निवडणुकीतील कटूता विसरुन नवनिर्वाचित सदस्यांनी संधीचे सोने करावे

मुळा कारखान्यावरील आभार मेळाव्यात ना. गडाख यांचे आवाहन
निवडणुकीतील कटूता विसरुन नवनिर्वाचित सदस्यांनी संधीचे सोने करावे

सोनई |वार्ताहर| Sonai

नेवासा तालुक्यात काही ठिकाणी ग्रामपंचायतीच्या निवडणूका चुरशीच्या होत असतानाही मुळा कारखान्याच्या सभासदांनी व उमेदवारी अर्ज भरलेल्या उमेदवारांनी मुळा कारखान्याची निवडणूक बिनविरोध केली.

संस्थेच्या आणि सभासदांच्या हिताचा विचार करुन त्यांनी हा सुज्ञ निर्णय घेतला, स्थानिक पातळीवर ग्रामपंचायतींच्या निवडणुकातून येणारी कटूता विसरुन सर्वांनी कामाला लागावे व नवनिर्वाचीत सदस्यांनी या संधीचे सोनं करावे असे आवाहन मृद व जल संधारण खात्याचे मंत्री शंकरराव गडाख यांनी केले.

मुळा कारखाना निवडणूक बिनविरोध झाल्याबद्दल सोनईला आयोजित आभार मेळाव्यात ते बोलत होते. मेळाव्यासाठी तालुक्यातून आलेले सभासद, ऊस उत्पादक शेतकरी व परिसरातील ग्रामपंचायत सदस्य, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. अध्यक्षस्थानी ज्येष्ठ नेते यशवंतराव गडाख होते.

माजी सभापती कारभारी जावळे, विद्यमान सभापती रावसाहेब कांगुणे, अ‍ॅड.अण्णासाहेब अंबाडे यांनी मनोगत व्यक्त केले.

ना. गडाख म्हणाले की, कारखान्याच्या निवडणूकीत अनेक तोलामोलाचे उमेदवार होते. पण मी सर्वांशी बोललो. सर्वांना विश्वासात घेऊनच निर्णय घेतला. सर्वांनीच मनाचा मोठेपणा दाखवला आणि मोठ्या मनाने बिनविरोध केली. आत्तापर्यंत ज्या पध्दतीने कारखान्याच्या आणि सभासदांच्या हिताचा कारभार केला त्याच पध्दतीने पुढच्या काळातही कारभार केला जाईल. ग्रामपंचायतीच्याही निवडणूका होत्या.

काही बिनविरोध झाल्या. काही चुरशीच्या झाल्या. पण त्यातून येणारी कटूता विसरुन आता सर्वांनी कामाला लागले पाहिजे. जे नवनिर्वाचीत सदस्य आहेत त्यांनी सर्वाना बरोबर घेऊन संधीचे सोने केले पाहीजे. चालू वर्षी 14 लाख टन ऊस आहे पण ऑफसिझानमध्ये आपण मशिनरीचे व्यवस्थीत नियोजन केल्यामुळे गळीताचा रेट वाढला आहे. रोज साडेसात ते आठहजार टन गाळप होत आहे. आत्तापर्यंत 6 लाख 20 हजार गाळप झाले आहे असे सांगुन गाळपाविना कोणाचाही ऊस शेतात उभा राहणार नाही अशी ग्वाही दिली.

पुढच्यावर्षी सुध्दा यापेक्षा जादा ऊस राहील. उशीरा गाळपामुळे शेतकर्‍यांचे नुकसान होऊ नये म्हणून आपण काही मशिनरी बसवून गाळपाचा रेट आणखी वाढवणार आहोत. केंद्र सरकारच्या योजना व निर्णय राबवण्यात आपण आघाडीवर असतो. इथेनॉलच्या प्रकल्पाला आपण मंजुरी मिळवीली. जुनी डिस्टीलरी आहे पण ती पावसाळ्यात बंद ठेवावी लागते.

