शिर्डी |शहर प्रतिनिधी| Shirdi

काही नसले तरी श्रेय घ्यायचे असते ना, बाळ कोणी जन्म देवो, ते आमचेच आहे हे म्हणण्याची जी मानसिकता आहे ती पूर्वीपासून आहे.

हा श्रेय घेण्याचा विषय नसून माझे कुटुंब माझी जबाबदारी हा स्लोगन मुख्यमंत्र्यांचा असल्याने मुंबईसारख्या दाट लोकवस्तीत करोनाचा प्रादुर्भाव आटोक्यात आणण्याचा प्रयत्न आमच्या सरकारने केला असून ज्याप्रमाणे मंदिर उघडण्याचे श्रेय घेतायेत त्याचप्रमाणे करोनाचा प्रादुर्भाव आटोक्यात आणल्याचे श्रेय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना द्यावेत असे प्रतिपादन शिवसेनेचे राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री ना. गुलाबराव पाटील यांनी शिर्डीत केले.

ना. गुलाबराव पाटील यांनी बुधवार दि. 18 रोजी शिर्डी येथे साईदरबारी हजेरी लावत साईसमाधीचे मनोभावे दर्शन घेतले. त्यानंतर त्यांनी प्रसारमाध्यमांशी बोलतांना त्यांनी सांगितले की, मी गेली 35 वर्षांपासून श्रीक्षेत्र वनी आणि शिर्डी येथे दर्शनासाठी येण्याचा प्रयत्न करतो आहे आणि ती परंपरा अखंडपणे सुरू आहे.

आठ महिन्यांपूर्वीची शिर्डी आणि आजची शिर्डी यामध्ये एकच फरक जाणवतो की, शिर्डी साईनगरीमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. आठ महिन्यापासून जी प्रतीक्षा होती ती आता संपली आहे. सरकारने राज्यातील मंदिरे खुले करण्यासाठी जरी विलंब केला असेल तरी तो आपल्या सर्वांच्या हितासाठी होता.

दरम्यान माझे कुटुंब माझी जबाबदारी या मुख्यमंत्र्यांनी केलेल्या आव्हानाला राज्यातील नागरिकांनी प्रतिसाद दिला आहे. साई संस्थान प्रशासनाने करोनाच्या पार्श्वभूमीवर मंदिरातील दर्शन व्यवस्था व यंत्रणा योग्य पद्धतीने केली असून जनतेने शिस्त पाळली तर पुढील धोका टळणार आहे. त्यामुळे शहरातील छोटे-मोठे व्यवसायिक यांचे पोटपाणी चालतील तसेच शहरातील आर्थिक उलाढाल सुरू होऊ शकेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

साईबाबांचे दर्शन घेऊन माझ्याकडील पाणीपुरवठा खात्यांच्या माध्यमातून जनतेला पुरेपूर पाणी देण्याचा प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. दरम्यान खडसे यांनी त्यांचा पक्ष वाढवावा मी माझा पक्ष वाढवेल मात्र दोघेही महाविकास आघाडीचे घटक असल्याने त्याचा विसर पडू नये, असेही त्यांनी बोलून दाखवले.