राजहंस दूध संघाकडून यावर्षीची दिवाळी गोड होणार - ना. थोरात

राजहंस दूध संघाकडून यावर्षीची दिवाळी गोड होणार - ना. थोरात

संगमनेर |प्रतिनिधी| Sangamner

करोना संकटात दूध उत्पादकांना मदत करण्याऐवजी खाजगी वाले त्यावेळेस गप्प होते. दूध विक्री बंद असताना त्यांनी दूध उत्पादकांना वार्‍यावर सोडले. अशावेळी राजहंस दूध संघ या उत्पादकांच्या पाठीशी खंबीर उभा राहिला. या सहकारी संस्था गोरगरिबांच्या जीवनाशी निगडित आहेत. आपला हेतू प्रामाणिक असून निष्ठेने होत असलेल्या कामामुळे संगमनेरच्या संस्था अग्रगण्य असून राजहंस दूध संघाकडून या वर्षीची दिवाळी सर्वांसाठी गोड होणार असल्याचे प्रतिपादन राज्याचे महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी केले आहे.

संगमनेर तालुका सहकारी दूध उत्पादक संघाच्या 44 व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत ते बोलत होते. यावेळी अध्यक्षस्थानी दूध संघाचे चेअरमन व महानंदाचे अध्यक्ष रणजितसिंह देशमुख होते तर व्यासपीठावर आमदार डॉ. सुधीर तांबे, बाजीराव पा. खेमनर, अ‍ॅड. माधवराव कानवडे, इंद्रजीत थोरात, बाबासाहेब ओहोळ, शंकरराव खेमनर, लक्ष्मणराव कुटे, आर. बी. राहणे, उपाध्यक्ष साहेबराव गडाख, संचालक मोहनराव करंजकर, सुभाष पा. आहेर, भास्करराव सिनारे, विलासराव वर्पे, गंगाधर चव्हाण, अ‍ॅड. बाबासाहेब गायकर, विलास कवडे, संतोष मांडेकर, पांडुरंग सागर, माणिक यादव, राजेंद्र चकोर, सौ. प्रतिभाताई जोंधळे, सौ. ताराबाई धुळगंड, कार्यकारी संचालक डॉ. प्रतापराव उबाळे आदी उपस्थित होते.

याप्रसंगी नामदार थोरात म्हणाले, आपला हेतू प्रामाणिक असून निष्ठेने व काळजीपूर्वक होत असलेल्या कामामुळे संगमनेरच्या सहकारी संस्था अग्रगण्य आहे. या सहकारी संस्थांचा संबंध थेट गोरगरीब माणसाच्या जीवनाशी निगडित आहेत. या संस्था आपण निष्ठापूर्वक जपल्या पाहिजे. दूध संघाने कायम अडचणीच्या काळात उत्पादकांना मदत केली आहे. दूध व्यवसाय हा संगमनेर तालुक्याच्या ग्रामीण अर्थव्यवस्थेचा कणा ठरला आहे. करोना संकटामध्ये दूध विक्री बंद होती अशा काळात महाविकास आघाडी सरकारने धाडसी निर्णय घेत दहा लाख लिटर दुधाची भुकटी करण्याचा निर्णय घेतला. यातून उत्पादकांना मोठा दिलासा मिळाला.

राजहंस दूध संघाने या काळात 1800 मेट्रिक टनाची दूध पावडर बनवली होती. परंतु दूध पावडरचे दर हे नियमित नाहीत. दूध व पावडर हे नाशवंत आहेत. त्यामुळे याबाबत अत्यंत काळजीपूर्वक निर्णय घ्यावे लागतात. अत्यंत काटकसरीतून हा दूध संघ शेतकर्‍यांच्या पाठिशी उभा राहिला आहे. अडचणीमध्ये सहकारी संस्था साथ देतात. मात्र अशा काळात खाजगीवाले पळ काढतात. आपण नेहमी आपल्या संस्थांशी प्रामाणिक राहत या संस्थांची निष्ठापूर्वक वागले पाहिजे. दूध संघाची आर्थिक स्थिती मजबूत असून दूध संघाकडून दिवाळीच्या काळामध्ये रिबीट जाहीर केले जाणार आहे. यावेळची दिवाळी सर्व दूध उत्पादक व कामगार यांच्यासाठी गोड होणार असल्याचे ते म्हणाले.

