राहुरी तहसील कार्यालयात ना.तनपुरेंनी घेतली अधिकार्‍यांची झाडाझडती

राहुरी तहसील कार्यालयात ना.तनपुरेंनी घेतली अधिकार्‍यांची झाडाझडती

राहुरी (तालुका प्रतिनिधी) -

राहुरी तहसील कार्यालयात रेशनकार्डच्या कामांना दिरंगाई होत असल्याच्या तक्रारी राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांच्याकडे काही

लोकांनी केल्या. त्यामुळे ना.तनपुरे यांनी तहसील कार्यालयात जाऊन रेशनकार्ड संबंधित दप्तर पाहून कर्मचार्‍यांची कानउघाडणी केली. तसेच सामान्य जनतेला कोणत्याही प्रकारे त्रास नाही झाला पाहिजे, असे सांगितले.

राहुरी तहसील कार्यालयात नवीन रेशनकार्ड बनविणे, दुबार प्रत काढणे, नाव कमी करणे किंवा समाविष्ट करणे, या कामांसाठी दिरंगाई होत आहे. अशा तक्रारी काही लोकांनी थेट ना. तनपुरे यांच्याकडे केल्या होत्या. या तक्रारींची दखल घेत तनपुरे यांनी तहसील कार्यलयात जाऊन रेशनकार्ड संबंधीचे दप्तर तपासून पाहिले. यावेळी त्यांना काही त्रुटी आढळून आल्या. संबंधित कर्मचार्‍यांची कानउघाडणी करत अशी दप्तर दिरंगाई चालणार नाही, यानंतर परत कधी आलो तर सर्व कामांची दप्तर नोंद व्यवस्थित दिसली पाहिजे, दलालांमार्फत तहसील कार्यालयात येणार्‍या नागरिकांची आर्थिक लूट होऊ नये. तसेच सामान्य जनतेला कोणत्याही प्रकारचा त्रास झालेला मी सहन करणार नाही, असा सज्जड इशारा तनपुरे यांनी दिला.

तालुक्यातील स्वस्त धान्य दुकानामार्फत सामान्य जनतेला होत असलेल्या धान्य पुरवठ्याबाबत माहिती घेतली. गोरगरीब लाभार्थ्यांना रेशनकार्डवर धान्य पुरवठा व्यवस्थित झाला पाहिजे, अशा सूचना संबंधित अधिकार्‍यांना दिल्या.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com