धमकीची ‘ती’ ऑडिओ क्लिप पोलिसांच्या ताब्यात; तपास सुरू

धमकीची ‘ती’ ऑडिओ क्लिप पोलिसांच्या ताब्यात; तपास सुरू

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

जलसंधारणमंत्री शंकरराव गडाख व त्यांचे पुत्र उदयन गडाख यांना ‘उडविण्याची’ भाषा करणारी ऑडिओ क्लिप पोलिसांनी ताब्यात घेतली आहे. त्यासंदर्भात तक्रार दाखल नसली तरी क्लिपची शहानिशा करण्याचे काम पोलिसांकडून करण्यात येत असल्याची माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांनी दिली.

धमकीची ‘ती’ ऑडिओ क्लिप पोलिसांच्या ताब्यात; तपास सुरू
‘त्या’ ऑडिओ क्लिपप्रकरणी एसपींनी मागविला अहवाल

दरम्यान, मंत्री गडाख यांचे स्वीय सहायक राहुल राजळे यांच्यावर झालेला हल्ला आणि त्यानंतर मंत्री गडाख व त्यांचे पुत्र उदयन यांना ‘उडविण्याची’ भाषा करणारी व्हायरल झालेली ऑडिओ क्लिप यांचा काही संबंध आहे का? याचा देखील तपास पोलिसांकडून सुरू असल्याचे अधीक्षक पाटील यांनी सांगितले.

धमकीची ‘ती’ ऑडिओ क्लिप पोलिसांच्या ताब्यात; तपास सुरू
मंत्री शंकरराव गडाखांसह मुलाच्या हत्येचं कारस्थान?

मंत्री गडाख यांचे स्वीय सहायक राजळे यांच्यावर तालुक्यातील लोहगाव शिवारात शुक्रवारी रात्री जीवघेणा हल्ला झाला होता. याप्रकरणी दोन आरोपींना अटक करण्यात आली आहे. हल्ला झाल्यानंतर दोन दिवसांनी एक ऑडिओ क्लिप व्हायरल झाली आहे. क्लिपमध्ये मंत्री गडाख आणि त्यांचे पुत्र उदयन यांना जीवे मारण्याविषयी उल्लेख आहे. यासाठी 21 इस्त्रायली बनावटीच्या गन (पिस्तुल) आणल्याचा दावा करण्यात आला आहे. पोलिसांनी हे प्रकरण गांभीर्याने घेतले आहे.

यासंदर्भात जिल्हा पोलीस अधीक्षक पाटील यांना विचारले असता ते म्हणाले, मंत्री गडाख यांच्याशी संबंधित ऑडिओ क्लिप पोलिसांना मिळाली आहे. तपासी अधिकार्‍यांनी ती ताब्यात घेतली आहे. क्लिपमधील बोलणार्‍या व्यक्ती कोण? याचा तपास करून यासंदर्भात योग्य ती शहानिशा निश्चित केली जाईल. राजळे यांच्यावर झालेला गोळीबार आणि त्यानंतर व्हायरल झालेली क्लिप याचा अजून काही संबंध दिसून येत नाही.

पण पोलिसांकडून त्याचा तपास करण्यात येत आहे. जे काही सत्य आहे ते तपासातून बाहेर येईल. क्लिप संदर्भात तक्रार आलेली नसली तरी त्या प्रकरणाचा जो काही तपास आहे, तो पोलिसांकडून पूर्ण केला जाईल. त्यातील सत्य-असत्य तपासाअंती बाहेर येईल, असे अधीक्षक पाटील यांनी सांगितले. राजळे यांच्यावर जीवघेणा गोळीबार झाल्यानंतर आता ही क्लिप समोर आल्याने प्रकरणाचे गांभिर्य वाढले आहे. एकीकडे राजळे यांच्यावरील गोळीबार प्रकरणाचा तपास सुरू असून दुसरीकडे आता मंत्री गडाख व पुत्र उदयन यांच्या धमकीप्रकरणी व्हायरल झालेल्या क्लिपचाही पोलिसांनी तपास सुरू केला आहे.

Related Stories

No stories found.