आता इथेनॉलचा जो नवीन प्रकल्प उभारत आहोत त्यामध्ये स्पेंटवॉश घट्ट करुन तो बॉयलरला जाळता येईल अशी यंत्रणा आपण उभारत आहोत. त्यामुळे हा नविन प्रकल्प वर्षभर चालवता येईल. अशा प्रकारचा जिल्ह्यातला हा पहिलाच प्रकल्प असल्याचे त्यांनी सांगितले.

सहकारी तत्वावर सुतगिरणीचा प्रकल्प उभारणीसाठी आपण प्रयत्नशील असून कृषी उत्पन्न बाजार समितीच्या नेवासा, कुकाणा आणि घोडेगांव या ठिकाणी मिळून 200 ते 250 गाळ्यांचे शॉपिंग सेंटर बांधले जाणार आहे. वर्षभरात हे काम झाल्यानंतर तालुक्यातील गरजू सुसुक्षित बेरोजगारांना हे गाळे व्यवसायासाठी उपलब्ध करुन दिले जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.

कार्यक्रमात मुळा कारखान्याच्या नवनिर्वाचीत संचालकांबरोबरच शनैश्वर देवस्थानवर निवड झालेल्या विश्वस्तांचाही सन्मान माजी खासदार यशवंतराव गडाख यांच्या हस्ते करण्यात आला.

देवस्थानच्या बाबतीत बोलताना आमदार गडाख म्हणाले की पाच वर्षांपूर्वी विश्वस्त मंडळाची नेमणूक झाली ती विरोधकांच्या फार जिव्हारी लागली. देवस्थान गावच्या ताब्यातून काढून सरकारच्या ताब्यात देण्याचा घाट घातला. त्यासाठी विधानसभेत कायदा पास केला. राजकारणात संधी येत असते पण तिचा उपयोग विधायक कामासाठी केला पाहिजे याचं भान ठेवलं पाहिजे.

उद्धवजी ठाकरे मुख्यमंत्री झाल्यावर मी त्यांना भेटलो. गावची परंपरा संस्कृती आणि त्यातून बनवण्यात आलेली घटना त्यांना समजावून सांगितली. आणि त्यानंतर पूर्वीच्या घटनेचा मान राखत गावची परंपरा कायम ठेवण्या चा निर्णय घेतला. त्यामुळे जुन्या घटनेनुसार विश्वस्त मंडळ नेमण्याचा मार्ग मोकळा झाला. आता तर शिंगणापूरची ग्रामपंचायत सुद्धा बिनविरोध झाली आहे. सर्व गाव एक झाले आहे. देवस्थानच्या आणि गावच्या विकासाला निश्चितच गती मिळणार असल्याचे त्यांनी सांगितले.

माजी खासदार यशवंतरावजी गडाख यांचेही भाषण झाले. ते म्हणाले, मुळा आणि ज्ञानेश्वर दोन्ही कारखान्यांचा कारभार चांगला आहे. त्यांच्या निवडणुका बिनविरोध झाल्या आहेत. मुळा कारखान्याचे सर्व प्रकल्प चांगले चालू आहेत. तालुक्याला मंत्रीपद मिळाले आहे. अनेक वर्षानंतर चांगली संधी मिळाली आहे. त्याचा उपयोग आपल्या तालुक्याच्या विकासाला निश्चितपणे होईल.

मुख्यमंत्री ठाकरे यांना बोलवा

शंकरराव तुमचे व मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांचे खूप चांगले संबंध आहे त्यांना लवकरात लवकर शनी शिंगणापूरला बोलवा व पानसनाला सुशोभीकरण घाट प्रकल्पाचा शुभारंभ मुख्यमंत्र्यांच्या हस्ते करा असे ज्येष्ठ नेते यशवंतराव गडाख यांनी मंत्री शंकरराव गडाख यांना जाहीर भाषणात सांगितले.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com