सहकार क्षेत्रात विकास सोसायटी हा पाया- ना. थोरात

सहकार क्षेत्रात विकास सोसायटी हा पाया- ना. थोरात

अकोले/कळस |प्रतिनिधी| Akole

पाटपाण्याच्या प्रश्नासाठी अकोले तालुक्याचे योगदान खुप मोठे आहे असे सांगत सहकार क्षेत्रामुळे अनेक प्रश्नांची उत्तरे आणि विकासाचे ध्येय स्पष्ट झाले. ग्रामीण भागातील विकास सोसायटी यामध्ये खुप मोठा वाटा संभाळत आहे. जिल्हा बँकेच्या माध्यमातून शेतकरी बांधवांच्या अर्थिक विकासाचा पाया बनून सहकारी सोसायटी आज सहकाराचा महत्त्वाचा भाग बनली आहे. विविध विभाग कर्जपुरवठा, बिगरव्याजी कर्ज, मध्यम दीर्घ मुदत कर्जांच्या माध्यमातून शेतकरी बांधवांना दिलासा देण्याचे समाधानकारक काम सोसायट्या करीत आहेत, असे प्रतिपादन राज्याचे महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी केले.

अकोले तालुक्यातील कळस खुर्द येथील विविध सहकारी सोसायटी च्या ‘सहकारानंद’ या नूतन वास्तुचे उद्घाटन ना. थोरात यांच्याहस्ते पार पडले. यावेळी ना. थोरात बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आ. डॉ. किरण लहामटे होते.

याप्रसंगी जिल्हा परिषद सदस्य रामहरी कातोरे, जिल्हा बँकेचे उपाध्यक्ष अ‍ॅड. माधवराव कानवडे, माजी चेअरमन व ज्येष्ठ संचालक सिताराम गायकर, संचालक अमित भांगरे, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मधुकरराव नवले, सोन्याबापू वाकचौरे, मिनानाथ पांडे, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष भानुदास तिकांडे, पंचायत समितीचे माजी उपसभापती मारुती मेंगाळ, माध्यमिक शिक्षक सोसायटीचे उपाध्यक्ष अण्णासाहेब ढगे, संगमनेर करखान्याचे संचालक संभाजी वाकचौरे, आनंदराव वाकचौरे, संस्थेचे चेअरमन शरद झोडगे, श्रीमती मंदाताई नवले, विक्रम नवले, प्रांताधिकारी शशिकांत मंगरूळे आदी मान्यवर उपस्थित होते.

यावेळी ना. थोरात म्हणाले, देशाला आदर्श असणारे महाराष्ट्रातील सहकार क्षेत्र आज ग्रामीण विकासापासून ते राष्ट्रीय विकासापर्यंत आपली भूमिका स्पष्ट करताना दिसत आहे. स्व. भाऊसाहेब थोरात राज्य सहकारी बँकेचे चेअरमन असतांना त्यांनी ग्रामीण भागातील सहकारी सोसायटी या जगल्या पाहिजे तरच शेतकरी जगेल, त्यासाठी त्यांना मदत करण्याचे धोरण त्यांनी घेतले अशी आठवणही त्यांनी काढली.

आ. डॉ. किरण लहामटे यांनी कळस येथील सर्वच शेतकरी बांधवांनी कष्ठाचे चिज करीत नेहमी सहकार जपला आहे. त्यामुळे संस्थेची अर्थिक परिस्थिती कायम चांगली राहिली, याबद्दल समाधान व्यक्त केले. अकोले तालुक्यात झालेल्या परिवर्तनात ना. बाळासाहेब थोरात यांचा खारीचा वाटा असल्याचे आ. डॉ. लहामटे यांनी म्हटले.

यावेळी अ‍ॅड. माधवराव कानवडे, सिताराम पा. गायकर, मधुकरराव नवले आदींची भाषणे झाली. सूत्रसंचालन शिवाजी नेहे यांनी केले तर आभार उद्योजक सुरेश गडाख यांनी मानले.

निळवंडे धरणाच्या कालव्यांची कामे वेगात सुरू आहे. या संदर्भात अनेकजण माहितीच्या अधिकाराखाली अर्ज करून अधिकारी माहिती देण्यातच गुंतले पाहिजे, म्हणजे काम रेंगाळले पाहिजे असे काहींचे काम सुरू असल्याची उपरोधिक टीकाही ना. थोरात यांनी माहिती अधिकारात माहिती मागविणार्‍यांचे नाव न घेता यावेळी केली.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com