‘राहुरी’चा लसीकरण पॅटर्न राज्यात राबविणार- ना. तनपुरे

‘राहुरी’चा लसीकरण पॅटर्न राज्यात राबविणार- ना. तनपुरे

राहुरी |तालुका प्रतिनिधी| Rahrui

राज्यात करोना प्रसाराचा वेग काही ठिकाणी कमी होताना दिसत असला तरी लसीकरणातील व्यत्यय आणि लस केंद्राद्वारे होणारी गर्दी काळजी वाढवित आहे. यावर नगरविकास राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी काही उपाय सुचविले आहेत. त्याची अंमलबजावणी राहुरी तालुक्यात सुरू केली आहे. लसींची उपलब्धता, सरकार पातळीवर सुरू असलेल्या उपाययोजना याबाबत त्यांच्याशी साधलेला संवाद!

ना. तनपुरे म्हणाले, सध्या करोना महामारीने केवळ राज्यातच नव्हे तर देशातही थैमान घातलेले आहे. त्यामुळे ही राष्ट्रीय आपत्ती ठरली आहे. रुग्णसंख्या वाढत असताना केलेल्या उपाययोजना अपुर्‍या पडत आहेत. सध्या राहुरी तालुक्यात पथदर्शी ठरणारा फॉर्म्युला वापरला जात आहे. त्याच पार्श्वभूमीवर नगर जिल्ह्याला जो लसीचा पुरवठा केला जातो, त्यांची जिल्ह्यातील 160 लसीकरण केंद्रातील वेगवेगळे प्राथमिक आरोग्य केंद्र आणि ग्रामीण रुग्णालय यांच्यात समप्रमाणामध्ये विभागणी करण्यात आली.

प्रारंभीच्या काळामध्ये लोकांमध्ये लस घेण्याचे प्रमाण कमी होते. परंतु जेव्हा ही रुग्णसंख्या वाढली, तेव्हा लसीकरण केंद्रावरही गर्दी वाढली. त्यामुळे लसीची कमतरता भासू लागली. यावर प्रशासन आणि नागरिक, वैद्यकीय तज्ज्ञांच्या समविचारातून त्यावर उपाययोजना केल्या. ज्यांनी पहिला डोस घेतला, त्यांना 70 टक्के प्राधान्य देण्यात आले. तर पहिला डोस घेणार्‍यांना 30 टक्के प्राधान्य देण्यात आले. गावनिहाय याद्यानुसार क्रमवारी पद्धतीने लसीकरण करण्यात आले. यात राजकारणविरहित काम करून वशिलेबाजी न करता जसा पुरवठा तसे लसीकरण अशी पद्धत राबविण्यात आली. लाभार्थ्यांना निरोप देण्यात येत असल्याने आता सेंटरवर गर्दीही होत नाही. त्यामुळे आता हा राहुरीचा पॅटर्न राज्यभर राबविण्यात येणार असल्याचे ना. तनपुरे यांनी सांगितले.

लसीकरणाची मोहीम सुरू झालेली असताना अनेक ठिकाणी अडचणी आणि संकटांचा सामना करावा लागतोय. लसी कमी आहेत, त्यात पुन्हा नागरिकांची गर्दी उसळते आणि त्यातून नवीन संकट निर्माण होतात, करोनातील संकटांची मालिका वाढतच चालली आहे, हे आणखी किती दिवस अपेक्षित आहे? एवढ्या मोठ्या प्रमाणावर आणि एवढा मोठ्या झपाट्याने त्याचा प्रसार असेल असे अपेक्षित नव्हते. उत्तर महाराष्ट्रातील जिल्ह्यांसह मुंबई शहरामध्ये करोनाबाधितांचे प्रमाण फार वाढलेले होते.

मात्र, त्यावर नियंत्रण ठेवण्यामध्ये यश आले आहे. नगर जिल्ह्यामध्ये लवकरात लवकर करोनाच्या वाढत्या रूग्णसंख्येवर नियंत्रण मिळून जे काही उपाय असतील किंवा इतर अनुषंगिक शासनाने उपाययोजना केल्या. त्याला लोकांनीही सहकार्य केले. नियमांचे काटेकोर पालन केलं तर निश्चितपणे नगर जिल्ह्याचा देखील आकडा लवकरच कमी होईल. असा आशावाद ना. तनपुरे यांनी व्यक्त केला.

या पार्श्वभूमीवर नगर व पाथर्डी तालुक्यात प्रशासनाच्या बैठका घेतल्या. प्रत्येक ठिकाणची जी परिस्थिती आहे, त्याला अनुसरून त्यावर काही उपाययोजना करता येईल का? यावर सर्व तहसीलदार, गटविकास अधिकारी, तालुका आरोग्य अधिकारी यांच्या बैठकांचे नियोजन लावण्याच्या त्यांना सूचना केल्या. तालुक्यामध्ये ज्यांचे पहिले डोस घेऊन झालेले आहेत, त्यांना वेळेमध्ये दुसरा डोस मिळण्यास प्राधान्य असले पाहिजे. पहिला डोसची संख्या प्राथमिक आरोग्य केंद्रावर किती असेल? याबाबतची सगळी माहिती मागवली होती. त्यावर बैठका घेतल्या. ज्यांना पहिला डोस दिलेला आहे, त्यांना प्रशासनामार्फत निरोप देऊन त्यांचा दुसरा डोस करावा, अशा पद्धतीचे नियोजन स्थानिक पातळीवर केले आहे.

राहुरी तालुक्यात वेगवेगळ्या प्राथमिक आरोग्य केंद्रात दुसरा डोस दिला. क्रमवारीनुसार ज्या क्रमाने पहिला डोस घेतला, त्यानुसार निरोप देण्याची व्यवस्था केली. त्याला चांगला प्रतिसाद मिळाला. पहिला डोस गावातच आणि दुसरा डोस प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये द्यायची व्यवस्था करतोय. क्रमवारीनुसार कुठलाही राजकीय हस्तक्षेप नाही, कुठलीही वशिलेबाजी नाही, यानुसार हा फॉर्म्युला प्रायोगिक तत्त्वावर राहुरी तालुक्यामध्ये चालू केला आहे. गावागावांमध्ये गर्दी न होता वशिलेबाजी न होता लोकांना पहिला डोस मिळाला. त जिल्ह्यातील इतर तालुक्यात स्थानिक पातळीवर नियोजन केलेले आहे.

पहिली लाट आली, त्यामध्ये ऑक्सिजनची मागणी कमी होती. मात्र, दुसर्‍या लाटेत मोठ्या प्रमाणावर रूग्णांची संख्या वाढली. मात्र, आक्सिजनची मागणी वाढल्यानंतर पुरवठा कमी पडला. आपत्ती व्यवस्थापनासाठी निधी हा प्रत्येक जिल्ह्याला उपलब्ध करून दिला आहे.

नगर जिल्ह्यात देखील आपत्ती व्यवस्थापनाच्या निधीमधून प्रत्येक तालुक्यामध्ये उपाययोजना करण्यात येणार आहेत. तालुका पातळीवर ऑक्सिजन निर्माण करणारे प्लांट प्रत्येक तालुक्यामध्ये बसविणार आहे. भविष्यात जर संख्या वाढली तर निश्चितपणे त्याचा फायदा होणार आहे. राहुरीमध्ये माझ्या एका संस्थेमार्फत ऑक्सिजन निर्मितीसाठी पाऊल उचलण्यात आले आहे.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com