उद्योजकांना सवलती देऊन राज्यभर ऑक्सिजन प्लँटची निर्मिती

राज्यमंत्री बच्चू कडू यांची माहिती
उद्योजकांना सवलती देऊन राज्यभर ऑक्सिजन प्लँटची निर्मिती

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

राज्यात आज गरजेपेक्षा कमी ऑक्सिजन केंद्राकडून मिळत आहे. मात्र, राज्याने याबाबतीत स्वयंपूर्ण होण्यासाठी पावले उचलली असून काही ऑक्सिजन प्लँट सुरू झाले असून काही लवकरच सुरू होतील. राज्यात साखर कारखाने, खाजगी उद्योजक यांना यासाठी सवलती देऊन ऑक्सिजन प्लँट उभे राहत आहेत, अशी माहिती राज्यमंत्री बच्चू कडू यांनी दिली.

नगर येथे प्रहार जनशक्तीच्या वतीने सुरू करण्यात आलेल्या कोविड केअर सेंटरची त्यांनी पाहणी करून कार्यकर्ते, रुग्ण, नातेवाईक यांच्याकडून अडीअडचणीची माहिती घेतली. त्यानंतर माध्यमांशी बोलताना मंत्री बच्चू कडू यांनी ही माहिती दिली. लसीकरणाबाबत बोलताना ते म्हणाले, लसीकरणाची सर्वांना आवश्यकता आहे. मात्र केंद्र पुरवठा करते त्या संख्येत लसीकरण करावे लागत आहे.

सुरूवातीला जनतेच्या मनात काही शंका होत्या, लोक लस घेण्यास पुढे येत नव्हते. लसी पडून होत्या मात्र नंतर याबाबत जनजागृती झाली आणि नागरिकांनी एकदम लसीकरणासाठी मोठी गर्दी केली. अशी एकंदरीत परिस्थिती आहे. मात्र नागरिकांनी रजिस्ट्रेशन करून नंतरच लसीकरणास यावे, उगाच गर्दी करून संसर्ग वाढू शकतो, असे मंत्री बच्चू कडू म्हणाले.

करोनाचे संकट महाराष्ट्रासह देशावर वाढत असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी जगाला ओरडून सांगत होते की भारतातील करोना गेला म्हणून, पण झाले काय, आज भारतातील करोनाचा संसर्ग जगात सर्वाधिक आहे. त्यामुळे पंतप्रधान नियोजन करण्यात चुकले असल्याची टीका राज्यमंत्री बच्चू कडू यांनी केली आहे.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com