श्रीरामपुरात सर्वात्त चांगले कोविड सेंटर व ऑक्सीजन प्लांटची उभारणी - ना. थोरात

सप्टेंबरमध्ये नवीन सातबारा प्रत्येकाच्या घरात मोफत पोहोच करणार
श्रीरामपुरात सर्वात्त चांगले कोविड सेंटर व ऑक्सीजन प्लांटची उभारणी - ना. थोरात

श्रीरामपूर |प्रतिनिधी| Shrirampur

करोनाच्या संकटामुळे आपली आर्थिक घट होऊन आपले संपूर्ण जीवनच विस्कळीत झाले आहे. पहिल्या लाटेत जो त्रास झाला त्यात आपली जवळची माणसे गेली. दुसरी लाटही भयानक होती. त्यात मात्र ऑक्सीजनची कमी होती. पारदर्शकपणे महाराष्ट्राने ही परिस्थिती हाताळली. आजही करोना संपलेला नसून अद्यापही करोनाचे संकट आपल्यावर आहे. तिसर्‍या लाटेची काळजी घ्यायची आहे. त्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात पालकमंत्र्यांसह आम्ही निर्णय घेतले असून त्यानुसार ऑक्सीजन प्लँट उभारून कोविड सेंटर उभारण्याचा निर्णय घेतला आणि जिल्ह्यात सर्वात चांगले कोविड सेंटर श्रीरामपूरचे असल्याचे प्रतिपादन महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी केले. सप्टेंबर महिन्यात तुमच्या शेतकर्‍यांचे सातबारा उतारे हे त्यांच्या घरात त्यांच्या खिशात मोफत पोहोच करणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

महाराष्ट्र शासन सर्वसाधारण जिल्हा वार्षिक योजना 2021-22 अंतर्गत आणि आ. लहू कानडे यांच्या स्थानिक विकास निधीनतून ऑक्सीजन जनररेशन प्लँट व विस्तारीत कोविड सेंटरचा उद्घाटन समारंभ महूसलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्याहस्ते झाले. यावेळी पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी ऑनलाईन शुभेच्छा दिल्या. यावेळी आ. लहू कानडे, माजी नगराध्यक्षा राजश्रीताई ससाणे, उपनगराध्यक्ष करण ससाणे, जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सुनील पोखरणा, प्रांताधिकारी अनिल पवार, तहसीलदार प्रशांत पाटील, वैद्यकीय अधीक्षक डॉ. योगेश बंड, ज्ञानदेव वाफारे, जि. प. सदस्या आशाताई दिघे, काँग्रेसचे जिल्हा कार्याध्यक्ष सचिन गुजर, तालुकाध्यक्ष अरुण पा. नाईक, शहराध्यक्ष संजय छल्लारे, इंद्रनाथ थोरात, ज्ञानेश्वर मुरकुटे, बाबासाहेब दिघे, पं. स. सदस्या डॉ.वंदनाताई मुरकुटे,सुधीर नवले, नगरसेवक मुजफ्फर शेख, अशोक कानडे, गणपतराव साळुंके, साारिका कुंकूलोळ, दीप चव्हाण आदी उपस्थित होते.

ना. थोरात म्हणाले, सातबारा ऑनलाईन असले पाहिजे म्हणून मी मागील काळात 90 टक्के काम पूर्ण केले. आता हा सातबारा नव्या स्वरुपात पहायला मिळणार आहे. त्यातील साफसफाई करण्यात आल्या आहेत. कोणी कर्ज पूर्णपणे भरलेले असेल आणि त्याचा बोजा सातराबावर कायम राहत होता मात्र आता तो सातबारा कोरा करता येणार आहे. आता शेतकर्‍याला आपल्या शेतातील पिकाची नोंद आपल्या मोबाईलवरून करता येणार आहे. पीक पाहणीचा अ‍ॅप्स डाऊनलोड करून आपल्या शेतात बसून प्रत्येक शेतकर्‍याला वर्गवारीनुसार करता येणार आहे. या सप्टेंबर महिन्यात तुमच्या शेतकर्‍यांचे सातबारा उतारे हे त्यांच्या घरात त्यांच्या खिशात मोफत पोहोच करणार आहोत.

पालकमंत्री हसन मुश्रीफ म्हणाले, करोनाच्या या महामारीच्या तिसर्‍या लाटेच्या पार्श्वभूमीवर जो प्रत्येक तालुक्यात ऑक्सीजन प्लांट व एक सुसज्ज अशा कोविड सेंटर उभारण्याचा निर्णय झाला. करोनाचे संकट आजही आपल्याभोवती घोंगावत आहे. त्यामुळे प्रत्येकाने काळजी घेणे आवश्यक आहे. सामाजिक अंतर ठेवून मास्क वापरून या लाटेचा सामना करावा, असेही त्यांनी सांगितले.

आ. लहू कानडे म्हणाले, करोनाच्या महामारीच्या पहिल्या व दुसर्‍या लाटेत अनेकांना आपले जीवही गमवावे लागले. ग्रामीण रुग्णालयात मोफत उपचार सर्वसामान्यांना मिळावे म्हणून याठिकाणी एक चांगले कोविड सेंटर झाले पाहिजे म्हणून प्रयत्न केले आणि ते साकारलेही. 5 कोटींचा निधी मंजूर झाला असून त्यात विविध विकास कामे या तालुक्यात केली जाणार आहेत. त्यातून स्मशानभूमीत 50 लाख रुपयांची विद्युत दाहिनी उभारली जाणार आहे. यापुढे विकासाची अशी कामे चालू राहतील, असेही त्यांनी सांगितले.

करण ससाणे म्हणाले, पहिल्या व दुसर्‍या लाटेत ऑक्सीजनची खूपच कमी होती. आम्ही त्याची सातत्याने मागणी करत होतो मात्र आम्हाला ते मिळाले नाहीत. त्यामुळे अनेकांचे जीवही गेले. तशी परिस्थिती उद्भवू नये म्हणून ऑक्सीजन प्लँटची मोठी गरज होती. आजच्या या लोकार्पणानिमित्त ही गरज पूर्ण झाली असल्याचेही त्यांनी सांगितले.

यावेळी जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले यांनी प्रास्ताविक केले तर जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सुनील पोखर्णा यांनी स्वागत केले. सूत्रसंचालन प्रसन्न धुमाळ व संतोष मते यांनी केले.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com