जिल्ह्यातील प्रत्येकाचा राजकीय पाया काँग्रेसच !

मंत्री बाळासाहेब थोरात || जाती, धर्माच्या नावावर राजकारण करणार्‍या भाजपवर टीका
जिल्ह्यातील प्रत्येकाचा राजकीय पाया काँग्रेसच !

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

जिल्ह्याचा पूर्वीचा कालखंड हा काँग्रेसचा होता. आता कोणी कोठेही असले तरी जिल्ह्यातील प्रत्येकाच्या राजकीय जीवनात जे काही मिळालेले आहे, त्याचा पाया काँग्रेसच आहे. देशाचे प्रतिबिंब जिल्ह्यात दिसत असून आज काँग्रेस पक्ष अडचणीत नसून पक्षाची विचारधारा अडचणीत आहे. सध्या सर्वात सोपे राजकारण हे धर्म आणि जातीच्या माध्यमातून करता येत असल्याची टीका राज्याचे महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी अप्रत्यक्षपणे भाजपवर केली.

नगरमध्ये पक्षाच्या विस्तार कार्यकारिणी बैठकीत मंत्री थोरात बोलत होते. यावेळी आ. सुधीर तांबे, आ. लहू कानडे, जिल्हाध्यक्ष बाळासाहेब सांळुके, राजेंद्र नागवडे, करण ससाणे, उत्कर्षा रुपवते, बाबासाहेब दिघे, सचिन गुजर, बाळासाहेब सरोदे, विनायक देशमुख, ज्ञानदेव वाफारे, लता डांगे यांच्यासह मोठ्या संख्येने नेते आणि कार्यकर्ते उपस्थित होते.

महसूल मंत्री म्हणाले, आता तालुका, जिल्हा, राज्य आणि देशपातळीवरील निवडणुकांची प्रक्रिया सुरू होणार आहे. मागील तीन वर्षांत जिल्हाध्यक्ष आणि तालुकाध्यक्षांनी चांगली कामगिरी केलेली आहे. जिल्हाचा पूर्वीचा कालखंड हा काँग्रेसचा बालेकिल्ला असून जिल्ह्यातील राजकीय व्यक्ती आता कोठेही असले तरी त्यांचा पाया हा काँग्रेसच आहे. आज गावातील शाळेची खोली पडलेली असते, पण मंदिर मोठे असते. यातून जाती आणि धर्माच्या नावावर सोप्या पध्दतीने राजकारण करता येत हे दिसते. हे म्हणजे देशाच्या अखंडतेवर आणि विचारांवर हल्ला आहे. याची सुरूवात राम मंदिरासाठी विटा जमा करण्यापासून सुरू झाली होती. तेंव्हापासून हे सर्व सुरू आहे. तर दुसरीकडे आपण ज्या संघटनेच्या जीवावर मंत्री झालो त्याच संघटनेकडे दुर्लक्ष केल्याने ही वेळ आली आहे. यामुळे आता संघटना बळकटीकरणासोबतच विचारांचे राजकरण करा, असा सल्ला मंत्री थोरात यांनी कार्यकर्त्यांना दिला.

आ. तांबे यांनी पक्षाचा नव संकल्प समजून घेऊन त्यानुसार कृती करा, विचाराने निर्णय घेणारे कार्यकर्ते सोबत ठेवा. पक्षाचे संघटन बळकट होणे आवश्यक आहे. आज आपण रोज देशाची लोकशाही खिळखिळी होताना पाहत आहोत. आता थकलेल्यांना विश्रांती देण्याची वेळ आली असून तरूणांना संधी मिळणे आवश्यक आहे. महागाई विरोधात दररोज आंदोलने करा. सामान्य माणसाला जागे करण्याचे काम करा, असा मंत्र कार्यकर्त्यांना दिला. तीन वर्षांत महसूल मंत्री यांच्या नेतृत्वाखाली पक्ष संघटना बळकट करण्याचे काम झाले. महाविकास आघाडीतील सत्तेमुळे विकास कामांसाठी निधी मिळत असल्याचे आ. लहू कानडे यांनी सांगितले. यावेळी जिल्हाध्यक्ष सांळुके, देशमुख आणि वाफारे यांचे मनोगत झाले. मंत्री थोरात यांच्या हस्ते जिल्हाध्यक्ष सांळुके, तालुकाध्यक्ष दीपक भोसले, शहाजीराजे भोसले, दादा पाटील वाकचौरे, अरूण नाईक, किरण पाटील, संपत म्हस्के, संभाजी रोहकले, डॉ. खडके, संभाजी माळवदे, संजय छल्लारी, नासिर शेख यांचा सन्मान झाला.

जिल्ह्यात पदयात्रा

उदयपूर येथील पक्षाच्या संकल्प शिबिरात 50 वर्षे वय असणार्‍या कार्यकर्त्यांची 50 टक्के पदे ही तरूणांना देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तसेच पाच वर्षांपेक्षा जास्त कोणालाच एका पदावर राहाता येणार नाही. काम करणार्‍यांना संधी देण्यात येणार असून ऑगस्ट महिन्यांत जिल्ह्यात 75 किलोमीटरची पदयात्रा काढण्यात येणार आहे. याच दरम्यान जिल्हा शिबिराचे आयोजन करण्यात येणार असून महसूल मंत्री यांच्या नेतृत्वात चार दिवसीय जिल्हा दौरा काढण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली.

तालुकानिहाय आढावा

कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केल्यानंतर मंत्री थोरात यांनी तालुकानिहाय आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर आढावा घेतला. यावेळी आ. तांबे आणि आ. कानडे त्यांच्यासोबत होते. जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि नगरपालिका निवडणुकांमध्ये काय स्थिती राहिल, याबाबत मंत्री थोरात यांनी तालुका पातळीवरील नेते आणि कार्यकर्त्यांकडून जाणून घेतले. लालटाकी येथील पक्ष कार्यालयात कार्यकर्त्यांनी मोठी गर्दी केली होती.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com