राहुरी |तालुका प्रतिनिधी| Rahuri

जनतेमध्ये करोना आजाराबाबत भीती व गैरसमज असल्याने नागरिक तपासणीसाठी लवकर पुढे येत नाहीत

व त्यातून उपचारास विलंब झाल्याने अप्रिय घटना घडण्याचा धोका संभवतो, अशी माहिती वैद्यकीय सूत्रांकडून येत आहे. नागरिकांनी घाबरून न जाता लवकरात लवकर लक्षणे दिसल्यास किंवा शंका वाटल्यास त्वरित तपासणी करून घ्यावी व वेळेवर उपचार घेऊन करोनामुक्त व्हावे, असे आवाहन नामदार प्राजक्त तनपुरे यांनी केले आहे.

करोना महामारीच्या पार्श्वभूमीवर शासकीय उपाययोजना व माहिती देण्यासाठी राहुरी तहसील कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. ना. तनपुरे म्हणाले, आपल्याकडे तपासणीची सुविधा चांगल्याप्रकारे उपलब्ध असून कीटची संख्या उपलब्ध आहे.

तरी लवकर तपासणी झाल्यास उपचारांबरोबरच रोगाचा फैलाव काही प्रमाणात कमी होईल, यासाठी सर्वांची साथ आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले. राहुरी शहर, वांबोरी, देवळाली प्रवरा याठिकाणी मास्क न वापरणार्यांवर उद्यापासून कठोर कारवाई केली जाईल. यासाठी नगरपरिषदेचे पथक व पोलिसांचे पथक नेमण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली.

नागरिकांनीही याबाबत सकारात्मक प्रतिसाद देऊन कारवाई करण्याची वेळ येऊ देऊ नये, असे आवाहन त्यांनी केले. नगरसेवक व पदाधिकार्यांनी वॉर्डनिहाय तपासणी कॅम्प घेतल्यास त्यांनाही कीटसह तपासणी सुविधा उपलब्ध करून देण्यात येतील व यातून लवकरात लवकर रुग्ण सापडून फैलाव कमी होण्यास मदत होईल.

शासनाच्या ‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ या अभियानांतर्गत माहिती देताना तहसीलदार फसियोद्दीन शेख म्हणाले, तालुक्यात आजपर्यंत 1 हजार 822 रुग्ण सापडले असून 1 हजार 591 रुग्णांनी करोनावर मात केली आहे. 181 रुग्ण उपचारात असून यापैकी 89 रुग्ण विद्यापीठ विलगीकरण कक्षात तर पाच रुग्ण विवेकानंद नर्सिंग येथे उपचार घेत आहेत.

तालुक्यात शंभरपैकी बारा पॉईंट 73 पॉझिटिव्ह सापडण्याचा जो रेट आहे इतर तालुक्यापेक्षा खूप कमी आहे. दुसर्या टप्प्यात प्रत्येक टीममागे एक डॉक्टर ठेवणार असून आरोग्य समस्यांच्या माहितीचे काम सुरू आहे. रॅपिड टेस्टिंग वाढवून नागरिकांच्या मनातील भीती दूर करण्याचाही प्रयत्न करण्यात येत आहे.

मास्क न लावल्याबद्दल 550 केसेस दंडात्मक कारवाई करून करण्यात आलेल्या आहेत. तर 144 लोकांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. नगरपरिषदेचे मुख्याधिकारी श्रीनिवास कुरे यांनी शहरात 21 हजार नागरिकांची तपासणी करण्यात आलेली असून हे काम पुढे सुरूच आहे. 733 व्यक्तींवर गर्दी करणे, विना मास्क तसेच दुकाने वेळेच्यानंतर उघडी ठेवणे याअंतर्गत कारवाई करून एक लाख 78 हजार रुपये दंड वसूल करण्यात आल्याची माहिती दिली. यावेळी पीआय मुकुंद देशमुख, राष्ट्रवादीचे संतोष आघाव, महेश उदावंत, नंदकुमार तनपुरे, डॉ.जयंत कुलकर्णी आदी उपस्थित होते.