नामदार आदित्य ठाकरे यांनी आदिवासी आश्रम शाळेतील विद्यार्थ्यांशी साधला संवाद

नामदार आदित्य ठाकरे यांनी आदिवासी आश्रम शाळेतील विद्यार्थ्यांशी साधला संवाद

संगमनेर |प्रतिनिधी| Sangamner

राज्याचे मुख्यमंत्री नामदार उद्धव ठाकरे यांचे सुपुत्र व पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी कोळवाडे येथील जयहिंद आदिवासी आश्रम शाळेत विद्यार्थ्यांशी त्यांच्या भाषेत संवाद साधला. पर्यावरण जागृती, वृक्षसंवर्धन संगोपन याबाबत हसत-खेळत चर्चा करत आदिवासी बालगोपाळांमध्ये ते काही काळ रमले.

यावेळी कृषी राज्यमंत्री डॉ. विश्वजित कदम, खासदार सदाशिव लोखंडे, आ. डॉ. सुधीर तांबे, प्रकल्प प्रमुख सौ. दुर्गाताई तांबे, इंद्रजीत थोरात, डॉ. हर्षल तांबे, सौ. शरयूताई देशमुख, डॉ. जयश्रीताई थोरात, मुख्याध्यापक दशरथ वर्पे, बाळासाहेब उंबरकर, मुख्य वनसंरक्षक नितीन गुदगे आदी मान्यवर उपस्थित होते उपस्थित होते.

आदित्य ठाकरे यांनी कोणतेही औपचारिकता न करता थेट विद्यार्थ्यांमध्ये जाऊन मांडी घालत त्यांच्याबरोबर संवाद साधला. आदिवासी दुर्गम खेड्यापाड्यातील विद्यार्थ्यांना मुख्यमंत्र्यांचा मुलगा आणि तोही मंत्री आपल्या समवेत बसून आपल्याशी गप्पा मारतो आहे यावर विश्वास बसत नव्हता. त्यानंतर आदित्य ठाकरे यांनी अगदी प्रेमाने त्यांच्या बोलीभाषेत विद्यार्थ्यांशी संवाद साधत पर्यावरण जाणीव, जागृती, वृक्षसंवर्धन, संगोपन याबाबत दिलखुलास संवाद साधला.

यावेळी आदित्य ठाकरे म्हणाले, करोना संकट आपण सर्वांनी अनुभवले आहे. प्रत्येकाने दोन वर्षे चेहर्‍यावर मास्क लावला आहे. आता तो मास्क नको वाटतो. यापुढे पुन्हा असे संकट येऊ द्यायचे नसेल तर प्रत्येकाने दरवर्षी दोन वृक्ष लावून त्याचे संगोपन केले पाहिजे. विद्यार्थी हे खरे वृक्षदूत असून त्यांनी त्यांच्या कुटुंबियांवर नातेवाईकांमध्ये ती हट्टाने पर्यावरणाची जाणीव जागृती घडवून आणणे गरजेचे आहे. ना. बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली या तालुक्यातील दंडकारण्य अभियानाच्या चळवळीत सर्व विद्यार्थ्यांचे काम अत्यंत कौतुकास्पद आहे. आदिवासी डोंगर वाड्यांत राहिलेले विद्यार्थी वन्यप्रेमी असतात. खर्‍या अर्थाने मोकळा श्वास या विद्यार्थ्यांना मिळतो आहे. याचा आनंदही आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील विद्यार्थी नेहमी काटक असतात. या विद्यार्थ्यांमध्ये मोठी गुणवत्ता असून त्यांना संधी मिळाल्यास ते अत्यंत यशस्वीपणे पार पाडतात असेही ते म्हणाले.

यावेळी आदित्य ठाकरे यांचे स्वागत आदिवासी विद्यार्थ्यांनी आदिवासी नृत्याने केले. पर्यावरण मंत्र्यांनी यावेळी या आदिवासी समूहाला मुंबईला येण्याचे निमंत्रणही दिले हा सर्व साधेपणा पाहून सर्व विद्यार्थी भारावले.

महसूलमंत्री बाळासाहेब थोरात म्हणाले, राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे अत्यंत साधे व्यक्तिमत्व आहे. सर्वांना सोबत घेऊन जाणारे आहेत. त्यांचाच वारसा आदित्य ठाकरे चालवत असून जयहिंद आश्रम शाळेतून उत्तीर्ण झालेले अनेक विद्यार्थी चांगल्या पदांवर काम करत आहेत. ही राज्यातील आदर्शवत मॉडेलरुपी अशी आदिवासी आश्रम शाळा असल्याचे ते म्हणाले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक आ. डॉ. सुधीर तांबे यांनी केले तर मुख्याध्यापक दशरथ वर्पे यांनी आभार मानले.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com