ना. तनपुरेंसारख्या सुसंस्कृत लोकप्रतिनिधींचे राज्याच्या विकासात भरीव योगदान - ना. कदम

ना. तनपुरेंसारख्या सुसंस्कृत लोकप्रतिनिधींचे राज्याच्या विकासात भरीव योगदान - ना. कदम

राहुरी |तालुका प्रतिनिधी| Rahuri

राहुरीकर जनतेने ना. प्राजक्त तनपुरे यांच्यासारखा सुशिक्षित, सुसंस्कारीत राजकारणी निवडून तुमच्या मतदारसंघाच्याच नव्हे तर राज्याच्या विकासात भरीव योगदान देऊ शकेल, असा लोकप्रतिनिधी निवडला. यासाठी या मतदारसंघातील जनता खरोखर अभिनंदनास पात्र आहे. ना. तनपुरेंच्या मार्गदर्शनाचा आपण स्वतः आपल्या मतदारसंघातील कामे मार्गी लावण्यासाठी उपयोग करता येईल, असा आशावाद राज्याचे सहकार, कृषी, सामजिक न्याय राज्यमंत्री डॉ. विश्वजित कदम यांनी व्यक्त केला.

राहुरी येथील नगरपरिषदेच्या महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान महाभियान अंतर्गत राहुरी शहराच्या बहुचर्चित सुधारित 26 कोटी अंदाजित रुपयांच्या खर्चाच्या पाणीयोजनेचा भूमिपूजन प्रसंगी आयोजित कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावरून ते मार्गदर्शन करीत होते. राहुरी स्टेशन रोडवरील मंगल कार्यालयाच्या प्रांगणात राज्यमंत्री आदिती तटकरे, ना. प्राजक्त तनपुरे, कर्जत-जामखेडचे आमदार रोहित पवार, आ. लहू कानडे, आदींच्या उपस्थितीत आयोजित कार्यक्रमात मान्यवरांनी मार्गदर्शन केले.

यावेळी सहकार राज्यमंत्री डॉ. कदम यांनी खालावत चाललेल्या सहकारी संस्थांच्या अस्तित्वावर ताशेरे ओढले. जनतेचे नुकसान करणार्‍यांबाबत कठोर भूमिका घेतानाच चांगले काम करणार्‍यांच्या पाठीशी राज्य सरकार खंबीरपणे उभे राहिल, अशी ग्वाही त्यांनी दिली. यावेळी ना. तटकरे म्हणाल्या, नाविन्यपूर्ण दृष्टीकोन डोळ्यासमोर ठेवून भविष्यातील 50 वर्षांचा अभ्यास करून अनेक योजना मार्गी लावणारा युवानेता या तालुक्याला मिळाला. हे खरे तर राहुरीकरांचे भाग्य आहे. येथील विकासाचे प्रश्न मार्गी लावतानाच ना. तनपुरे यांनी आम्हालाही योेग्य मार्गदर्शन करावे. यातून राज्याचा विकास साधण्याची किमया ना. तनपुरे यांच्या प्रयत्नातून पुढे जाईल, अशी आशा त्यांनी व्यक्त केली.

एमआयडीसी व इतर आपल्याकडे असलेल्या खात्यांमधून या मतदारसंघासाठी भरीव मदत करण्याचे आश्वासन त्यांनी देऊन नगरपरिषदेच्या या मोठ्या कामाला शुभेच्छा दिल्या. यावेळी आ. रोहित पवार म्हणालेे, भाजपाच्या राज्यात तत्वतः मंजुरी शब्द अनेक योजनांना खीळ घालणारा ठरला. तुमच्या पाणीयोजनेप्रमाणेच माझ्या मतदारसंघातील पाणीयोजना याच तत्वतः मंजुरीत अडकल्या होत्या. ना. तनपुरे व मी स्वतः महाविकास आघाडीचे शासन आल्यावर या योजना सर्व तांत्रिक व इतर मंजुरी घेऊन निधीसह मार्गी लावल्या. करोनाकाळात सर्वसामान्य जनतेच्या मदतीला न येता घरात बसणारे भाजपावाले निवडणुका जवळ येताच बाहेर येतील. याचा विचार आता करावा लागेल. सहकारी संस्था मोडीत काढणार्‍या भाजपा पुढार्‍यांनी खोट्या पत्रांच्या, उद्घाटनांच्या कामांचे नारळ फोडताना नारळाचे भाव वाढले, पण कामे काही झाली नाहीत. असा टोला त्यांनी लगावून मतदारसंघातील कामे मार्गी लावण्यासाठी ना. तनपुरेंची मदत घेण्याचा मनोदय त्यांनी व्यक्त केला.

