोबर जुळते नाळ

वांबोरीत ना. प्राजक्त तनपुरेंच्या जनता दरबाराला उत्स्फूर्त प्रतिसाद
जनता दरबाराच्या माध्यमातून नागरिकांबरोबर जुळते नाळ

उंबरे |वार्ताहर| Umbare

मंत्रीपदाचा कार्यभार सांभाळताना मतदारसंघातील ज्या जनता जनार्दनाने राजकीय पाठबळ देऊन सत्तेचे पद मिळवून दिले, त्यांच्या समस्या सोडविण्यासाठी मी सदैव बांधील आहे. माझी नाळ जनतेच्या प्रश्नाबरोबर जुळलेली आहे. त्यामुळे माझ्या मतदारसंघातील नागरिकांच्या समस्या त्यांच्याच गावात जाऊन मांडण्यासाठी मी प्रयत्नशील असतो. त्यांच्या समस्यांचा पाठपुरावाही करतो. नागरिकांना कामासाठी हेलपाटे मारायला लावण्यापेक्षा आपणच त्यांचे प्रश्न समजून घेण्यासाठी जनता दरबार भरविला जातो. त्यातून त्यांना न्याय देण्याचे समाधान मिळते, असे प्रतिपादन राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी केले.

वांबोरी येथे ना. तनपुरे यांनी नागरिकांच्या समस्या सोडविण्यासाठी जनता दरबाराबे आयोजन केले होते. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी जनता दरबारात नागरिकांनी आपआपल्या समस्यांचा पाऊस पाडला. त्यावर ना. तनपुरे यांनी ‘ऑन द स्पॉट’ समस्या सोडवून नागरिकांचे समाधान केले. मागील जनता दरबारात काही महिलांनी रेशनकार्डबाबत तसेच विविध दाखल्यांबाबत ना. तनपुरे यांच्याकडे तक्रारी केल्या होत्या. यावेळी ना.तनपुरे यांनी त्यांच्या मागण्या पूर्ण करून रेशनकार्डसह विविध दाखल्यांचे वाटप केल्याने महिलांनी समाधान व्यक्त केले.

ना. तनपुरे म्हणाले, जनतेच्या समस्यांची पूर्ती केलीच पाहिजे, ते माझे आद्यकर्तव्य आहे. त्यासाठी राहुरी, नगर व पाथर्डी तालुक्यातील महत्वाच्या गावात जाऊन जनता दरबाराच्या माध्यमातून प्रश्न सोडविले जातात. त्याचबरोबर जनतेशीही नाळ कायम रहाते. यावेळी महावितरण, आदिवासींचे प्रश्न, शेतकर्‍यांचे प्रश्न, महिलांच्या समस्या, विद्यार्थ्यांच्या समस्या, ट्रान्सफॉर्मर आदींबाबत आढावा घेऊन ना. तनपुरे यांनी याबाबतचे प्रश्न सोडविले.

यावेळी तहसीलदार फसियोद्दीन शेख, माजी जि.प. अध्यक्ष बाबासाहेब भिटे, गोविंद मोकाटे, राष्ट्रवादीचे राहुरी तालुकाध्यक्ष मच्छिंद्र सोनवणे, माजी सरपंच नितीन बाफना, किसन जवरे, कृष्णा पटारे, इश्वर कुसमुडे, कृषी अधिकारी ठोकळे, परिमंडल अधिकारी दत्ता गोसावी, कामगार तलाठी अभिजित क्षीरसागर, ग्रामविकास अधिकारी बी.के. गागरे, आदींसह नागरिक उपस्थित होते.

   
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com