नेवासा |प्रतिनिधी| Newasa

मंत्री जेवण करणार म्हणून बंद खोलीत मोठा फौजफाटा लावून जेवणाची ‘शाही थाळी’ तयार होती.

परंतु नामदार शंकरराव गडाख यांनी या शाही जेवणाला टाळत सामान्य जनतेबरोबर जमिनीवर मांडी घालत पंगतीत जेवण करत आपल्या साधेपणातून मने जिंकली.

नेवासा तालुक्यातील गिडेगाव येथे ज्येष्ठ नेते यशवंतराव गडाख, माजी आमदार नरेंद्र घुले, पांडुरंग अभंग व जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख यांच्या उपस्थितीत जिल्हा बँकेच्या नूतन संचालकांचा सत्कार सोहळा होता.

शंकरराव गडाख यांनी नेवासा विधानसभा निवडणूक अपक्ष लढवत मोठ्या मताधिक्याने विजय मिळवत दुसर्याच दिवशी मातोश्रीवर जाऊन शिवसेनेला पाठिंब्याचे पत्र दिले. मातोश्रीवर गडाखांनी विश्वास दाखविला व नंतर उद्धव ठाकरे यांनी गडाखांना कॅबिनेट मंत्रिपद दिले. मंत्रिपद मिळवूनही गडाख यांनी कुठलाही बडेजाव न ठेवता साधेपणा जपला.

मंत्री झाल्यावर मला नामदार म्हणू नका आमदार म्हणा, असे शंकरराव गडाख अनेकदा जाहीर कार्यक्रमात सांगत असतात. पद येतात जातात पण सामान्य जनतेच्या कामात झोकून देण्याला प्राधान्य द्या, असाही कानमंत्र शंकरराव यांनी कार्यकर्त्यांना दिला आहे.