ना. तनपुरे म्हणाले, पाणी योजनेची कुदळ टाकताना आपल्या भावना उचंबळून आल्या. या योजनेसाठी नगराध्यक्ष असल्यापासून मोठे प्रयत्न केले. सन 2016 नंतर योजनेचे नवीन प्रस्ताव केले गेले. परंतु त्यास मंजुरी व प्रत्यक्ष निधी मंजुरीसाठी आपण आमदार व मंत्री झाल्यानंत्तर प्रयत्न केल्याने दि. 28 एप्रिल 2020 उजाडले. तत्वतः मंजुरीचे तत्कालीन मुख्यमंत्र्यांनी पत्र दिले. त्यावेळी काम मार्गी लागत असेल तर श्रेय कोणालाही जावे. परंतु आनंद झाला. आपण मंत्री झाल्यावर योजनेची तांत्रिक मंजुरी, प्रेझेंटेशन, राज्यपातळीवरील समितीपुढे करून ना. अजित पवार यांच्या सहकार्यातून करोना काळातही निधी मिळाला.

मात्र, अजूनही खोटे बोल पण रेटून बोल, म्हणून फसवणूक करणारे निष्क्रिय मीच मंजुरी दिली, अशा वल्गना करतात. शहरातील बसस्थानक, भुयारी गटार, स्विमींग पूल, बॅडमिंटन हॉल, जॉगिंग ट्रॅक आदी कामे लवकरच पूर्णत्वास जातील, असा विश्वास ना. तनपुरे यांनी व्यक्त केला. राज्य व केंद्र शासनाच्या मिळून योजना असतात. आम्ही मार्गी लावण्यासाठी सतत प्रयत्न करतो. म्हणून कामांची उद्घाटने करतो. खासदारांनीही इतरांवर टीका करण्यापेक्षा निधी उपलब्ध करून उद्घाटने करावीत, असा सल्ला त्यांनी दिला. आम्ही बँकेत संचालक तसेच राज्यात सत्तेवर असून कधीही असहकार न करता मदतच केली. त्यामुळे मुदतवाढीची अपेक्षा न ठेवता प्रामाणिकपणे कारखाना सुरू करून सुस्थितीत आणण्यासाठी प्रयत्त्न केल्यास राज्य सरकार सहकार्य करेल, अशी ग्वाही त्यांनी दिली.

प्रास्तविक नगराध्यक्ष अनिल कासार यांनी केले. सूत्रसंचालन सौ. शुभा कुलकर्णी यांनी केले. सर्व मान्यवरांच्या हस्ते योजनेचे भूमिपूजन व कोनशिलेचे अनावरण करण्यात आले.

यावेळी डॉ. उषाताई तनपुरे, प्रेरणा मल्टीस्टेटचे सुरेशराव वाबळे, डॉ. जयंत कुलकर्णी, उपनगराध्यक्षा नंदाताई उंडे, नंदाताई गाडे, धनराज गाडे, इंद्रभान थोरात, बाळासाहेब साळुंके, बाळासाहेब जगताप, ज्ञानदेव वाफारे, शब्बीर देशमुख, अनिता पोपळघट, ज्योती तनपुरे, संगीता आहेर, राधा साळवे, राखी तनपुरे, नंदकुमार तनपुरे, दिलीप चौधरी, सुमती सातभाई, सूर्यकांत भुजाडी, प्रकाश भुजाडी, मुक्ताबाई करपे, डॉ. मयुर चुत्तर, नितीन तनपुरे, सोनाली बर्डे, मच्छिंद्र सोनवणे, विजय कातोरे, पांडू उदावंत, दिलीप जठार, धीरज पानसंबळ, विलास तनपुरे, संजय साळवे, विजय करपे, डॉ. विक्रम खुरूद, डॉ. सुहास दुधाडे, सुभाष मोरे, श्रीनिवास कुर्‍हे, राजेेंद्र पवार, ताराचंद तनपुरे, केरू पानसरे, धनंजय गाडे, नवाज देशमुख, प्रकाश देठे, किशोर जाधव, अशोक आहेर, संतोष आघाव, दशरथ पोपळघट, राजेंद्र बोरकर, अनिल पेरणे, बाबासाहेब भिटे, सोनाली तनपुरे, वृषाली तनपुरे, बाळासाहेब आढाव, राहुल म्हसे, लक्ष्मण म्हसे, दिलीप म्हसे, विजय माळवदे, आदींसह नागरिक उपस्थित होते. आभार बाळासाहेब उंडे यांनी मानले.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com