करोनामुक्त गाव अभियान राबवा : ना. थोरात

करोनामुक्त गाव अभियान राबवा :  ना. थोरात

संगमनेर (प्रतिनिधी) - करोनाच्या दुसर्‍या लाटेत अनेक जण निष्काळजीपणा करत आहे. त्यामुळे ग्रामीण भागात रुग्ण वाढ झाली आहे. प्रत्येकाने स्वत:ची व स्वत:च्या कुटुंबाची काळजी घेणे अत्यंत गरजेचे असून मास्क वापरणे गरजेचे आहे. प्रत्येक गाव करोनामुक्त करण्यासाठी गावातील ग्रामरक्षक समिती अधिक प्रभावी कार्यान्वित करून करोनामुक्त गाव अभियान राबवा, असे आवाहन महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी केले.

अमृतवाहिनी इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये तालुका व शहरातील करोना उपाययोजना बाबतच्या आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी आमदार डॉ. सुधीर तांबे, नगराध्यक्षा दुर्गाताई तांबे, सभापती सुनंदाताई जोर्वेकर, जि. प. सदस्य रामहरी कातोरे, अजय फटांगरे, मिलिंद कानवडे, सिताराम राऊत, महेंद्र गोडगे, उपनगराध्यक्ष शैलेश कलंत्री, प्रांताधिकारी डॉ. शशिकांत मंगरुळे, तहसीलदार अमोल निकम, नगरपालिकेचे मुख्याधिकारी डॉ. सचिन बांगर, उपविभागीय पोलीस अधिकारी राहुल मदने, पोलीस निरीक्षक मुकुंद देशमुख, पोलीस निरीक्षक पांडुरंग पवार, डॉ. राजकुमार जर्‍हाड, तालुका कृषी अधिकारी प्रशांत शेंडे, कारखान्याचे कार्यकारी संचालक जगन्नाथ घुगरकर, वैद्यकीय अधिकारी डॉ. सुरेश घोलप, अमृतवाहिनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल शिंदे आदी उपस्थित होते.

नामदार थोरात म्हणाले, संगमनेर तालुक्यात सर्वाधिक करोना टेस्ट केल्या जात असून त्यामुळे रुग्ण संख्या वाढलेली दिसत आहे. मात्र आपल्याला प्रत्येक गाव व संपूर्ण तालुका करोनामुक्त करावयाचा आहे. यासाठी प्रत्येक गावातील ग्राम रक्षक सुरक्षा समिती अधिक प्रभावीपणे कार्यान्वित करताना कोणतीही लक्षणे आढळल्याचे तातडीने विलगीकरण करा. तपासणी, विलगीकरण व तातडीचे उपचार हा करोना मुक्तीचा मार्ग आहे. मात्र यामध्ये सर्वांनी काळजी घेणे अत्यंत गरजेचे आहे. निष्काळजीपणा करोनाला निमंत्रण देत आहे. म्हणून प्रत्येकाने शासकीय नियमांचे पालन करा. विना मास्क कोणीही राहू नका. गरज असेल तरच घराच्या बाहेर पडा. नव्याने येणारा म्युकरमायकोसिसचा धोका मोठा असून यापासून स्वत:च स्वत:चे, कुटुंबाचे रक्षण करण्याकरिता प्रत्येकाने काळजी घ्यावी,असे आवाहन त्यांनी केले.

आमदार डॉ. तांबे म्हणाले, करोनाचा स्ट्रेंथ हा दिवसेंदिवस बदलत आहे. नवा आजार हा अत्यंत घातक आहे. मात्र डबल मास्कचा वापर केल्याने करोनापासून काही प्रमाणात आपण स्वत:चा बचाव करू शकतो. काळजी घेणे हाच करोना बचावाचा मोठा उपाय आहे. महाविकास आघाडी सरकार व प्रशासन अत्यंत चांगले काम करत आहे. या सर्वांना नागरिकांनी सहकार्य करणे गरजेचे असल्याचे ते म्हणाले.

यावेळी प्रांताधिकारी डॉ. मंगरुळे यांनी तालुक्यातील विविध गावांच्या करोना रुग्णांची माहिती दिली. तर नामदार थोरात यांनी गटनिहाय गावांचा आढावा घेऊन पदाधिकारी व प्रशासनाला करोना रुग्ण वाढ रोखण्याच्या विशेष सूचना दिल्या.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com