गौण खनिज अनधिकृत उत्खनन प्रकरणी नेवासा न्यायालयात खासगी फिर्याद दाखल
सार्वमत

गौण खनिज अनधिकृत उत्खनन प्रकरणी नेवासा न्यायालयात खासगी फिर्याद दाखल

जिल्हा गौण खनिज अधिकारी, तहसीलदार, तलाठी व ठेकेदार यांना आरोपी करण्याची केली मागणी

Arvind Arkhade

नेवासा|तालुका प्रतिनिधी|Newasa

तालुक्यातील शिरसगाव ते माका रस्त्याच्या कामासाठी ठेकेदार कंपनीने दिघी शिवारात वन जमिनीवर अनधिकृत स्टोन क्रेशर चालविले व नजिक चिंचोली शिवारात खाण घेऊन अनधिकृत उत्खनन केल्याप्रकरणी माहिती अधिकार कार्यकर्ते काकासाहेब बाजीराव गायके यांनी अ‍ॅड. सादिक शिलेदार यांच्यामार्फत ठेकेदार कंपनीचे मालक, जिल्हा गौण खनिज अधिकारी, नेवासा तहसीलदार, सर्कल-तलाठी यांचे विरुद्ध नेवासा न्यायालयात खाजगी फिर्याद दाखल केली आहे.

दि. 8 जुलै 2020 रोजी नेवासा येथील ज्युडिशनल मॅजिस्ट्रेट वर्ग 1 यांच्या न्यायालयात काकासाहेब बाजीराव गायके (वय 35) रा.रांजणी पो. दहिगावने, ता. शेवगाव यांनी खासगी फिर्याद दाखल केली आहे. नेवासा तालुक्यातील मौजे नजिक चिंचोली शिवारात गट नंबर 69/2 मध्ये शिरीष आरसुळ व दिलीप काकडे यांच्या मालकीचे क्षेत्रात बेकायदेशीररित्या दगडाचे उत्खनन झालेले आहे.

मौजे दिघी शिवारातील गट नंबर 91/3 मध्ये 80 आर मिळकत ही महाराष्ट्र शासनाने नानासाहेब मोरे यांना शेती कसण्यासाठी दिलेली असून त्यांना ती फॉरेस्ट जमीन वाटपातून मिळालेली आहे. परंतु त्याने शासनाची कुठलीही परवानगी न घेता एम. एस. देशमुख अ‍ॅण्ड कंपनीशी बेकायदेशीर भाडेपट्टा केला. त्या जमिनीवर देशमुख कंपनीने शासनाची परवानगी न घेता बेकायदा स्टोन क्रेशर चालविले.

मौजे दिघी शिवारात बेकायदा स्टोन क्रेशर सुरू असल्याचे आणि नजिक चिंचोली शिवारात बेकायदा दगडखाण उत्खनन केले म्हणून एम. एस. देशमुख अ‍ॅण्ड कंपनीचे मालक व प्रोप्रायटर तसेच संचालक अमर सुरेश देशमुख रा.टेंभुर्णी ता. माढा जि. सोलापूर, प्रगती कन्स्ट्रक्शनचे मालक बाळासाहेब लक्ष्मण देशमुख, शिरिष गंगाधर आरसुळे रा. पुणे, दिलीप रामकिसन काकडे रा. गेवराई ता.नेवासा वनानासाहेब भाऊराव मोरे रा. दिघी, ता.नेवासा यांच्याविरुध्द तर शासकीय कर्तव्यात कसूर करून या प्रकरणाकडे दुर्लक्ष करून ठेकेदार व इतरांना मदत व शासनाच्या नुकसानीस कारणीभूत ठरल्याबद्दल आणि गौण खनिज चोरीस मदत केल्याबद्दल

जिल्हा गौण खनिज अधिकारी प्रशांत कोरे, नगर विभागाचे उपविभागीय अधिकारी श्रीनिवास अर्जुन, नेवासा तहसीलदार रुपेशकुमार सुराणा, नायब तहसीलदार संजयकुमार परदेशी, कुकाणा मंडलाधिकारी आय्या अण्णा फुलमाळी, नजिक चिंचोलीचे तलाठी सारंग नाचन, सलाबतपूरचे मंडलाधिकारी गोरख भालेराव व दिघीचे तलाठी पात्रज पारेख या 13 जणांविरुद्ध भारतीय दंड विधान कलम 379, 405, 409, 166, 167, 107, 108 व 34 त्याच प्रमाणे कलम 3 व 15 गौण खनिज कायद्याप्रमाणे गुन्हा दाखल करण्याची मागणी करणारी खाजगी फिर्याद श्री. गायके यांनी नेवासा न्यायालयात दाखल केली आहे. फिर्यादीचे वतीने अ‍ॅड. सादिक शिलेदार हे काम पहात आहेत.

या प्रकरणात शासकीय अधिकारी व कर्मचारी अशा 8 जणांना समावेश आहे. त्यामुळे फिर्यादीने त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची परवानगी राज्यपालांकडे मागितली होती. परवानगीसाठी राज्यपालांना पत्र देऊन 90 दिवसांचा कालावधी उलटून गेल्याने नियम व कायद्यानुसार परवानगी देण्यात आली आहे असे समजून या शासकीय अधिकारी व कर्मचारी यांच्या विरुध्द न्यायालयात फिर्याद दाखल केली आहे.

या प्रकरणी आज बुधवार दि. 15 जुलै रोजी पहिली सुनावणी होणार आहे. न्यायालयाच्या निर्णयाकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले आहे.

Deshdoot Digital Dhamaka | देशदूत डिजिटल धमाका
www.deshdoot.com