ग्रामीण अर्थव्यवस्था समृद्ध करणारी सहकार व्यवस्था जपलीच पाहिजे - ना. थोरात

ग्रामीण अर्थव्यवस्था समृद्ध करणारी सहकार व्यवस्था जपलीच पाहिजे - ना. थोरात

संगमनेर |प्रतिनिधी| Sangamner

अहमदनगर जिल्हा हा सहकाराचा जिल्हा म्हणून ओळखला जातो. या जिल्ह्याच्या विकासात जिल्हा बँकेचे मोठे योगदान असून यावेळची निवडणूक पक्ष विरहित सर्वांना बरोबर घेत बिनविरोध केली. सहकार चळवळ ही आपल्या सर्वांच्या प्रगतीसाठीची व्यवस्था आहे. ती सर्वांनी निकोपपणे जपली पाहिजे आणि टिकविली पाहिजे, असे आवाहन काँग्रेस विधिमंडळ पक्षाचे गटनेते व राज्याचे महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी केले आहे.

अहमदनगर जिल्हा बँकेच्या संगमनेर शाखेतील सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात सभागृहात तालुक्यातील 100 टक्के वसुली देणार्‍या 16 सेवा सोसायट्यांचा व 35 शाखांचा गौरव करण्यात आला. यावेळी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी बँकेचे उपाध्यक्ष अ‍ॅड. माधवराव कानवडे हे होते तर व्यासपीठावर आमदार डॉ. सुधीर तांबे, ज्येष्ठ नेते बाजीराव पा. खेमनर, बँकेचे संचालक गणपतराव सांगळे, प्रशांत गायकवाड, माजी उपाध्यक्ष रामदास पा. वाघ, आर. बी. रहाणे, रामहरी कातोरे, लक्ष्मणराव कुटे, अजय फटांगरे, युवक काँग्रेसचे कार्याध्यक्ष सुभाष सांगळे, बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रावसाहेब वर्पे, तालुका विकास अधिकारी अशोक थोरात, उपनिबंधक गणेश पुरी निकम आदी उपस्थित होते.

याप्रसंगी सन 2020-2021 या सालामध्ये शंभर टक्के वसुली देणार्‍या जोर्वे, देवकौठे, वरझडी, निंबाळे, घुलेवाडी, कुंभारवाडी, शिरसगाव धुपे, सांगवी, आनंदवाडी, वरुडी पठार, कौटेवाडी, म्हसवंडी, आंबी दुमाला, बोटा, चिखली, निमगाव भोजापूर या 16 सोसायट्यांच्या पदाधिकार्‍यांचा ना. थोरात यांनी सन्मान केला तर 100% वसुली असणार्‍या बँकेच्या 35 शाखा अधिकारी यांचाही सन्मान करण्यात आला.

नामदार थोरात म्हणाले, स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांनी ग्रामीण अर्थव्यवस्था मजबूत करण्यासाठी महाराष्ट्रात सहकार चळवळ रुजवली. अहमदनगर जिल्ह्यातील जुन्या पिढीतील नेत्यांनी ही चळवळ जीवापाड जपताना या जिल्ह्याचा विकास साधला. जिल्हा सहकारी बँक ही जिल्ह्याची आर्थिक कामधेनू आहे. शासन आणि सहकार या दोन्हींचाही माध्यमातून जिल्ह्याची आज मोठी प्रगती झाली आहे. सहकार ही व्यवस्था आपल्या सर्वांच्या प्रगतीसाठी आहे. ती टिकवली पाहिजे आणि निकोप पद्धतीने जपली पाहिजे. बँकेत कधीही राजकारण नको आहे म्हणून आपण पक्षविरहित सर्वांना बरोबर घेत या वेळची निवडणूक बिनविरोध केली. बँकेने आपला लौकिक कायम जपला असून यापुढेही शेतकर्‍यांच्या विकासात महत्त्वपूर्ण योगदान द्या.

महाविकास आघाडी सरकारने सहज व सोप्या पद्धतीने दोन लाखापर्यंत ची कर्जमाफी केली यातून जिल्हा बँकेला चौदाशे कोटींची कर्जमाफी मिळाली. करोना संकट आले. अन्यथा दोन लाखाच्या पुढची ही माफी देता आली असती. परंतु ती नक्की दिली जाणार आहे. सध्या सर्वत्र करोनाचा काळ आहे. आगामी दोन महिने अत्यंत काळजीचे आहे. संगमनेर मध्ये करोना संपलेला नाही. त्यामुळे प्रत्येकाने काळजी घ्या. करोना हा कुणालाही होऊ शकतो. कोणीही भ्रमात राहू नका. काळजी घेणे अत्यंत गरजेचे असल्याचे सांगून जिल्हा बँकेच्या चांगल्या कामाबद्दल नामदार थोरात यांनी समाधान व्यक्त केले.

आमदार डॉ. तांबे म्हणाले, संगमनेरचा सहकार हा राज्याला नव्हे तर देशाला दिशादर्शक ठरत आहे. राज्यातील सहकाराचे नेतृत्व करण्याचे काम संगमनेर करत आहे. जिल्हा बँकेने शेतकर्‍यांच्या जीवनात मोठा आनंद निर्माण केला आहे. जुन्या पिढीतील जाणकारांनी तळमळीने सहकार चळवळ वाढवली आताही आपण सर्वांनी जपली पाहिजे असे ते म्हणाले.

बँकेचे उपाध्यक्ष अ‍ॅड. माधवराव कानवडे म्हणाले, यावर्षी एकाही सोसायटीमध्ये अनिष्ट तफावत राहिलेली नाही. सध्या बँकेत अत्यंत चांगले वातावरण असून कर्मचार्‍यांसाठी व सेवा सोसायट्यांच्या सचिवांसाठी तीन लाखापर्यंत मेडिक्लेम बँकेने उतरवला आहे. यामुळे त्यांच्या कुटुंबीयांनाही आजारपणाची संरक्षण मिळणार आहे. संगमनेर तालुक्याचे यावर्षी 99.55 % वसुली केली असून 38 शाखांपैकी 35 टक्के शाखा वसुली मध्ये शंभर टक्के राहिले आहेत.

याप्रसंगी बँकेचे संचालक गणपतराव सांगळे, प्रशांत गायकवाड यांनीही मनोगत व्यक्त केली. कार्यक्रमासाठी संभाजी वाकचौरे, अ‍ॅड. लक्ष्मण खेमनर, गबाजी खेमनर, कचरू वारुंसे, संदिप नागरे, प्रकाश कडलग, किसन सुपेकर, चांगदेव ढेपे, राजेंद्र कहांडळ आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे स्वागत तालुका विकास अधिकारी अशोक थोरात यांनी केले. प्रास्ताविक मुख्य कार्यकारी अधिकारी रावसाहेब वर्पे यांनी केले. सूत्रसंचालन नामदेव कहांडळ यांनी केले तर आभार वसुली अधिकारी उल्हास शिंदे यांनी मानले.

संगमनेर तालुका वसुलीमध्ये प्रथम

महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली संगमनेर तालुक्याने कायम कर्ज भरण्याची परंपरा जपली असून याहीवर्षी 99.55 टक्के वसुली देत अहमदनगर जिल्ह्यात प्रथम क्रमांक राखला आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com