शनिशिंगणापूर येथे कोव्हिड उपचाराच्यादृष्टीने आरोग्य यंत्रणा तैनात- ना. गडाख
सार्वमत

शनिशिंगणापूर येथे कोव्हिड उपचाराच्यादृष्टीने आरोग्य यंत्रणा तैनात- ना. गडाख

नेवासा कोव्हिड केअर सेंटरला भेट; ठोस उपाययोजनेच्या अधिकार्‍यांना सूचना; नियम पालनाचे जनतेला केले आवाहन

Nilesh Jadhav

नेवासा | शहर प्रतिनिधी तालुका वार्ताहर| Newasa

तालुक्यात वाईटातील वाईट परिस्थिती उद्भवू शकते. त्यासाठी उपाययोजना करणे गरजेचे आहे. तालुक्यातील जनतेने करोना विरोधात लढा देण्यास सज्ज रहावे. पुढील उपचाराच्यादृष्टीने शनिशिंगणापूर येथे आरोग्य यंत्रणा तैनात करण्यात आली असल्याची माहिती जलसंधारण मंत्री ना. शंकरराव गडाख यांनी नेवासा येथील कोव्हिड केयर सेंटरला भेट देऊन त्यांनी अधिकार्‍यांची बैठक घेतली. ठोस उपाययोजना करण्याच्यादृष्टीने त्यांनी अधिकार्‍यांना सूचना केल्या.

तालुक्यातील जनतेने करोनाला घाबरून न जाता शासन नियमांचे पालन करून करोना विरोधात लढा देण्यासाठी सज्ज रहावे, असे आवाहन करून त्यांनी शनिशिंगणापूर येथे पुढील उपचाराच्या दृष्टीने आरोग्य यंत्रणा तैनात करण्यात आली असल्याची माहिती नामदार शंकरराव गडाख यांनी यावेळी दिली.

नेवासा तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. अभिराज सूर्यवंशी यांनी नेवासा तालुक्यातील करोनाच्या सद्य स्थितीबाबत माहिती दिली. तसेच प्रांताधिकारी श्रीनिवास अर्जुन व तहसीलदार रुपेश सुराणा यांनी ठोस उपाययोजना करण्याच्याद़ृष्टीने सूचना केल्या.

नामदार शंकरराव गडाख म्हणाले की नेवासा तालुक्यात आठ दिवसांपासून 30 ते 40 गावांत करोनाचा प्रादुर्भाव झालेला आहे नेवासा शहर, सोनई व सलाबतपूर येथे मोठ्या प्रमाणात रुग्ण सापडले आहेत. कोव्हिड सेंटरमध्ये जे बाधित रुग्ण आहेत त्यांना सामाजिक अंतर राखत आज भेटलो. त्यांच्याशी चर्चा करून मानसिकता भक्कम करण्याच्या दृष्टीने हितगूज केले.

करोना बाबत कोणीही घाबरून जाऊ नका. धाडसाने पुढे जावे लागणार आहे. आज कोव्हिड सेंटर मध्ये 79 जणांची तब्येत व्यवस्थित आहे. पुढील द़ृष्टीने 500 ते 600 बेडची व्यवस्था झाली असून शनिशिंगणापूर व वडाळा हॉस्पिटलमध्ये 100 बेडची व्यवस्था करण्यात आली आहे. .

नेवासा नगरपंचायत प्रांगणात सोमवारी लॉकडाऊन संदर्भात सोमवारी झालेल्या बैठकीबाबतही नामदार गडाख यांनी आढावा घेतला. नगरपंचायत बाबत प्रशासनाने निर्णय घ्यावा, असे त्यांनी सूचित केले. पुढील काळात प्रमाण वाढण्याची शक्यता असल्याने त्याला कंट्रोल होण्याच्या द़ृष्टीने प्रयत्न करावा तसेच तालुक्यात वाईटातील वाईट परिस्थिती उद्भवू शकते त्यादृष्टीने उपाययोजना करणे गरजेचे असल्याचे सांगितले.

बैठकीप्रसंगी प्रांताधिकारी श्रीनिवास अर्जुन, तहसीलदार रुपेश सुराणा, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. अभिराज सूर्यवंशी, उपनगराध्यक्ष नंदकुमार पाटील, सभापती रावसाहेब कांगुणे, उपसभापती किशोर जोजार, सतीश पिंपळे, गटविकास अधिकारी शेखर शेलार, मुख्याधिकारी समीर शेख, वैद्यकीय अधिकारी डॉ.रवींद्र कानडे,सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी मच्छिंद्र बनसोडे, कृषी अधिकारी दत्तात्रय डमाळे, नेवासा तालुक्यातील सर्व प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी यावेळी उपस्थित होते.

यावेळी ना. शंकरराव गडाख म्हणाले, शिंगणापूर येथे सर्व सुविधा असल्याने व नगरचे इस्पितळ भरलेले असल्याने शासन व शिंगणापूर यांच्यावतीने उपचार करणार आहे. कोव्हिडबाबत कोणीही राजकारण न करता सर्वांनी एकत्रित येऊन करोनाच्या विरोधात लढा द्यायचा आहे. मास्क घालून सोशल डिस्टन्सिंगचे पालन करणे, नियम पाळणे हाच पर्याय राहणार असल्याने त्यादृष्टीने सर्वांनी प्रयत्न करावा.

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com