आमदार डॉ. तांबे म्हणाले की, दूध व्यवसाय हा तालुक्याचा आर्थिक कणा असून नामदार बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखाली संगमनेरच्या सहकारी संस्था अत्यंत चांगल्या पद्धतीने काम करत आहेत. गावोगावी सहकारी संस्थांचे जाळे उभे राहिले असून या आपण सर्वांनी जपल्या पाहिजेत. महाविकास आघाडी सरकारने शेतकर्‍यांसाठी, गोरगरिबांसाठी अत्यंत धोरणात्मक चांगले निर्णय घेत असून या सरकारच्या निर्णयामुळे एक दिवसही दूध बंदी झाली नाही हा मोठा लाभ शेतकर्‍यांना झाला आहे.

रणजितसिंह देशमुख म्हणाले, करोना काळामध्ये दुग्ध विक्री बंद होती. उपपदार्थांची विक्रीची कमी झाली होती. अशा काळात दुधाचे उत्पादन जास्त असताना राजहंस दूध संघाने पावडर प्लांटचा धोरणात्मक निर्णय घेतला. राजहंस संघाने 1800 मेट्रिक टनाची पावडर केली असून याकामी महा विकास आघाडी सरकारने मोठी मदत केली. महानंदाच्या माध्यमातून दूध संघांसाठी पावडर करण्याचा निर्णय अत्यंत दूरदृष्टीचा ठरला अशा अडचणीच्या काळामध्ये खाजगी वाले कोणतेही दूध घेत नव्हते. आता संकट संपले आहे तर एक रुपया वाढून देऊन ते दुधाची पळवापळवी करत आहेत. हे अत्यंत चुकीचे आहे.

शेतकर्‍यांच्या संस्था शेतकर्‍यांनीच जपल्या पाहिजेत. उत्पादकांनी खाजगी दूध संघांच्या थोड्या आमिषाला बळी न पडता कायम सहकारी संघाच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिले पाहिजे. दूध संघाने सातत्याने नवनवीन उपक्रम राबवले असून शेतकर्‍यांना मुरघास करता 110 मेट्रिक टनाची आफ्रिकन मकाचे मोफत वाटप केले आहे. तर सोर्टेड सीमेन मुळे 95 टक्के गाई जन्माची शक्यता आहे. सातत्याने दूध उत्पादकांना दिलासा देत जनावरांसाठी औषधे व विविध योजना राबवल्या आहेत. आपणही या पुढील काळात गावोगावच्या संस्था अधिक सक्षम करण्यासाठी गावातील नेतृत्वाने काम करावे असे आवाहन त्यांनी केले.

यावेळी पंडित शिंदे, सुधाकर ताजणे, संतोष वाळके यांनी ऑनलाईन पद्धतीने सहभाग घेतला. या कार्यक्रमासाठी कारखान्याचे उपाध्यक्ष संतोष हासे, सुभाष सांगळे, भारत मुंगसे, रामहरी कातोरे, अ‍ॅड. सुहास आहेर, विष्णूपंत रहाटळ, राजेंद्र गुंजाळ, राजेंद्र कडलग, थोरात कारखान्याचे कार्यकारी संचालक जगन्नाथ घुगरकर, दूध संघाचे फायनान्स मॅनेजर जी. एस. शिंदे, रोहिदास पवार आदी उपस्थित होते.

कार्यक्रमाचे नोटीस वाचन कार्यकारी संचालक डॉ. प्रताप उबाळे यांनी केले. सूत्रसंचालन अ‍ॅड. सुरेश जोंधळे व नामदेव कहांडळ यांनी केले तर दूध संघाचे उपाध्यक्ष साहेबराव गडाख यांनी आभार मानले.

करोना रुग्ण वाढ चिंताजनक

करोना अद्याप संपलेला नाही. तिसरी लाट येण्याची शक्यता आहे. संगमनेर तालुक्यातील वाढती करोना रुग्णवाढ चिंताजनक आहे. म्हणून प्रत्येकाने कोणताही निष्काळजीपणा करू नये. संगमनेर तालुक्यात सर्वाधिक चाचण्या होत असून बाधित व्यक्तींचे विलगीकरण करण्यात येत आहे. तरीही करोनापासून सर्वांनी काळजी घ्यावी असे आवाहन नामदार बाळासाहेब थोरात यांनी केले आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com